मागे एकदा उद्योगपती मुकेश अंबानी यांना खनिज तेलाच्या किमतींबाबत एका जाहीर कार्यक्रमात सहजच बोलताना भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘मी जेव्हा जेव्हा तेलाच्या किमतीबाबत काही भविष्यवाणी केली, तेव्हा तेव्हा ती चुकीचीच ठरली आहे. तेलाच्या किमतीबाबत ठोस भाकीत करू शकेल अशा व्यक्तीबद्दल म्हणूनच मला विशेष ममत्व आहे; पण अद्यापपर्यंत अशी व्यक्ती मला भेटू शकलेली नाही.’’ भाकिते खरी ठरतात अथवा खरी ठरत नाहीत अशा दोनच शक्यता या ठिकाणी असतात; पण भाकितांच्याच आधारे व्यावसायिक निर्णय होत नसतात हेच त्यांनी यातून सुचविले आहे.

गेल्या आठवडा- पंधरवडय़ापूर्वी देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी)बद्दल असेच वेगवेगळ्या वित्तसंस्थांचे अर्थतज्ज्ञ आणि अभ्यासकांचे कयास आपल्या वाचनात येऊन गेले असतील. रिझव्‍‌र्ह बँकही ठरावीक कालांतरात जीडीपी अर्थात आर्थिक विकास दराबद्दलची भाकिते व्यक्त करीत असते. अर्थात तेही वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांची मते अजमावूनच केले जाते; परंतु अशी भाकिते करताना, विकास दर हा एका विशिष्ट हद्दीत म्हणजे ७.२ ते ७.५ टक्क्य़ांदरम्यान राहील, असेच वित्तसंस्थांकडून जाहीर केले जाते. त्यानंतर प्रत्यक्षात विकास दराचे आकडे जाहीर होतात. काहींनी वर्तविलेले अंदाज साफ फसतात, तर काहींचे बरोबर येतातही. म्हणून अंदाज चुकलेल्या संस्था त्यानंतरच्या काळात अंदाज वर्तविण्याची प्रथा बंद करतात असे घडत नाही.

याच धर्तीवर सरलेल्या दिवाळीत माध्यमांमधून विशेषत: वित्त बाजाराला वाहिलेल्या सर्वच दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून दिवाळीनिमित्त खरेदी करावयाच्या ‘स्टॉक आयडियाज्’ अर्थात ५ ते १० अव्वल खरेदीयोग्य समभागांची सूची प्रसृत केली जाते; पण असे करताना, त्याच तज्ज्ञ मंडळींनी आदल्या दिवाळीच्या वेळी भविष्य वर्तविलेल्या समभागांचे काय झाले, त्यांच्या सद्य भावांबाबत कोणतेही भाष्य अथवा विश्लेषण नसते.

बऱ्याचदा शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या आणि चांगली कामगिरी असणाऱ्या कंपनीच्या उच्चाधिकाऱ्याला विचारले की, उद्या महिन्याभराने अथवा वर्षभरात त्यांच्या कंपनीच्या समभागाचा भाव काय असेल, तर ती व्यक्ती स्व-नियंत्रित कंपनीबद्दल पुरेपूर माहिती असतानाही या प्रश्नाचे उत्तर देत नाही. ‘मला माहीत नाही अथवा सांगता येणार नाही’, असे बहुतांशांकडून समंजस उत्तर आलेले आढळून येईल.

जरी बाजार कल अनुमानाची शास्त्रीय पद्धती अस्तित्त्वात असली तरी जर वरच्या पदावरील एक व्यक्ती त्याच्या कंपनीच्या समभागाविषयी काहीही भाकीत करण्यात असमर्थता व्यक्त करतो, तर कुणा तज्ज्ञ विश्लेषकाला सेन्सेक्समधील ३० अथवा निफ्टीतील ५० समभागांचा भविष्यवेध मांडून त्यातील निवडकांना खरेदीयोग्यतेचे लेबल चिकटवणे कसे शक्य होते, असा साहजिकच प्रश्न निर्माण होतो; पण तरी ही प्रथा यथासांग सुरूच आहे आणि आपण ती ऐकतो व अनुसरतही असतोच.

टीव्ही वाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक टीआरपी हा राशिफल व भविष्य मांडणाऱ्या कार्यक्रमांचा आहे. हे ज्योतिष अर्थशास्त्री आणि बाजार विश्लेषक यांच्यात फारकत करण्यासारखे असे काही नाही. दोघेही भाकितांचा भ्रम निर्माण करून लोकांवर मोहिनी घालण्याचे काम करीत असतात.

तर मग प्रश्न उपस्थित होतो की, गुंतवणुकीच्या दृष्टीने काय पाहावे, कुणाचे ऐकले जावे? गुंतवणूक कोणतीही असो, कुठलाही पर्याय निवडला गेला असो, ती मोठय़ा कालावधीत एक सरासरी चांगला परतावाच देते. तिने या सरासरीच्या परिघात जो नफा-तोटा आधीच्या गुंतवणूकदारांना दिला असेल, जवळपास त्याच हद्दीत तो नव्याने गुंतवणूकदारांना तेवढय़ा कालावधीत मिळविता येईल.

विस्ताराने सांगायचे झाल्यास, म्युच्युअल फंडांच्या समभागसंलग्न (इक्विटी) योजनांचा परतावा पाहिला, तर एका वर्षांसाठी सर्वाधिक वाईट उणे ५३ टक्के असा राहिला आहे, तर सर्वोत्तम १७४ टक्के असा आहे. तीन वर्षांच्या कालावधीत (-) १३ टक्के नकारात्मक, तर सर्वोत्तम ७७ टक्के सकारात्मक परतावा राहिला असल्याचे इतिहासात डोकावून पाहिले असता दिसते. उल्लेखनीय म्हणजे कोणत्याही पाच वर्षांच्या कालावधीत या योजनांचा परतावा किमान २ टक्के ते कमाल ६० टक्के, सात वर्षांच्या कालावधीत किमान १२ टक्के ते कमाल ३३ टक्के आणि कोणत्याही १० वर्षांच्या कालावधीत किमान १७ टक्के आणि ३८ टक्के असा सकारात्मक राहिला आहे.

यातून हे स्पष्टपणे दिसून येते की, अल्पावधीतील गुंतवणूक ही प्रसंगी तोटय़ाची राहू शकते. मात्र दीर्घ मुदतीसाठी (५ वर्षे ते १० वर्षे वा अधिक) गुंतवणुकीतून किमान परतावा कामगिरीही तुलनेने चांगलीच म्हणजे +१२ टक्के अशीच आहे. आकडय़ांवरच विसंबून निर्णय घ्यायचा, तर हे गणिती प्रमेय बिनतोडच ठरायला हवे. त्यामुळे पुढे काय घडेल, अशा अंदाज, कयास, भाकितांच्या भ्रमापासून चार हात दूर राहू आणि नव्या वर्षांत अधिकाधिक कालावधीसाठी गुंतवणुकीत कसे राहता येईल या आकडेमोडीवर भर देऊन गुंतवणूकक्रम सुरू ठेवावा, हेच सांगणे.

(लेखक निर्मल बंग सिक्युरिटीज या दलाली पेढीतील सल्लागार)