वसंत कुलकर्णी

रिलायन्स म्युच्युअल फंडाचे अधिग्रहण केल्यानंतर निप्पॉन इंडिया हा भारतातील पहिला जपानी म्युच्युअल फंड ठरला आहे. या निमित्ताने निप्पॉन इंडिया निवेश लक्ष्य फंडाची दखल घ्यावीशी वाटली नसती तर नवल ठरले असते.

समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडाच्या मागील वर्षभरात नफ्याची चिंताजनक परिस्थिती असतांना लाँग टर्म गिल्ट फंड या फंड गटातील फंडांनी मागील एका वर्षांत २० टक्क्यांपेक्षा अधिक वार्षिक परतावा दिला आहे. मालमत्ता विभाजनाचे महत्त्व यावरून लक्षात येईल. पोर्टफोलिओत समभाग आणि रोखे यांचे योग्य प्रमाण म्हणूनच महत्त्वाचे ठरते. गिल्ट किंवा जी-सेक फंडांचा वर्षभरातील लक्षवेधक परतावा मिळण्यास प्रामुख्याने रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात केलेली कपात आणि अर्थव्यवस्थेतील अतिरिक्त रोकडसुलभता कारणीभूत ठरल्या आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेच्या ताज्या उपलब्ध पाक्षिक बँकिंग सांख्यिकी नुसार, ३० सप्टेंबर – ४ ऑक्टोबर यादरम्यान उपलब्ध दैनिक सरासरी रोकडसुलभता २.६५ लाख कोटी रुपये होती. आकडेवारीनुसार मागील १८ आठवडे अर्थव्यवस्थेत लक्षणीय रोकडसुलभता असून, ३० सप्टेंबर – ४ ऑक्टोबर या पंधरवडय़ादरम्यान अर्थव्यवस्था सर्वोच्च रोकडसुलभता अनुभवत आहे. जेव्हा अर्थव्यवस्थेत अतिरिक्त रोकडसुलभता असते तेव्हा रोकड तरल बँकांची पसंती केंद्र सरकारचे रोखे खरेदी करण्याला असते. परिणामी, या रोख्यांची मागणी वाढून त्यांचे बाजारभाव वर जातात.

रोकडसुलभता आणि शून्य परतफेडीची जोखीम असल्याने व्याजदर चक्राच्या सगळ्या टप्प्यात मध्यम ते दीर्घ कालावधीच्या गुंतवणुकीसाठी सरकारी रोख्यांना पसंती लाभते. निप्पॉन इंडिया निवेश लक्ष्य फंडाचे निधी व्यवस्थापक प्रशांत पिंपळे या अनुकूल परिस्थितीचा फायदा घेण्यात यशस्वी झाले असल्याचे दिसून आले आहे.

निप्पॉन इंडिया निवेश लक्ष्य फंड हा गुंतवणुकदारांची रोखे गुंतवणुकीतून दीर्घकालीन वित्तीय उद्दिष्टांची पूर्तता करण्याचे साधन आहे. सामान्यत: कोणत्याही व्यक्तीची काही दीर्घकालीन उद्दिष्टे असतात. जसे, तणावमुक्त सेवानिवृत्ती, मुलांचे शिक्षण किंवा मुलांच्या संदर्भातील मोठे खर्च जसे की त्यांची लग्नं, पदव्युत्तर शिक्षण इत्यादी. वित्तीय ध्येयांसाठी मालमत्तेचे रोखे आणि समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडामध्ये विभाजन हे गुंतवणूकदाराचा जोखीमांक आणि वित्तीय ध्येयाच्या पूर्ततेसाठी उपलब्ध असलेल्या कालावधीनुसार ठरते.

