29 October 2020

News Flash

माझा पोर्टफोलियो : मुबलक तरलता, अनावर उत्साह!

पोर्टफोलियोचा नऊमाही आढावा- जानेवारी ते सप्टेंबर २०२०

पोर्टफोलियोचा नऊमाही आढावा- जानेवारी ते सप्टेंबर २०२०

अजय वाळिंबे

आपल्या पोर्टफोलियोच्या तिसऱ्या तिमाहीचा आणि एकंदर नऊमाहीचा आढावा बघितला तर ३३,५६८ रुपयांची गुंतवणूक १८.५ टक्के नफ्यासह ३९,७९४ वर गेली आहे. तर याच कालावधीत आपल्या पोर्टफोलियोचा ‘आयआरआर’ अर्थात वार्षिकीकृत परतावा तब्बल ५१.४५ टक्के आहे. सीडीएसएल, अ‍ॅडव्हान्स्ड एन्झाइम आणि अ‍ॅफल इंडिया या तीन कंपन्यांच्या शेअर्सने पोर्टफोलियोच्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत दुप्पट परतावा दिला आहे.

कॅलेंडर वर्षांचे नऊ महिने संपले आणि आर्थिक वर्षांचे सहा, परंतु करोना परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही. किंबहुना काही युरोपिय देशांत पुन्हा टाळेबंदी लागू होण्याची भीती व्यक्त होताना दिसत आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जागतिक पातळीवर भारताची स्थिती फारशी चांगली दिसत नाही. त्यामुळेच करोना उद्रेकानंतरही मुबलक तरलतेमुळे शेअर बाजारात अनेक दिवस उत्साहाचेच वातावरण राहिले होते. मात्र येणाऱ्या दिवसांत अमेरिकेतील निवडणुका, करोनावरील लस या घटकांमुळे हे वातावरण अजून किती टिकेल हे येणारा काळच ठरवेल.

नवीन आर्थिक वर्षांची पहिली तिमाही टाळेबंदीत गेल्याने जुलै महिन्यात जाहीर होणारे निकाल अपेक्षेप्रमाणे निराशाजनकच आले. करोना आणि जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर आपले मानांकन घसरले आहेच. परंतु त्याचबरोबर बेरोजगारी, अनुत्पादित कर्जे आणि आजारी बँका, वाढत्या वित्तीय तुटीचे आव्हान, भारताची खालावलेली आर्थिक परिस्थिती आणि सीमेवर असलेले युद्धसदृश वातावरण यामुळे आपली आर्थिक घडी बसायला बराच काळ जावा लागणार आहे. यंदा आपल्या आर्थिक प्रगतीचा दर किती उणे असणार आहे त्याची कल्पना १ सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या जीडीपी वृद्धीदरावरून आलीच असेल. आपला आर्थिक प्रगतीचा दर उणे २३.९ टक्क्यांवर घसरला आहे. त्यामुळे आपलीही इतर अनेक राष्ट्रांप्रमाणे सध्या जागतिक मंदीच्या दिशेने वाटचाल चालू असल्याचे संकेत मिळत आहेत. अर्थात इतके निराशाजनक चित्र असूनही केवळ आशावाद आणि अमेरिकेतील अपेक्षित अर्थप्रोत्साहक पॅकेजमुळे (क्वांटिटेटिव्ह इजिंग) बाजार निर्देशांकांत भरीव वाढ झाली आहे. याखेरीज सप्टेंबरमधील वाढलेले जीएसटी संकलन, वाहन विक्रीतील लक्षणीय वाढ आणि उत्पादन क्षेत्रात झालेली दमदार वाढ यामुळे भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे असे संकेत मिळत आहेत. अर्थात आभासी परिस्थितीपेक्षा प्रत्यक्ष परिस्थितीचे भान ठेवून गुंतवणूक करणे अभिप्रेत आहे.

आपला पोर्टफोलियो फंडामेंटल अनॅलिसिसवर आधारित असल्याने आतापर्यंत सुचविलेले बहुतांश शेअर्स राखून ठेवण्यासारखे किंवा अजूनही खरेदी करण्यासारखेच आहेत मात्र शिफारस केल्याप्रमाणे काही शेअर्सची विक्री करून लाभ पदरात पडून घेता येईल. तसेच लवकरच सप्टेंबर २०२० संपणाऱ्या सहामाहीचे निकाल जाहीर होतील त्याचादेखील प्रभाव लक्षात ठेवणे आवश्यक आहे. मात्र आतापर्यंत सुचविल्याप्रमाणे कुठल्याही शेअर्सची खरेदी/ विक्री टप्प्या-टप्प्यानेच करा. आगामी कालावधीतदेखील शेअर बाजाराचे हेलकावे पाहता अल्पावधीत २०-२५ टक्के परतावा मिळत असल्यास फायदा पदरात पडून घेऊन तेच शेअर्स पुन्हा खालच्या भावात खरेदी करण्याचे धोरण अनुभवी आणि जाणकार गुंतवणूकदारांना फायद्याचे ठरू शकते.

(* १० रुपये प्रति शेअर्सचे विभाजन २ रुपयांच्या पाच शेअर्समध्ये २४ मार्च २०२० पासून)

 

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

२. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 12:05 am

Web Title: ninth monthly review of company portfolio january to september 2020 zws 70
Next Stories
1 अर्थ वल्लभ : उदयोन्मुख मल्टिकॅप
2 बाजाराचा तंत्र कल : अचूक वाटचाल
3 क.. कमॉडिटीचा : कृषी सुधारणा यशस्वी होण्यासाठी गोदाम नियंत्रण गरजेचे!
Just Now!
X