23 November 2020

News Flash

कांद्यासाठी अच्छे दिन

मागील पंधरवडय़ात भारतीय जनता पक्षाचा थोडा आश्चर्यकारकपणे प्रचंड विजय झाला

|| श्रीकांत कुवळेकर

आले देवाजीच्या मना म्हणण्याऐवजी आता आले डोनाल्डजीच्या मना अशी एकंदर परिस्थिती केवळ कमॉडिटीच नाही तर भांडवल आणि चलन बाजारामध्येदेखील आहे..

मागील पंधरवडय़ात भारतीय जनता पक्षाचा थोडा आश्चर्यकारकपणे प्रचंड विजय झाला असून नवीन मंत्रिमंडळाने धडाक्याने कामालादेखील सुरुवात केली आहे. धडाक्याने अशासाठी कीशुक्रवारी झालेल्या पहिल्याच कॅबिनेट बठकीमध्ये शेतकरी सन्मान योजनेचा विस्तार करून काही कोटी अधिक शेतकऱ्यांचा योजनेत समावेश केला गेला आहे. छोटय़ा आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी, तसेच छोटय़ा व्यापाऱ्यांसाठीदेखील पेन्शन योजना आणि महत्त्वाचे म्हणजे गाय आणि म्हशींमध्ये ‘फूट आणि माऊथ’ रोग होऊ नये यासाठी मोफत लसीकरण असे निर्णय घेतले गेले आहेत.

मात्र त्याच वेळी देशाचे आर्थिक विकासाचे आकडे प्रसिद्ध झाले आहेत जे अत्यंत चिंताजनक आहेत. मागील तिमाहीत देशाच्या आर्थिक विकासाच्या दराने मागील २० तिमाहीमधील नीचांक गाठला आहे, कृषी विकास उणे ०.१ टक्क्यांवर घसरला आहे. देशातील जवळपास ४० टक्के भागात दुष्काळाची पाश्र्वभूमी पाहता तसेच येऊ घातलेल्या पावसाळ्यावर प्रश्नचिन्ह असताना सरकारला अनेक आव्हानांना तोंड द्यायला लागणार आहे. आता ५ जुल रोजी नवीन अर्थसंकल्प सादर केला जाईल तेव्हा आर्थिक क्षेत्राबद्दल दिशा स्पष्ट होईल.

आता बाजाराकडे वळू या. मेच्या पहिल्या पंधरवडय़ात कापसाच्या किमतींमध्ये अमेरिकेमध्ये सुमारे १५ टक्के घसरण झाल्यामुळे येथे भीतीदायक चित्र उभे झाले होते. अमेरिकेमधील विक्रमी उत्पादनाच्या अंदाजाने आलेली ही घसरण मागील पंधरवडय़ात जवळपास भरून निघाली आहे. अमेरिकेमध्ये चालू असलेल्या जोरदार पावसामुळे कापसाच्या पेरणीवर परिणाम झाला असून पुढील काळात तेथील उत्पादनाचे अंदाज कमी होतील या अपेक्षेने बाजारामध्ये सुधारणा झाली आहे. अर्थात चीनमागोमाग अमेरिकेने मेक्सिकोविरोधात आर्थिक निर्णय घेण्यास सुरुवात केल्यामुळे तसेच युरोपची खालावणारी आर्थिक स्थिती आणि आखाती देशांमधील परिस्थितीमुळे बाजारात काहीही होऊ शकते. थोडक्यात, जागतिक स्तरावर पाहता, आले देवाजीच्या मना म्हणण्याऐवजी आता आले डोनाल्डजीच्या मना अशी एकंदर परिस्थिती केवळ कमॉडिटीच नाही तर भांडवल आणि चलन बाजारामध्येदेखील आहे.

या पाश्र्वभूमीवर भारतात पुढील काही महिन्यांसाठी कांदे उत्पादकांसाठी  ‘अच्छे दिन’ येताना दिसत आहेत. तसे पाहता मागील काही वर्षांत जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये कांद्यामध्ये तेजी आलेली पाहायला मिळाली आहे. पावसाळ्यामुळे एकीकडे खप वाढत असतो तर दुसरीकडे साठवणूक केलेला कांदा सडण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. तसेच या काळात देशात कोठेही कांद्याचा नव्याने पुरवठा होत नसल्यामुळे मागणी पुरवठा हे समीकरण ढोबळपणे तेजीच्या दिशेने झुकत असल्याने भाव वाढतात असा अनुभव आहे. आता मागणी पुरवठय़ाची स्थिती पाहू.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या बागायती शेती उत्पादनाच्या दुसऱ्या सरकारी अनुमानानुसार कांद्याचे २०१८-१९ या वर्षांतील उत्पादन २३२ लाख टन म्हणजे मागील वर्षांइतकेच राहणार असल्याचे सांगितले आहे. पहिल्या अनुमानामध्ये हाच आकडा २३६ लाख टन होता. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थानमधील प्रचंड दुष्काळामुळे ही चार लाख टनांची कपात केली गेली असावी. अर्थात सरकारी आकडे थोडे फुगवलेले असतात हा अनुभव आहे. व्यापारी सूत्र आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी तसेच काही राज्ये यांनी प्रसिद्ध केलेली पेरणीची आकडेवारी एकत्रित केली असता महाराष्ट्राबरोबरच बहुतेक प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये तिन्ही हंगामांचा विचार करता लागवड क्षेत्रामध्ये ८-१० टक्के घसरण झाली असल्याची शक्यता आहे.

