सोन्यातील गुंतवणूक करणारे अथवा सोने खरेदीला सरवालेल्यांची या मौल्यवान धातूच्या खरेदीच्या प्रयोजनाची खास कारणे ठरली आहेत. अतिशयोक्ती नाही पण सोने खरेदी ही काहींची सवय बनून गेली आहे. याला आपल्या समाजात निश्चितच एक चांगली सवय मानली जाते आणि सोन्यातील या गुंतवणुकीचे आपण ‘कसे सोने केले’ हा या मंडळींचा आवडता विषय असतो.
समाजात एकच सवय अनेकांमध्ये प्रदीर्घ काळापासून प्रचलित असेल तर तिला प्रथेचे रूप प्राप्त होते. सोन्यातील गुंतवणुकीनेही आपल्याकडे प्रथेचे रूप धारण केले आहे. त्यामागे अनेक सामाजिक, धार्मिक, आर्थिक अथवा सांस्कृतिक कारणे आहेत. पण त्यांचे समाजशास्त्रीय विश्लेषण हा आपला विषय नाही. या प्रथेला एका पिढीकडून दुसरीकडे वारसा रूपातही पाहिले जाते. पण पूर्वापार चालत असलेल्या सर्वच प्रथा बरोबरच असतात असे नाही. नव्या संदर्भात प्रत्येक जुन्या गोष्टीचे निरीक्षण-परीक्षण जसे आवश्यक असते, तसेच या प्रथेकडेही आपण पाहिले पाहिजे.
सोने खरेदीच्या या प्रथेमागील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, भविष्यात मुलाच्या लग्नानंतर येणाऱ्या वधूला अथवा बोहल्यावर चढणाऱ्या मुलीला तिच्या लग्नासमयी देण्यासाठी केलेली ही तजवीज आहे. पण नव्या युगातील मुला-मुलींना खरेच सोन्याचा इतका सोस आहे काय, हे कुणी विचारत नाही, लक्षातही घेत नाही.
दुसरे कारण हे सुरक्षिततेचे आहे. लोकांना कायम वाटत असते की सोने ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. ही धारणा संपूर्णपणे चुकीची आहे. सोन्याच्या शुद्धतेचा प्रश्न आहेच. सोन्याच्या दागिन्यांबाबत तो अधिकच गंभीर स्वरूपाचा आहे. शिवाय हे दागिने घडविण्यासाठी सोन्याच्या वास्तविक मूल्यापेक्षा २०-३० टक्के अधिक दाम आपण चुकवत असतो. चेन चोरीच्या संघटित गुन्ह्य़ाच्या ताज्या घटना हेच सुचवितात की, सोने गळ्यात घालून हिंडणे हे जिवावर संकट ओढवून घेण्यासारखेच आहे. मग सोने सुरक्षित कसे म्हणता येईल? मागच्या जमान्यात गुंतवणुकीच्या साधनांची मुबलकता व परिचय नसताना, विनाविलंब व सुलभपणे खरेदी-विक्री शक्य असलेल्या सोन्यात पैसा घालण्याला पसंती मिळणे समजण्यासारखे होते. परंतु आज बाजारात सोन्यापेक्षा सुरक्षित व अधिक तरल गुंतवणुकीच्या एक ना अनेक योजना उपलब्ध आहेत.
आर्थिक कारणांतूनही सोन्याची खरेदी होते. त्यासाठी एक हमखास तर्क दिले जाते, सोन्याच्या किमती निरंतर वाढतच राहतील. सोन्यातील गुंतवणूक किमान महागाई दराला मात देणारी तरी आहे वगैरे. हे तर्कटही वस्तुस्थितीला धरून नाही.
सोन्याच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यवहारांतून ठरतात. तर महागाई दर देशांतर्गत बाजारातील किमतींवर ठरतो. मग दोहोंमध्ये अनोन्यसंबंधाचा प्रश्नच येत नाही.
२०११ सालापासून सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमती प्रति औंस १९०० डॉलरवरून घटून आता ११०० डॉलरच्या आसपास आल्या आहेत. यातील वापरलेले एकक – औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम होय. म्हणजे भारतीय रुपयांत एक तोळे (१० ग्रॅम) सोन्याच्या किमती या कालावधीत ३३ हजार रुपयांवरून आता २६,००० रुपयांच्या आगेमागे उतरल्या आहेत. याचा अर्थ मागील चार वर्षांत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. त्या उलट याच काळात महागाईने भयानक डोके वर काढले आहे.
तपशिलाने पाहिल्यास सोन्याने दीर्घ काळात बँकेतील मुदत ठेवींइतकाच परतावा दिला आहे. यामुळे सामाजिक, आर्थिक आणि सुरक्षेच्या पैलूवर सोन्याच्या अस्सलतेचे परिमाण आज तरी गैरलागू ठरले आहे.

>  लेखक निर्मल बंग सिक्युरिटीजचे सल्लागार

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर