|| वसंत माधव कुळकर्णी

गुंतवणुकीसाठी निवडलेला प्रत्येक फंड हा म्युच्युअल फंडाच्या यादीत अग्रस्थानी असेलचअसे नाही, परंतु परताव्याच्या दरात सातत्य राखणारा फंड निवडणे कधीही हिताचे असते.

मागील २१ मे रोजी पाच वर्षे पूर्ण करणाऱ्या पराग पारीख लाँग टर्म इक्विटी फंडाने गुंतवणुकीत सातत्य राखले आहे. पहिल्या एनएव्ही पासून ५,०००ची एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या ३ लाखाच्या गुंतवणुकीचे २१ मे रोजीच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्ही नुसार ४.५१ लाख झाले असून परताव्याचा वार्षिक दर १६.७२ टक्के असून पहिल्या पाच वर्षांपूर्वी १ लाखाच्या गुंतवणुकीचे २.३३ लाख झाले असून २१ मे रोजीच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्ही नुसार परताव्याचा दर १८.५२ टक्के आहे. या फंड घराण्याच्या केवळ दोन योजना असून लिक्वीड फंड ही योजना मे २०१८ मध्ये गुंतवणुकीसाठी खुली झाली.

फंडाच्या एकूण गुंतवणुकीपैकी कमाल ६५ ते १०० टक्के गुंतवणूक देशांतर्गत तर  किमान ० ते ३५ टक्के गुंतवणूक डॉलरनिर्देशित परदेशातील कंपन्यांतून करणारा हा फंड आहे. फंड घराणे या फंडाचा उल्लेख ‘लोकल फंड वुईथ ग्लोबल फोकस’ असा करते.

फंडाच्या स्थानिक गुंतवणुका राजीव ठक्कर, परदेशातील गुंतवणूक रौनक ओंकार तर स्थिर उत्पन्न गुंतवणुका, राज मेहता सांभाळतात. अल्फाबेट (अमेरिका), एचडीएफसी बँक, आणि बजाज होल्डिंग्स बालकृष्ण इंडस्ट्रीज, पर्सिस्टंट सिस्टिम्स या फंडाच्या आघाडीच्या पाच  गुंतवणुका आहेत. परदेशी गुंतवणुकीत गुगलच्या मूळ व्यवसायातून काही व्यवसाय वेगळे काढून त्यातून २ ऑक्टोबर २०१५ पासून अल्फाबेटची निर्मिती करण्यात आली. या व्यतिरिक्त सुझुकी मोटार कोर्पोरेशन (एडीआर), फेसबुक, नेस्ले (एडीआर), ‘थ्रीएम’, आयबीएम इत्यादी डॉलरमधील नाम निर्देशित गुंतवणुका आहेत.

या फंडाने गुंतवणूक केलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नफ्यात वाढ होताना दिसेल. स्थिरावलेली जागतिक अर्थव्यवस्था आणि ७ टक्कय़ांहून अधिक वेगाने अपेक्षित असलेला भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर आणि  २००८ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळल्यापश्चत प्रथमच जागतिक अर्थव्यवस्था वाढीचा दर ३ टक्कय़ांच्या जवळपास स्थिरावतांना दिसत आहे.

ज्या वेळेला रुपयाचे आपले मुल्य गमावतो तेव्हा डॉलरमधील गुंतवणुका वधारतात. एकूण गुंतवणुकीच्या २० टक्के गुंतवणूक भारतीय बाजारात सूचिबद्ध नसलेल्या कोका-कोला, स्टारबग, सॅमसंग, बोईंगसारख्या बलाढय़ कंपन्यांतून गुंतवणूक करण्याची संधी या फंडाच्या गुंतवणुकीतून साधू शकतात.

भारतीय अर्थ व्यवस्थेचे संक्रमण ‘लो इंफ्लेशन मिडियम ग्रोथ’कडून ‘हाय इंफ्लेशन हायग्रोथ इकोनॉमी’कडे होत आहे, असा सिद्धांत मांडणारा अर्थतज्ज्ञांचा एक वर्ग आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वोत्तम कालखंड हा महागाईचा दर ७-८ टक्के असतानाच होता, असे या अर्थतज्ज्ञांच्या समूहाचे म्हणणे आहे. रोजगाराची पुरेशी संधी उत्पन्न होणे आवश्यक असेल तर ‘लो इंफ्लेषन मिडियम ग्रोथ’ अर्थव्यवस्थेकडून  ‘मिडियम इंफ्लेशन मिडीयम ग्रोथ’ अर्थव्यवस्था कधीही चांगली. जागतिक अर्थव्यवस्थेचा ३ टक्क्य़ांच्या आसपास असलेला दर जगभरातच महागाई वरच्या बाजूला ढकलणारा (डिमांड पुश इंफ्लेशन) असेल. भारतदेखील या परिस्थितीला अपवाद नसल्याने ५.५ टक्के महागाईचा दर अर्थव्यवस्थेस बाधा न आणणारा असेल. या फंडाचे ब्रीदवाक्य   ‘लोकल फंड वुईथ ग्लोबल फोकस’ असल्याने बदलत्या स्थितीत गुंतवणूकदारांनी आपल्या म्युच्युअल फंड सल्लागाराच्या सल्लय़ानुसार या फंडाचा विचार करावा.

देशाची अर्थव्यवस्था एका वळणावर असून २०१४ पासून डॉलरच्या तुलनेत स्थिर असलेल्या रुपयाने जानेवारीपासून स्थैर्य गमावलेले आहे. वाढते कच्च्या तेलाचे चढे भाव रुपयाच्या घरंगळीस अंशत: कारणीभूत ठरले. रिझव्‍‌र्ह बँक रुपया सावरण्याचा प्रय करिय असली तरी त्यास मर्यादा आहेत. दुसऱ्या बाजूला नोव्हेंबर २०१६ पासून मंद झालेली अर्थव्यवस्था पूर्ववत होताना दिसत आहे. एप्रिल महिन्यातील विमान प्रवासी संख्या, विक्री झालेल्या व्यापारी वाहनांची संख्या, विक्री झालेल्या प्रवासी वाहनांची संख्या रेल्वे आणि संरक्षणा व्यतिरिक्त देशातील डिझेलचा वापर, निर्यात मालाचे मूल्य हे भारतीय अर्थव्यवस्था मूळ पदावर येतांना दिसत असल्याचा सांगावा देत आहेत. पुढील वर्षांचा जागतिक अर्थव्यवस्था वाढीचा दर ३ ते ३.२५ टक्के राहील असा अंदाज जागतिक अर्थसंस्था वर्तवताना दिसत आहेत. पश्चिम आशिया, लॅटीन अमेरिका, कॅरेबीयन बेटे या भौगोलिक परिसरात अर्थव्यवस्था स्थिर राहील तर अमेरिका, युरोपातील पूर्वेकडील राष्ट्रे, पूर्व आशिया या भौगोलिक प्रदेशात अर्थव्यवस्था मागील वर्षांपेक्षा सरस कामगिरी करतील.

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)