मात्र बिगरमोसमी पावसाने या वर्षी फारच थोडी हजेरी लावल्यामुळे आणि एकंदरीत हवामान कांद्याला चांगले राहिले असल्यामुळे उत्पादकता तुलनेने बरी राहिली आहे. त्यामुळे एकंदर उत्पादनामधील घट ५ टक्के एवढीच राहिली असल्याची शक्यता आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी निर्यात निदान पाच लाख टन तरी अधिक राहणार असल्यामुळे एकंदर पुरवठा ढोबळपणे सरकारी आकडय़ापेक्षा १५ लाख टन एवढा कमी असणार हे नक्की. सध्या देशात आलेल्या उष्णतेच्या लाटेचा परिणाम साठवणुकीचा कांदा लवकर कुजण्यात होत असून त्यामुळेदेखील पुरवठय़ावर विपरीत परिणाम होत आहे.

दुसरीकडे कांद्याच्या देशांतर्गत मागणीत दर वर्षी २-३ टक्क्यांची वाढ होताना दिसत आहे. याबद्दल निश्चित आकडेवारी उपलब्ध नसली तरी कांद्याचा मुख्य खप असलेल्या हॉटेल उद्योगाच्या वाढीचा दर ग्राह्य़ धरण्यास हरकत नसावी.

वरील परिस्थितीचा परिणाम यापूर्वीच दिसू लागला आहे. घाऊक बाजारातील कांद्याचा दर ८०० रुपयांवरून महिन्याभरात १,३०० रुपयांवर गेला असून किरकोळ बाजारात कांद्याने कधीच विशी पार केली आहे. घाऊक दरांत पुढील सहा-आठ आठवडय़ांत अजून ५०-६० टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे, तर किरकोळ कांदा थोडय़ा काळासाठी का होईना चाळिशी गाठू शकतो. अर्थात त्यामुळे माध्यमांमध्ये आणि इतरत्र टीकेची झोड उठवण्यात काहीच अर्थ नाही हे लक्षात घेतले पाहिजे. वर्षांतील १० महिने तोटय़ात किंवा नगण्य फायद्यात कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या खिशात एक-दोन महिने थोडे पसे खुळखुळले नाहीत तर पुढील वर्षांत कांदा खायचा वांदा होईल हे लक्षात घेतले पाहिजे. ग्राहकांनीसुद्धा हे विचारात घ्यावे की, केवळ एकदा हॉटेलमध्ये जेवणे जरी टाळले तरी या एक-दोन महिन्यांत कांद्यामुळे वाढलेले गृहखर्चाचे बजेट सहजपणे आटोक्यात येईल.

उत्पादकांनीदेखील हे लक्षात घेतले पाहिजे की, अधिकची हाव न धरता तेजीच्या काळात आपला माल शिस्तबद्ध रीतीने विकत राहिला पाहिजे. नवीन सरकारने कांद्याचा ५०,००० टन बफर स्टॉक उभारण्याची घोषणा केली असली तरी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. अगदी दोन-पाच हजार टनांची आयात करण्याची घोषणा केली तरी उगाच आटापिटा करण्याची गरज नाही. कारण आपला देश ५०,००० टन कांदा केवळ एका दिवसात फस्त करतो. सरकार आपले काम करत राहील, उत्पादकांनी पुरवठा नियंत्रित करावा म्हणजे अच्छे दिन जास्त दिवस राहतील.

पाऊसमानाचे काय..?

आता थोडे पावसाविषयी. गेले दोन महिने नर्ऋत्य मोसमी पावसाबद्दल अत्यंत चिंतेचे वातावरण असताना भारतीय हवामान खात्याने परत एकदा जवळपास सर्वसाधारण पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थात जूनमधील पावसाचे आगमन लांबल्यामुळे आणि एकंदरीत पेरणीच्या दृष्टीने महत्त्वाच्या महिन्यात पाऊसमान कमी राहण्यामुळे पीकपाण्यावर थोडा विपरीत परिणाम होणार आहेच. परंतु हवामान खात्याचे अंदाज खरे ठरल्यास सर्वाबरोबरच विशेषत: दूध उत्पादकांना चांगलाच दिलासा मिळेल.

सध्या दूध उत्पादक विचित्र कात्रीत सापडले आहेत. एकीकडे दुष्काळामुळे चाऱ्याची तीव्र टंचाई भासत असताना सरकीची पेंड दररोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. या वर्षांत सरकी पेंड १,५०० रुपये प्रति क्विंटलवरून आता २,८०० रुपयांवर पोहोचली असून लवकरच तिचा भाव ३,००० रुपयांवर पोहोचेल असा अंदाज आहे. चाऱ्याचे भावदेखील बऱ्याच ठिकाणी तिप्पट झाल्यामुळे, तसेच इतर पशुखाद्याचे भाव त्याच प्रमाणात वाढल्यामुळे सरकी पेंडीला पर्याय नाही अशी परिस्थिती आहे, तर दुसरीकडे दूध खरेदी भावात वाढ न झाल्यामुळे आणि पाणीटंचाईमुळे असलेले पशुधन टिकवताना शेतकऱ्यांची दयनीय स्थिती होताना दिसत आहे. लवकर आणि सर्वदूर पाऊस आल्यास या परिस्थितीमध्ये चांगला बदल घडेल. बघू या देवाजीच्या मनात काय आहे.

ksrikant10@gmail.com

(लेखक वस्तू बाजार विश्लेषक )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 12:18 am

Web Title: onions production
Next Stories
1 नकुशा मालमत्ता
2 कर्जरहित कंपनीचा – हाय-बीटा शिलेदार
3 ते आले, त्यांनी जिंकले..
Just Now!
X