28 November 2020

News Flash

बंदा रुपया : व्यावसायिकता-समाजभानाची ‘युनिटी’

आई स्थानिक पातळीवर राजकीय पटलावर कार्यरत. तर विमान अपघातात गमावलेले बंधू.

वीरेंद्र तळेगावकर

कॉलेजचे दिवस म्हणजे अधिकतर मैत्रीखातर लक्षात राहणारे दिवस. व्यक्तिगत परिस्थिती कशीही असली तरी मित्रांच्या सहवासात दिवस विनासायास निघून जात. ओळख अल्पावधीत झालेली, सहवासही अल्प-स्वल्पच तरी तो काळ आयुष्याची जमापुंजी वाटू लागतो. प्रसंगी रक्ताची नातीही दुय्यम ठरतात असे जिवाभावाचे मित्र मिळणे भाग्याचेच. अशाच मैत्रभावाला आंतरिक ऊर्मीची जोड देऊन एका तरुणाने व्यावसायिकतेचा प्रवास सुरू केला. या प्रवासात इच्छित ठिकाण (ध्येय) गाठण्याबरोबरच वाटेत येणारे सामाजिक, शैक्षणिक थांबे हे तर न टाळता येण्यासारखेच. मैत्री आणि ऊर्मीचे हे उद्यम मंथन असलेल्या युनिटी मेडिकेअरबद्दल.

कॉलेजमध्ये जमलेला मित्रांचा गोतावळा आणि विविध निमित्ताने मिळालेली नेतृत्व करण्याची संधी यामुळे सागर पायगुडेचे पुण्यातील महाविद्यालयीन दिवस मजेत सुरू होते. औषधनिर्माणशास्त्र विषयातील पदविका अभ्यासक्रमासाठी ग्रामीण भागातून आलेल्या सागरची कौटुंबिक पाश्र्वभूमी तशी माफकच. वडील सैन्यात होते. आई स्थानिक पातळीवर राजकीय पटलावर कार्यरत. तर विमान अपघातात गमावलेले बंधू.

पुण्यातील महाविद्यालयात शिकत असताना केवळ एका महिला शिक्षिकेच्या ग्रामीण भागातील मुलांबद्दलच्या वागणुकीने सागरला पुरते ढवळून काढले. मित्रांसमवेत मग थेट संबंधित शिक्षिका, समस्त शिक्षकवर्ग आणि थेट महाविद्यालयाचे व्यवस्थापन, विश्वस्त यांच्याविरोधात लढा सुरू झाला. यातून निलंबनासारख्या कारवाईने शिक्षण सोडण्याची वेळही आली.

मात्र आपली चूक नसेल तर आपल्या मतांवर ठाम राहावे, संघर्ष करीत राहावा, प्रसंगी होणाऱ्या परिणामांसाठीही तयार राहावे, ही पालकांची शिकवण सागर यांनी या कटू दिवसात जोपासली. ज्यांच्यासाठी संघर्ष केला तेही अखेपर्यंत सोबत राहिले. स्वत:सह संघर्षकर्ते मित्रही या दरम्यानच्या कोणत्याही आमिषाला बळी पडले नाहीत. हा लढा त्यांनी जिंकला. शिक्षणातून हद्दपार होण्याचा कलंकही दूर झाला.

या मैत्रीचे ऋण म्हणून नव्हे तर ही मैत्रीचा बंध घट्ट करण्यासाठी मग युनिटीची मुहूर्तमेढ रोवली गेली. औषधनिर्माणशास्त्राचे शिक्षण पूर्ण झाले. युनिटी मेडिकेअरचे पहिले दालन पुण्यातील वारजेत २०१३ मध्ये सुरू झाले. सागर पुढे व्यवसाय व्यवस्थापनातील उच्चशिक्षणासाठी न्यूझीलंडला गेले. दरम्यान, त्यांचे मित्र आणि सहकारी शिवाजी गदादे यांनी युनिटीचा १० ते १२ दालनांपर्यंत विस्तार केला. सागर परत येईपावेतो दालनांची संख्या दोन डझन झाली होती.

वडिलांकडून ८० हजार आणि दोन लाख रुपयांचे कर्ज या आर्थिक पाठबळावर सुरू झालेल्या युनिटीची आज संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास ८५ दालने झाली आहेत. युनिटी मेडिकेअरच्या पंखाखाली यूएम फार्मा ही घाऊक औषध खरेदी-विक्री करणारी कंपनी तसेच आषधनिर्मिती-विपणन क्षेत्रातील कंपनी, वेललाइव्ह ट्रेड ही ताजिकिस्तानातील निर्यात कंपनी, आरोग्यनिदान चाचणी क्षेत्रातील कंपनी, सामाजिक क्षेत्रातील विश्वस्त संस्था असा सारा पसारा त्यांनी फैलावत नेला आहे.

