|| अजय वाळिंबे

अरिवद मफतलाल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज समूहाची नोसिल लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी रबर केमिकल्स उत्पादक आणि पुरवठादार कंपनी आहे. कंपनीचे दोन प्रमुख उत्पादन प्रकल्प महाराष्ट्रात ठाणे तर गुजरातमध्ये दहेज आणि वापी येथे आहेत. कंपनीच्या मुख्य उत्पादनांमध्ये पिल्नॉक्स, पिल्कर, पिल्फ्लेक्स आणि पिलक्युएर, मोनोकील इ.चा समावेश होतो. कंपनीची उत्पादने मुख्यत्वे टायर उत्पदांनासाठी वापरली जातात. पॉलिओलिफिन्सचे कंपनीत विलीनीकरण झाल्यानंतर २००६-०७ मध्ये कंपनीने वापी येथील पीआयएल केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे नाव सुश्रीपाडा प्लास्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड) ताब्यात घेतली. त्यामुळे नोसिल आज केवळ रबर केमिकल कंपनी नसून प्लास्टिक उत्पादनही करते.

कंपनीने गेली काही वर्षे सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवली असली तरी सध्या वाहन क्षेत्रातील मंदीचा थोडा फार परिणाम कंपनीच्या कामकाजावर झालेला दिसतो. मात्र कंपनीने सातत्याने संशोधनावर भर देऊन तसेच भांडवली खर्च करून दहेज येथील प्रकल्पातील पहिला टप्पा पूर्ण करून उत्पादन सुरू केले आहे. विस्तारीकरणाचा दुसरा टप्पा लवकरच, सहा महिन्यांत पूर्ण होऊन कंपनीची उत्पादनक्षमता दुपटीने म्हणजे सुमारे ११०,००० टनांपर्यंत वाढेल. ही उत्पादनक्षमता जागतिक क्षमतेच्या १० टक्के आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीची उत्पादनक्षमता वाढूनही उत्पादन खर्च मात्र कमी झाला आहे आणि तो अजूनही कमी होईल. त्यामुळे नफ्याची मार्जन्सिदेखील वाढतील. भारतीय तसेच जागतिक बाजारपेठेत रबर केमिकल्सना मोठी मागणी असून सध्या चीनच्या परिस्थितीचा नोसिलला नक्की फायदा मिळेल.

कुठलेही कर्ज नसलेली नोसिल उत्तम प्रवर्तक, सातत्याने गुणवत्ता राखणारी उत्पादन शैली आणि उत्पादनांना वाढती मागणी यामुळे आकर्षक खरेदी ठरते. दोन वर्षांपूर्वी हा शेअर १०७ रुपयांना सुचविला होता. ज्या गुंतवणूकदारांनी तो २३० रुपयांना विकला असेल त्यांनी फायदा केलाच आहे. मात्र आता त्यांना आणि नवीन गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा खरेदीची संधी आहे. सध्या १३५ रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर तुम्हाला दोन वर्षांत ५० टक्के परतावा देऊ शकेल.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.