News Flash

बाजाराचा तंत्र-कल : दिसते मजला सुखचित्र नवे!

गेल्या २९ वर्षांचा आढावा घेता दर आठ वर्षांनी निर्देशांक आपला उच्चांक अथवा नीचांक नोंदवतो.

निर्देशांकावरील उच्चांक-नीचांकाचे आठ वर्षांचे चक्र.

आशीष ठाकूर ashishthakur1966 @gmail.com

भाग दुसरा

एखाद्या घोडेस्वाराला भरधाव घोडय़ावरून रपेट करताना त्या घोडय़ाचा विद्युल्लतेसारखा वेग, त्या वेगातील थरार, रोमहर्षकता अनुभवायची असते. या प्रक्रियेत एखाद वेळेला घोडा बिथरू शकतो. घोडेस्वाराचे ‘घालीन लोटांगण वंदीन भूमातेचे चरण’देखील घडू शकते. हेच मनात गृहीत धरून घोडदौड केली जाते. असेच काहीसे तेजीच्या घोडदौडीबद्दल बोलता येईल. या बाजारात उद्या काय घडेल याची शाश्वती नाही, तर इथे थेट २०२४ सालापर्यंतची वाटचाल कशी काय रेखाटायची? बरे २०२४ पर्यंतच का? २०२४ साल निवडण्यामागचा तर्क काय? या सर्व प्रश्नांचा आज आढावा घेऊ या.

साल २०२४ निवडण्यामागचे तर्कशास्त्र

१) निर्देशांकावरील उच्चांक-नीचांकाचे आठ वर्षांचे चक्र.

२) लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर निर्देशांक नीचांकापासून दुप्पट होतो.

प्रथम आपण आठ वर्षांच्या तेजी-मंदी चक्राचा आढावा घेऊ या.

गेल्या २९ वर्षांचा आढावा घेता दर आठ वर्षांनी निर्देशांक आपला उच्चांक अथवा नीचांक नोंदवतो. जसे की- १९९२ अधिक आठ वर्ष २०००, २००८, २०१६, २०२४.

* १९९२ साली मुंबई शेअर बाजाराचा उच्चांक (सेन्सेक्सचा) उच्चांक ४,५५६ (ज्याला हर्षद मेहेताची तेजी संबोधतात.)

* २००० साली माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांची तेजी. सेन्सेक्स ६,००० चा, निफ्टीने २,२०० चा उच्चांक नोंदवला (केतन पारेख, डॉट.कॉम बूम)

* २००८ च्या जागतिक महामंदीच्या अगोदर १० जानेवारीला सेन्सेक्सचा २१,००० आणि निफ्टीचा ६,३०० चा उच्चांक.

* २०१६ साली निर्देशांकांनी २९ फेब्रुवारीला सेन्सेक्सवर २३,००० आणि निफ्टीवर ६,८०० चा नीचांक.

आता वरील आठ वर्षांच्या तेजी-मंदी चक्राचा आढावा घेता साल २०१६ + ८ वर्षे पकडता २०२४ सालाचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते व याच पाऊलखुणांवर वाटचाल करायची म्हटले तर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यादेखील २०२४ साली नियोजित आहेत. अशा रीतीने २०२४ हे वर्ष निर्धारित केले आहे.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर निर्देशांक नीचांकापासून दुप्पट होतो या विधानाचा आढावा घेण्यासाठी इतिहासात डोकावून पाहता..

* १९८४ साली राजीव गांधी यांचे सरकार आल्यावर मुंबई शेअर बाजार निर्देशांक (सेन्सेक्स) २७० वरून ६५० झाला.

* १९८९ साली विश्वनाथ प्रताप सिंग यांचे सरकार आल्यावर सेन्सेक्स ६८० वरून १६०० वर झेपावला.

* १९९१ साली पी.व्ही. नरसिंह राव यांचे सरकार सत्तेवर आल्यावर सेन्सेक्स १,९०० वरून ४,५४६ झाला.

* १९९६ साली देवेगौडा यांचे सरकार सत्तेवर आल्यावर सेन्सेक्स २,७४० वरून ४,६०५ झाला. (अपवाद सेन्सेक्स दुप्पट न होता ६८ टक्केच वाढ.)

* १९९८ साली अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेवर आल्यावर सेन्सेक्स २,७४० वरून ६,१५० वर झेपावला.

* २००४ साली मनमोहन सिंग यांचे सरकार सत्तेवर आले तेव्हा सेन्सेक्स ३,००० वरून २१,००० झाला.(पाच वर्षांत सातपट वाढ.)

* मे २०१४ साली नरेंद्र मोदी यांचे सरकार आले तेव्हा सेन्सेक्स २३,००० आणि निफ्टी निर्देशांक ६,८०० वर होता आणि त्या पातळीवरून नुकतेच सेन्सेक्सने ५२,३८९ आणि निफ्टी निर्देशांकाने १५,७३३ चा ऐतिहासिक उच्चांक नोंदवला.

आता निर्देशांकाचा उच्चांकाचा कळस हा २०२४ साल असेल तर.. त्याच्या पायाभरणीचा, मैलाचा दगड काय असेल त्याचा आढावा घेऊ या.

आताच्या घडीला सेन्सेक्सचा पायाभरणीचा स्तर हा सेन्सेक्सवर ४७,२०० आणि निफ्टीवर १४,१५० असा असेल. करोनाच्या दाहक परिस्थितीतही निर्देशांक हे स्तर राखण्यात यशस्वी ठरले आहेत. येणाऱ्या दिवसात निर्देशांकांनी सेन्सेक्स ५२,७०० ते ५०,८५० आणि निफ्टी १५,५०० ते १५,००० चा स्तर राखण्यात यशस्वी ठरला तर निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ५३,२०० आणि निफ्टीवर १६,००० असेल. या स्तरावरून एक घसरण अपेक्षित असून, तिचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ५२,७०० ते ५०,००० आणि निफ्टीवर १५,५०० ते १५,००० असेल.

मैलाचा दगड :

सेन्सेक्सवर ५०,८५० आणि निफ्टीवर १५,००० चा स्तर राखल्यास फिरून तेजी अपेक्षित असून तिचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ५६,२०० ते ५७,००० आणि निफ्टीवर १७,००० ते १७,४०० असेल. या स्तरावरून निर्देशांकावर घातक घसरण संभवते व ही घसरण सेन्सेक्सवर ५०,८५० ते ४९,००० आणि निफ्टीवर १५,००० ते १४,५०० पर्यंत असेल.

सेन्सेक्सवर ५०,८५० ते ४९,००० आणि निफ्टीवर १५,००० ते १४,५०० या स्तराचा आधार घेत निर्देशांकांची कळसाकडे म्हणजे सेन्सेक्सची ६०,००० ते ६६,००० आणि निफ्टीवर २०,००० ते २२,००० पर्यंतची वाटचाल सुरू होईल.

पुढील लेखात तेजीच्या घोडदौडीला अटकाव होण्याची कारणे जाणून घेऊ या.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 1:02 am

Web Title: opportunities in stock market business opportunities in stock market zws 70
Next Stories
1 फंडाचा ‘फंडा’.. : एक वेस ओलांडता, गांव नवे दिसू लागले
2 गोष्ट रिझव्‍‌र्ह बँकेची : खासगी सावकारी संपविण्यासाठी अथक प्रयत्न
3 क.. कमॉडिटीचा : आयात शिथिलीकरणानंतर कडधान्य बाजारात मरगळ
Just Now!
X