|| अजय वाळिंबे

एनबीसीसी (इंडिया) लि. (बीएसई कोड – ५३४३०९)

खरे तर ‘माझा पोर्टफोलियो’साठी शक्यतो सार्वजनिक क्षेत्रातील अर्थात पीएसयू कंपन्या विचारात घेतल्या गेलेल्या नाहीत. मात्र सध्याच्या शेअर बाजारात अनेक चांगल्या प्रतीच्या कंपन्यांचे शेअर्स खूपच आकर्षक किमतीत उपलब्ध झालेले दिसतात आणि अर्थात याला पीएसयू कंपन्यांचे शेअर्सदेखील अपवाद नाहीत. कंटेनर कॉर्पोरेशन, इंजिनीयर्स इंडिया, ड्रेजिंग कॉर्पोरेशन, मॉइल, इरकॉन आणि आज सुचविलेली एनबीसीसी या अशाच काही उत्तम सरकारी कंपन्या आहेत. पडत्या शेअर बाजारात सार्वत्रिक मार पडलेल्या शेअर्समध्ये या कंपन्यांच्या शेअर्सचाही समावेश असल्याने सध्या ते पोर्टफोलियोसाठी विचारात घेण्यास काहीच हरकत नाही.

एनबीसीसी अर्थात नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड ही सरकारी नवरत्न कंपनी मुख्यत्वे स्थावर मालमत्ता प्रकल्प व्यवस्थापन, ऊर्जा प्रकल्प, बांधकाम आणि अर्थात पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन करते.

साधारण सहा वर्षांपूर्वी म्हणजे मार्च २०१२ च्या सुमारास निर्गुतवणूक अभियानात एनबीसीसीचा ‘आयपीओ’ सध्याच्या दुप्पट भावास म्हणजे १०६ रुपयांना आला होता. मात्र त्या वेळी एनबीसीसीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य १० रुपये होते आणि आता हे दर्शनी मूल्य आहे केवळ १ रुपया. म्हणजे त्या वेळी ज्या गुंतवणूकदारांनी या ‘आयपीओ’मध्ये गुंतवणूक केली असेल त्यांचा चांगलाच फायदा झाला आहे. स्थावर मालमत्ता प्रकल्प व्यवस्थानात आघाडीवर असलेली ही सरकारी कंपनी कायम उत्तम कामगिरी करीत आलेली आहे. बहुतांशी सरकारी कंपन्यांची ‘आयपीओ’नंतरची शेअर बाजारातील कामगिरी आकर्षक नसली तरी एनबीसीसी मात्र त्याला अपवाद ठरावी. कंपनीच्या आधिपत्याखाली अनेक सरकारी प्रकल्प असून त्यात पुनर्विकास, रस्ते, पूल, शैक्षणिक संस्था, इस्पितळे, विमानतळ, रेल्वे स्थानक आदी अनेक महत्त्वाचे प्रकल्प आहेत. गेल्या आथिर्क वर्षांपर्यंत कंपनीकडे सुमारे ८०,००० कोटी रुपयांच्या ऑर्डर्स होत्या. आपल्या विस्तारीकरणासाठी एनबीसीसी सुमारे ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून दोन सरकारी कंपन्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांत आहे. या कंपन्या ताब्यात घेतल्यानंतर कंपनीचे ऑर्डर बुक एक लाख कोटी रुपयांवर जाईल. गेली दोन वर्षे आपण विकसनशील राष्ट्रापासून विकसित राष्ट्र करण्याच्या प्रयत्नात आहोत. साहजिकच कुठलेही सरकार आले तरी पायाभूत प्रकल्प चालूच राहतील. एनबीसीसीसारखी प्रकल्प व्यवस्थापन कंपनी म्हणूनच उत्तम कामगिरी करीत राहील अशी अपेक्षा आहे. कंपनीकडे सध्या काही महत्त्वाचे प्रकप असून त्यात प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये १५,००० बंकर्स, मुंबईतील वडाळा प्रकल्प तसेच एमएलए हॉस्टेल यांचा समावेश आहे. कुठलेही कर्ज नसलेली ही कंपनी सध्या वर्षभराच्या नीचांकावर असून कंपनीचे सहामाहीचे आर्थिक निष्कर्ष अजून जाहीर व्हायचे आहेत. एनबीसीसीतील गुंतवणूक येत्या दोन वर्षांत किमान ५० टक्के परतावा देऊ  शकेल.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.