News Flash

फंडाचा ‘फंडा’… : जे जे उत्तम, उदात्त, उन्नत

पारेख यांनी गुंतवणुकीत खासगी बँकांना दिलेले महत्त्व मानदंड संरेखनाचा मिलाफ लार्जकॅप-मिडकॅपचे प्रमाण गुंतवणूक अभिमुखतेत स्पष्ट दिसून येते.

|| अतुल कोतकर

निप्पॉन इंडिया टॅक्स सेव्हर फंड

फंड गट           –        ईएलएसएस

फंडाची सुरुवात   –    २१ सप्टेंबर २००५

फंड मालमत्ता      –   ११,२१९ कोटी रु. (३१ मार्च २०२१)

मानदंड            –   एस अ‍ॅण्ड पी बीएसई १०० टीआरआय

कर वजावटीस पात्र गुंतवणूक म्हणून असलेल्या (ईएलएसएस) फंड गटामध्ये एकूण मालमत्तेनुसार क्रमवारीत ‘निप्पॉन इंडिया टॅक्स सेव्हर फंड’ तिसऱ्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या या फंडाची अलीकडे कामगिरी घसरल्याने त्याचा परिणाम फंडाच्या मालमत्तेवर झाला आहे. फंडाचे तत्कालीन निधी व्यवस्थापक अश्विानी कुमार यांच्या जागी जुलै २०२० पासून संजय पारेख यांची निधी व्यवस्थापक म्हणून नेमणूक झाली. यामागील नऊ महिन्यांच्या कालावधीतील कामगिरीत सुधारणा झाल्याने या बदलाची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.

अश्विानी कुमार यांच्यापेक्षा संजय पारेख यांची गुंतवणूक शैली खूपच भिन्न आहे. संजय पारेख हे गुंतवणुकीत वैविध्य जपताना मानदंडसापेक्ष जागरूक निधी व्यवस्थापक म्हणून ओळखले जातात. अश्विानी कुमार हे अनवट कंपन्यांत गुंतवणूक करून भांडवली लाभातून नफा कमावणारे, तर संजय पारेख मानदंडाचा भाग असलेल्या रोकड सुलभ कंपन्यांतून गुंतवणूक करून जोखीम कमी करण्यावर लक्ष केंद्रित करतात. संजय पारेख गुंतवणुकीसाठी पुरेसे वृद्धीक्षम परंतु वाजवी किंमत असलेल्या (ग्रोथ अ‍ॅट रिझनेबल प्राइस) समभागांची निवड करतात. फंडाच्या गुंतवणुकीच्या शैलीतील बदलाचे प्रतिबिंब पोर्टफोलिओच्या पुनर्रचनेत झाले आहे. उदाहरणार्थ पारेख यांनी गुंतवणुकीत खासगी बँकांना दिलेले महत्त्व मानदंड संरेखनाचा मिलाफ लार्जकॅप-मिडकॅपचे प्रमाण गुंतवणूक अभिमुखतेत स्पष्ट दिसून येते.

त्यांच्या क्षेत्रातील उद्योग-व्यवसायाचे नेतृत्व करणाऱ्या आणि दीर्घकालीन गुंतवणुकीतून भांडवली लाभरूपी परतावा देणाऱ्या कंपन्यांना संजय पारेख यांनी पसंती दिली आहे. त्यांनी गुंतवणूक धोरणात मानदंडाशी सापेक्षता राखत महत्त्वपूर्ण बदल केल्यामुळे पोर्टफोलिओमध्ये अनेक कंपन्यांचा नव्याने समावेश झाला आहे. उदाहरणार्थ तेल व नैसर्गिक वायू, कापड आणि सीमेंट अशा वैविध्यपूर्ण समभागाबाबतच्या दृष्टिकोनात स्पष्ट बदल झाला. भारती एअरटेल, सन टीव्ही नेटवर्क आणि आयनॉक्स लीजर लि.सारख्या कंपन्यांना गुंतवणुकीतून वगळण्यात आले. महाग वाटले तरी सर्वसमावेशकता जपण्याकडे पारेख यांचा कल असल्याने ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील हिंदुस्तान युनिलिव्हर आणि नेस्ले इंडिया लिमिटेडसारख्या महत्त्वाच्या समभागांना (इंडेक्स हेवीवेट्स) त्यांनी गुंतवणुकीत स्थान दिले आहे. फंडाच्या निधी व्यवस्थापकांच्या आणि पर्यायाने फंडाच्या गुंतवणूक रणनीतीत झालेल्या बदलाने फंडाची कामगिरी सातत्याने सुधारत असल्याचे आकडेवारी सांगते.