सागर यांच्याशी बोलताना त्यांची व्यवसायाबाबतची, विशेषत: ग्रामीण भागातील तरुणांमधून उद्यमशील नेतृत्व घडविण्याविषयीची कणव अधिक भासते. यासाठी ते स्वत: औषधनिर्माणशास्त्राबरोबरच अन्य व्यावसायिक संधी आणि आवश्यक पूरक पावले याबाबत सतत आणि विनामूल्य मार्गदर्शन करत असतात. अगदी ज्या महाविद्यालयात त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा बाका प्रसंग आला तेथूनही त्यांना मार्गदर्शनासाठी बोलावणे येते.

ते नव्या पिढीला मार्गदर्शन करतात. यासाठी विविध देशांतील त्यांच्या मित्रांचे जाळे त्यांना उपयोगी ठरते. एवढेच नव्हे तर औषधनिर्माणशास्त्र पदविकाधारक म्हणजे केवळ मेडिकल स्टोअर काढणारा, असे नव्हे तर अन्य क्षेत्रांतील करिअरबाबतही ते मार्गदर्शन करतात. शिक्षण आणि उद्योग यांची मोट बांधून उद्यमशीलतेबरोबरच समाजाचे पांग फेडण्याची सागर यांची ऊर्मी त्यांच्यापुरतीच नाही, तर या प्रवाहात साऱ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे त्यांचे ध्येय व कार्य आहे.

देशातील आरोग्य निगा, औषध उद्योगानेही तंत्रस्नेही कास धरली आहे. अनेक नियम, अटींमध्ये हा उद्योग अद्यापही गुरफटलेला आहे. मात्र महाराष्ट्रासारख्या राज्यात, ग्रामीण भागातील असंघटित अशा औषधविक्री दालनांना एकत्र आणून सध्याच्या भक्कम अशा तंत्रस्नेही मातबरांना टक्कर देण्याचे सागर यांचे मनसुबे कायम आहेत. राज्यात येत्या चार वर्षांत युनिटी मेडिकेअर दालनांची संख्या २,१०० तर संपूर्ण भारतात ती १५,००० पर्यंत नेण्याचे त्यांचे व्यवसायविस्तार धोरण आहे.

सागर हे ज्या भागातून आले त्या मातीच्या सामाजिक आणि मानवी भावनांची जाणीव त्यांना आहे. म्हणूनच आपल्या व्यवसायामार्फत ग्रामीण भागाच्या उत्थानाबरोबरच या भागातील नवतरुणांच्या प्रोत्साहनार्थ त्यांची युनिटी कार्यरत आहे. दर रविवारी गरजूंना मोफत आरोग्यनिदान चाचणी उपलब्ध करून देणे, हुशार विद्यार्थ्यांना उपयुक्त शालेय साहित्य पुरविणे, मुलींना नवरात्रीत मोफत औषध देणे, वारकऱ्यांना दिंडी प्रवासादरम्यान वैद्यकीय वस्तू पुरविणे आदी सामाजिक उपक्रम युनिटीमार्फत सुरू असतात.

सागर यांच्याकडे नेतृत्वगुण आहे आणि त्यांचा जनसंपर्क दांडगा आहेच. महाराष्ट्राची, ग्रामीण भागाची पुरती ओळख आहे, पण तरी सागर यांना राजकारणात जायचे नाही. देशात अधिकाधिक उद्यमशील तरुण तयार व्हावेत आणि रोजगाराच्या मुख्य प्रवाहात त्यांचे स्थान अधिक बळकट व्हावे हीच त्यांची सामाजिक ऊर्मी आणि अर्थात व्यावसायिक गरजही आहे.

सागर पायगुडे                     

युनिटी मेडिकेअर

’ व्यवसाय  :  औषधविक्री दालनांची साखळी

’ विस्तार  :  एकूण दालने ८५, भांडारगृह – २

’ प्राथमिक गुंतवणूक     : २.८० लाख रुपये

’ सध्याची उलाढाल             : वार्षिक  २५ कोटी रुपये

’ कर्मचारी संख्या  :  २५  नियमित

’ संकेतस्थळ : www.unitymedicare.in

लेखक ‘लोकसत्ता’चे मुंबईस्थित व्यापार प्रतिनिधी

veerendra.talegaonkar@expressindia.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल: arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 12:06 am

Web Title: notable marathi entrepreneurs top marathi udyogpati zws 70
Next Stories
1 अर्थ वल्लभ : पंत मेले राव चढले
2 थेंबे थेंबे तळे साचे : बाजार उसळला.. का बरं?
3 क्षण लक्ष्यपूर्तीचे!
Just Now!
X