16 January 2021

News Flash

विम्यातील ‘न्यू-नॉर्मल’ची रुजुवात

आकस्मिक आणि अकल्पित आघातांपासून संरक्षणासाठी असणाऱ्या विम्याच्या जगताचे अंतरंग आणि देशोदेशीच्या नवप्रवाहांचे वेध घेणारे पाक्षिक सदर..

|| नीलेश साठे

विमान हवेत असताना विमानाच्या इंजिनाचे कार्यचालन बंद पडल्यावर धावपट्टीवर विमान कसे उतरवायचे याचे प्रशिक्षण वैमानिकांना दिले जात नाही. कारण असे प्रशिक्षण द्यायचे ठरवले तर अनेक विमाने आणि वैमानिक धाराशायी पडतील. अशी वेळ आली तर त्याने आपल्या अनुभवाच्या जोरावर आणि ज्ञानाच्या आधारे विमान उतरवायचे असते. तसेच काहीसे शतकातून एकदा येणाऱ्या करोनासारख्या महामारीमध्ये कंपनी कशी चालवायची याचे धडे कुठल्याच व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेमध्ये दिले जात नाहीत. अशा आकस्मिक आणि अकल्पित परिस्थितीत कंपनीचा प्रमुख आणि त्याचा संघ यांची खरी कसोटी लागते.

आनंदाची बाब ही की विमा विषयच मुळी अशा आकस्मिक आणि अकल्पित घटनांना संरक्षण देत असल्याने, करोनाचा धक्का विमा उद्योगाने सहजपणे पचवला. मागील वर्षीच्या शेवटच्या तिमाहीचे विमा व्यवसायाचे आकडे उत्साहदायक नसले (टाळेबंदीमुळे मार्चमध्ये व्यवसाय होऊ शकला नाही), तरी चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत विमा कंपन्यांनी मागील आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत केलेल्या व्यवसायाएवढा (सव्वा लाख कोटी रुपये) विमाहप्ता संकलित केला.

करोना महामारीला तोंड देण्यासाठी विमा कंपन्यांनी उचललेली पावले :

हळूहळू सर्वच विमा कंपन्यांना हे कळून चुकले की ही स्थिती दीर्घकाळ सुरू असणार आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर आपल्याला व्यवसाय करायची पद्धत बदलणे क्रमप्राप्त आहे. अनेक कंपन्यांनी करोनाचा विमा व्यवसायावर होणारा परिणाम ताडला आणि त्याला उत्तर म्हणून आपली संगणक व्यवस्था सुदृढ केली. घरून काम करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान संबंधीचे बदल केले. विमेदारांनाही दावे-प्रस्तुतीसंबंधी बदललेले नियम व पद्धत सांगितली. शिवाय, विमेदारांना विमा हप्ता भरण्याचा त्रास, कमी कसा होईल, यासंबंधी आपल्या नेहमीच्या कार्यपद्धतीत बदल केले.

भारतीय विमा नियामन आणि विकास प्राधिकरणाने (इर्डा) केलेल्या सूचना :

‘इर्डा’ने संभाव्य परिस्थितीमध्ये विमेदारांना होणारा त्रास कमी व्हावा म्हणून विमा कंपन्यांनी काय काय बदल करायला हवे

या संबंधी वेळोवेळी सूचना जारी केल्या. त्यातील महत्त्वाच्या सूचना :

विमा हप्ता देय तारखेस भरला नाही तर विमा पॉलिसी बंद पडते. टाळेबंदीच्या काळात बरीच शाखा कार्यालये बंद असल्याने आणि विमेदारांना देखील घराबाहेर पडणे शक्य नसल्याने, विमा भरण्यासाठीचा अतिरिक्त मुदत कालावधी वाढवला. ऑनलाइन विक्री वाढवण्यासंबंधी सूचना दिल्या.

मृत्यूदावे आणि पॉलिसीची मुदत संपल्यानंतरचे दावे त्वरित देण्यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली. त्यानुसार स्व-साक्षांकित फॉम्र्स ऑनलाइन पाठवले तरी ग्राह्य़ धरून दाव्यांना मंजुरी व भुगतान करावे, इत्यादी.