हा फंड दीर्घ मुदतीच्या निश्चित उत्पन्न देणाऱ्या सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करून दीर्घ कालावधीसाठी हे रोखे न विकता त्यावर मिळणाऱ्या व्याजाचे उत्पन्न गुंतवणूकदारांना लाभांशाच्या रूपाने परत करणारा किंवा त्या व्याजाची पुनर्गुतवणूक करणारा फंड आहे. हे रोखे दीर्घ कालावधीसाठी खरेदी करून निष्क्रियपणे व्यवस्थापन केले जाते. म्हणजे व्याजदर वाढत असताना सामन्यपणे निधी व्यवस्थापक रोख्यांच्या मुदतीत कपात करतात, तर व्याजदरात कपात होत असताना रोख्यांची मुदत वाढवितात. हा फंड असे सक्रिय व्यवस्थापन करीत नाही. हा फंड दीर्घकालीन उद्दिष्टे संभाव्यतेने पूर्ण करण्यासाठी मुदतीचे निष्क्रियपणे व्यवस्थापन करतो. तुम्ही स्वत: ८ टक्के व्याजाचे आणि २५ वर्षे मुदत शिल्लक असलेले सरकारी रोखे खरेदी केलेत आणि २५ वर्षे त्यावर मिळणारे ८ टक्के व्याज पुन्हा गुंतविले तर तुमचा परतावा (यील्ड टू मॅच्युरिटी) ८ टक्के असेल. निप्पॉन निवेश लक्ष्य फंड असेच धोरण अवलंबतो. अनेक गुंतवणूकदारांचा कल अल्प कालावधीसाठी गुंतवणूक करून मुदतपूर्तीनंतर मिळालेल्या रकमेचे नूतनीकरण करण्याकडे असतो. दीर्घ मुदतीच्या वित्तीय ध्येयांसाठी अल्प मुदतीची पुनर्गुतवणूक करणे ही एक आदर्श रणनीती असू शकत नाही. कारण प्रत्येक नूतनीकरणावेळी व्याजदर कमी होण्याची जोखीम असते. नूतनीकरण कमी व्याजदरांत होणे हे टाळण्यासाठी रोख्यांच्या मुदतीचे निष्क्रिय व्यवस्थापन हा सर्वमान्य पर्याय आहे. व्याजदर कमी झाले तर रोख्यांत होणारी पुनर्गुतवणूक परताव्याच्या कमी दराने (वायटीएम) होते, आणि व्याजदर वाढले तर पुनर्गुतवणूक परताव्याच्या अधिक दराने (वायटीएम) होते. व्याजदर आणि रोख्यांचे बाजार भाव यांच्यात व्यस्त प्रमाण असल्याने व्याजदर कमी झाले तर भांडवली लाभ होतो, आणि व्याजदर वाढले तर पुनर्गुतवणूक पूर्वीपेक्षा अधिक व्याजदराने होते. गुंतवणूकदार दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सातत्याने या फंडाचा साधन म्हणून उपयोग करू शकतात. दीर्घकाळ मुदतीच्या निश्चित उत्पन्न केंद्र सरकारच्या रोख्यांमध्ये सध्याच्या उत्पन्नावर गुंतवणूक करण्याचा या फंडाचा प्रघात आहे. गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीच्या काळापासून त्यांच्या गुंतवणुकीच्या संभाव्य परताव्यावर दृश्यमानता असते. सरकारी रोखे मुदतीत निश्चित उत्पन्न देत असल्याने व्याजाचा दर परताव्याचा मुख्य स्रोत असतो. फंडाच्या गुंतवणुकीत फक्त सन २०४४, २०४५ आणि २०४६ मध्ये मुदतपूर्ती होणाऱ्या तीन रोख्यांचा समावेश आहे.

गुंतवणूकदारांनी हे लक्षात घेणे ठेवावे लागेल की कोणत्याही दीर्घ मुदतीच्या उत्पादनाला कमी कालावधीत अस्थिरतेचा सामना करावा लागतो. निश्चित उत्पन्न देणाऱ्या रोख्यांच्या बाबतीत ही अस्थिरता, व्याज दर, चलन विनिमय दर, महागाई, कर्जाची मागणी, अर्थव्यवस्थेतील रोकडीचे प्रमाण यांच्या सापेक्ष असते. म्हणूनच या फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी मागील वर्षांतील परतावा हा निकष न ठेवता, सरकारी रोखे असल्याने मोठी रोकडसुलभता आणि व्याज व मुद्दलाची उच्च सुरक्षितता हे निकष लक्षात घ्यायला हवेत. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी नियोजन आवश्यक असते. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचा लाभ देणारी वित्तीय उत्पादने शोधणे. हा फंड किमान १० वर्षे गुंतवणुकीस योग्य फंड असून त्यापेक्षा कमी कालावधीसाठी या फंडाचा विचार करू नये.

दीर्घकालीन समभाग गुंतवणुकीत अधिक परतावा मिळविण्याची क्षमता नक्कीच आहे आणि यात काही शंका नाही. परंतु गुंतवणूकदारांचा एक मोठा समुदाय आपल्या वित्तीय उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी पारंपरिक वित्तीय साधनांचा वापर करणे पसंत करतो. भारतातील बहुतेक घरगुती बचत ही गुंतवणुकीसाठी करमुक्त रोखे, आरबीआय बाँड्स, मुदत ठेवी, एंडोमेंट प्रकारच्या विमा पॉलिसी, आणि स्थावर मालमत्ता यांचा वापर करते. या गुंतवणूकदारांना समभागसंलग्न गुंतवणुकीवरील परताव्याची जाणीव असूनही समभाग गुंतवणुकीतील अस्थिरता टाळण्यासाठी, ते त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा निश्चितता आणि खात्रीशीर परतावा देणाऱ्या उत्पादनांमध्ये गुंतविणे पसंत करतात. या आधी या फंडाची शिफारस २५ जून २०१८ रोजी केली होती. वर सुरुवातीला नमूद केलेल्या कारणांनी या फंडाने अपेक्षेहून अधिक परतावा दिला आहे. म्हणूनच या फंडाची शिफारस पुन्हा एकदा करावीशी वाटते.

जपानी रमलाची रात्र या कवितेत बाकीबाब बा. भ. बोरकरांनी ‘अभिष्ट चिंतुनी आम्ही त्यांचे भिडवियले काठ, सुरेहुनी तु गडे भाजिले ओठांनी ओठ’ अशा ओळी लिहिल्या आहेत. रिलायन्स म्युच्युअल फंडाचे अधिग्रहण केल्यानंतर निप्पॉन इंडिया हा भारतातील पहिला जपानी म्युच्युअल फंड ठरला आहे. या निमित्ताने निप्पॉन इंडिया निवेश लक्ष्य फंडाची दखल घ्यावीशी वाटली नसती तर नवल ठरले असते. बाकीबाब बा. भ. बोरकरांवर गारुड केलेली जपानी संगत, या अधिग्रहणामुळे पुन्हा अनुभवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

shreeyachebaba@gmail.com