विद्यमान निधी व्यवस्थापकांच्या कार्यकाळात (जुलै २०२० ते १६ एप्रिल २०२१) फंडाची कामगिरी मानदंडसापेक्ष अव्वल ठरल्याने फंडाचा समावेश उत्कृष्ट फंड समूहात (टॉप क्वारटाइल) झाला आहे. जुलै-डिसेंबर २०२० या दोन तिमाहीच्या कामगिरीनुसार हा फंड कामगिरी क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या फंड गटात (मिडल क्वारटाइल) होता. जानेवारी-मार्च २०२१ या तिमाहीत या फंडाने स्पर्धक फंडांना चकवा देत जोरदार मुसंडी मारली. संजय पारेख हे फंड घराण्याचे अनुभवी वरिष्ठ निधी व्यवस्थापक असून गुंतवणूक आणि संशोधन क्षेत्रातील त्यांना २४ वर्षांचा अनुभव आहे. ते निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाच्या सेवेत (तत्कालीन रिलायन्स म्युच्युअल फंड) मार्च २०१२ पासून आहेत. त्यांच्या जोडीला फंड घराण्याने जुलै २०२० पासून आशुतोष भार्गव यांची सह-निधी व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली आहे. आशुतोष भार्गव हे या फंड घराण्याचे मूलभूत संशोधन प्रमुख आहेत. त्यांचा समभाग संशोधन क्षेत्रांतील संशोधन विश्लेषक म्हणून अनुभव असल्याचा दुहेरी फायदा गुंतवणूकदारांना होत आहे. परिणामी निप्पॉन इंडिया टॅक्स सेव्हर (ईएलएसएस) फंड हा या फंड गटात एक अव्वल दावेदार म्हणून उदयाला आल्याचे दिसते. ‘गुड गेट्स बेटर’ हे फंड घराण्याचे ब्रीद वाक्य आहे. फंडाची कामगिरी या ब्रीदवाक्याला अनुसरून होत असल्याने या फंडाची नवीन गुंतवणुकीसाठी शिफारस केली आहे.

atul@sampannanivesh.com

 

आम्ही जून २०२० पासून गुंतवणूक रणनीतीत बदल केले. मानदंड संलग्न समभागांचे प्रमाण (बेंचमार्क फोकस) कमी करून विशिष्ट उद्योग क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले. त्या उद्योग क्षेत्रातील ‘ग्रोथ अ‍ॅट रिझनेबल प्राइस’ सूत्रानुसार समभाग निवडीने फंडाच्या गुंतवणुकीत ‘ग्रोथ’ आणि ‘व्हॅल्यू’ यांचा समतोल साधला आहे. पोर्टफोलिओची फेररचना करताना माहिती तंत्रज्ञान, औषध निर्मिती, ग्राहक उत्पादने इत्यादी बचावात्मक क्षेत्रांना प्रतिनिधित्व दिले. एक धोरण म्हणून पोर्टफोलिओची अस्थिरता कमी करणे आणि कार्यक्षमता वाढविण्याकडे लक्ष दिल्याचे प्रतिबिंब मागील १० महिन्यांत फंडाच्या कामगिरीत दिसून येते. – संजय पारेख,  वरिष्ठ निधी व्यवस्थापक, निप्पॉन इंडिया टॅक्स सेव्हर फंड

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 12:02 am

Web Title: nippon india tax saver fund akp 94
Next Stories
1 रपेट बाजाराची : अस्वस्थ, पण आशावादी!
2 बाजाराचा तंत्र-कल : सापशिडीचा खेळ
3 गोष्ट रिझर्व्ह बँकेची : यशस्वितेसाठी सरकारची जय्यत तयारी
Just Now!
X