विमा कंपन्यांपुढील आव्हाने:

विमा कंपन्यांपुढे सर्वात मोठे आव्हान होते ते संगणक व्यवस्था निर्धोक आणि खंडित न होता चालू ठेवण्याचे. कर्मचाऱ्यांना घरून काम करा सांगणे सोपे आहे, पण आतापर्यंत कर्मचारी कार्यालयात येऊन संगणकावर लॉग-इन करीत असत, आता त्यांना घरून लॉग-इन करू देणे म्हणजे अप्रत्यक्षपणे कार्यालयांची संख्या वाढवणे होते. त्यासाठी महत्त्वाचे म्हणजे प्रोटोकॉलशी तडजोड न करता तसेच योग्य संरक्षक भिंती (फायरवॉल्स) निर्माण करून आणि विमेदारांच्या माहितीचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेणे जरुरीचे होते. ‘व्यवसाय सातत्य योजना तसेच ‘इर्डा’ने यासंबंधी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून व्यवसाय खंडित होणार नाही ना हे बघणे गरजेचे होते. महत्त्वाच्या विभागातील कर्मचारी कार्यालयात येत होते, पण त्यांपैकी कुणाला जर करोनाची लागण झाल्याचे आढळले तर कार्यालय निर्जंतुक करून घेण्यासाठी काही दिवस बंद ठेवणे आवश्यक झाले होते.

मात्र या कठीण परिस्थितीत देखील विमा कंपन्यांनी आपला व्यवसाय बंद ठेवला नाही आणि यासाठी विमा कार्यालयांतील सर्व कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत.

करोनापश्चात विमा उद्योगाने केलेले बदल :

एप्रिल महिन्यात नवा विमा व्यवसाय होऊच शकला नाही. विमा प्रतिनिधी विमा विक्रीसाठी घराबाहेर पडू शकत नव्हते, करोनाच्या भयाने कोणी संभाव्य ग्राहक त्यांना घरी येऊ देत नव्हते. अनेकांना नोकरी जाईल की राहील याची शाश्वती नव्हती, उत्पन्न खंडित झाले तर आधी घेतलेल्या विमा पॉलिसीचा हप्ता कसा भरायचा ही विवंचना होती, तेव्हा अशा स्थितीत नवा विमा व्यवसाय करणे कठीण होते. तरीही ऑनलाइन विमा विक्रीतून काही विमा पॉलिसी विकल्या गेल्या. विमा विक्रेत्याचे उत्पन्न हे विमा विक्रीवर अवलंबून असते. विमा विक्री करणे त्यावेळच्या अघटित स्थितीमुळे असंभव झाले होते. अनेक कंपन्यांनी याचा विचार करून विमा प्रतिनिधींना काही रक्कम उचल म्हणून दिली. एजंटांना दरवर्षी किमान ठरावीक व्यवसाय करावा लागतो आणि तो न झाल्यास त्यांची एजन्सी बंद होते. अनेक कंपन्यांनी हा नियम शिथिल केला आणि एजंटांना मुदतवाढ दिली. अशा विमा योजना ज्या घेताना वैद्यकीय चाचणी करणे गरजेचे नसते, उदाहरणार्थ पेन्शनच्या योजना किंवा कमी विमाधनाच्या योजना किंवा सिंगल प्रीमियमच्या योजना किंवा युलिपच्या योजना, यांची विक्री वाढावी म्हणून प्रयत्न केले. या त्यांच्या प्रयत्नांना एजंटांनी पण योग्य प्रतिसाद दिला आणि चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत जीवन विमा कंपन्यांनी चांगला व्यवसाय केला.

नव-सामान्य (न्यू नॉर्मल) :

विमा व्यवसायात नव-सामान्य काय झाले तर महत्त्वाचा बदल म्हणजे बदललेल्या परिस्थितीशी सर्व घटकांनी जमवून घेतले आहे. कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सवय लागली आहे, संगणक प्रणाली अधिक सक्षम झाल्या आहेत, एजंटांनी संभाव्य ग्राहकांशी समक्ष संपर्क येऊ न देता विमा विक्री कशी करता येईल याविषयीचे ज्ञान आत्मसात केले आहे, इर्डाने विमा प्रस्तावावर म्हणजे पेनने सही करण्याच्या आवश्यकतेतून मुभा दिली आहे.
बदललेल्या परिस्थितीत विमेदाराचे हित सांभाळत विमा व्यवसाय वृद्धी करायला विमा कंपन्या कटिबद्ध झालेल्या दिसताहेत.

– लेखक विमा नियामक ‘इर्डा’त माजी सदस्य आणि ‘एलआयसी’मध्ये कार्यकारी संचालक कार्यरत होते.

ई-मेल : nbsathe@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 3:18 am

Web Title: new normal in economy mppg 94
Next Stories
1 निर्देशांकांचे २०२१ मधील संक्रमण..!
2 रिस्क है तो..
3 स्वागत तेजीने
Just Now!
X