News Flash

माझा पोर्टफोलियो : आम्लराज उत्पादनातील स्मॉल कॅप मक्तेदार

करोना महामारीमुळे कंपनीच्या कामकाजावर सुरुवातीला विपरीत परिणाम झाला होता.

(संग्रहित छायाचित्र)

अजय वाळिंबे

ओरिएंटल कार्बन अँड केमिकल्स

(बीएसई कोड – ५०६५७९)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ८८२

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु.१०२०/४७०

वर्ष १९७८ मध्ये स्थापन झालेली धारुहेरा केमिकल्स लिमिटेड ही १९८४ मध्ये ओरिएंटल कार्बन लिमिटेडमध्ये विलीन झाली आणि कंपनीचे नामकरण ओरिएंटल कार्बन अँड केमिकल्स लिमिटेड (ओसीसीएल) झाले. ओसीसीएलने अघुलनशील अर्थात इन्सॉल्युबल सल्फरच्या (आयएस) उत्पादनासाठी अत्याधुनिक उत्पादन सुविधा स्थापित केली, जी आता कंपनीचे प्रमुख उत्पादन आहे. ओसीसीएल देशांतर्गत बाजारात आयएसची एकमेव प्रमुख उत्पादक आहे. या खेरीज कंपनी सल्फ्युरिक अ‍ॅसिड आणि ऑलियम देखील उत्पादित करते. कंपनीचे हरियाणातील धारुहेरा येथे दोन प्रकल्प असून त्यापैकी वार्षिक १२,००० मेट्रिक टनांचा आयएस प्रकल्प, तर दुसरा वार्षिक ४६,००० मेट्रिक टनांचा सल्फ्युरिक अ‍ॅसिड आणि ओलियम उत्पादनाचा प्रकल्प आहे. तसेच कंपनीचा गुजरातेतील मुंद्रा एसईझेड येथे देखील वार्षिक २४,००० मेट्रिक टनांचा आयएस प्रकल्प आहे. अघुलनशील सल्फरची (आयएस) बहुतेक मागणी ऑटोमोटिव्ह टायर उद्योगातून केली जाते. कंपनीचा भारतीय बाजारपेठेत जवळपास ५५-६० टक्के हिस्सा असून जागतिक बाजारपेठेत जवळपास १० टक्के वाटा आहे. ओसीसीएलने देशांतर्गत तसेच जागतिक बाजारातील सर्व टायर उत्पादकांना प्राधान्य दिलेला पहिला / दुसरा पुरवठादार म्हणून स्वत:चे स्थान पक्के केले आहे. आपल्या उत्पादंनांची वाढती मागणी लक्षात घेता कंपनी आयएसची उत्पादन क्षमता ११,००० मेट्रिक टनांनी वाढवत आहे. यासाठी २१६ कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित आहे. कोविड १९ मुळे हा विस्तारीकरणाचा प्रकल्प थोडा लांबला असला तरीही तो २०२२ मध्ये प्रत्येकी ५,५०० मेट्रिक टन या प्रमाणे दोन टप्प्यात कार्यरत होईल.

करोना महामारीमुळे कंपनीच्या कामकाजावर सुरुवातीला विपरीत परिणाम झाला होता. मात्र नुकत्याच संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. यंदाच्या तिमाहीच्या उलाढालीत डिसेंबर २०१९च्या तुलनेत कंपनीने ३० टक्के वाढ नोंदवून ती ११६.९ कोटींवर नेली आहे तर नक्त नफ्यात तब्बल ७७ टक्के वाढ होऊन तो २९ कोटी रुपयांवर गेला आहे.

कंपनीचा कारभार प्रामुख्याने टायर उद्योगावर अवलंबून आहे. सध्या वाहन क्षेत्राला बरे दिवस आले असून साहजिकच टायर उद्योगही तेजीत राहण्याची शक्यता आहे. उत्पादनांची वाढती मागणी आणि कंपनीची वाढलेली उत्पादन क्षमता यामुळे आगामी काळात कंपनीकडून भरीव कमगिरीची अपेक्षा आहे. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून या ‘स्मॉल कॅप’चा पोर्टफोलियोसाठी जरूर विचार करावा.

भरणा झालेले भागभांडवल रु. १०.०१ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ५१.७६

परदेशी गुंतवणूकदार  ०.७०

बँक/ म्यु. फंड/ सरकार   १८.९१

इतर/ जनता २८.६३

संक्षिप्त विवरण

* शेअर गट : स्मॉल कॅप

* बाजार भांडवल    : रु. ८८० कोटी

* प्रवर्तक   : जे पी गोएंका समूह

* व्यवसाय क्षेत्र  : सल्फ्युरिक अ‍ॅसिड

* पुस्तकी मूल्य : रु. ४८२

* दर्शनी मूल्य   : रु. १०/-

* लाभांश   : १००%

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :   रु. ६९.३

*  पी/ई गुणोत्तर :  १२.७

*  समग्र पी/ई गुणोत्तर :   २०.८

*  डेट इक्विटी गुणोत्तर :   ०.३२

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :   १३.५

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड :१५.६

*  बीटा :  ०.६

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 12:29 am

Web Title: oriental carbon and chemicals limited portfolio abn 97
Next Stories
1 उंच माझा झोका..
2 फंडाचा ‘फंडा’.. : ‘ती’ची कामगिरी फ्रँकलिन इंडिया ब्लूचीप फंड
3 बाजाराचा तंत्र-कल : तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी!
Just Now!
X