21 April 2019

News Flash

पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट : एक वाजवी पर्याय

प्रत्येक गुंतवणूकदाराला नेहमीच आपल्या पैशाबाबत सजग असणे महत्वाचे असते.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| तृप्ती राणे

प्रत्येक गुंतवणूकदाराला नेहमीच आपल्या पैशाबाबत सजग असणे महत्वाचे असते. त्यातसुद्धा ज्याच्या पोर्टफोलिओमध्ये निरनिराळे गुंतवणूक पर्याय असतील त्याच्यासाठी तर हे काम अजून मोठे असते – सगळी माहिती एक ठिकाणी गोळा करा, वेळो वेळी ती अपडेट करा, नियमित आढावा घ्या, चालू ठेवा/बंद करा/नफा काढा आदि निर्णय घ्या. बऱ्याचदा असे होते की गुंतवणूकदाराला सगळ्या पर्यायांची नीट माहिती नसते (कधी कधी माहिती करून सुद्धा घ्यायची नसते), किंवा तिसऱ्या व्यक्तींकडून सांगितल्यावर भरपूर छोटय़ा छोटय़ा  ठिकाणी गुंतवणूक होते. शेअर बाजाराशी निगडीत गुंतवणूक तर करायची लालसा असते पण कशात करू असा संभ्रम असतो. अशा प्रकारच्या गुंतवणूकदारासाठी जे दीर्घकालीन जोखीमयुक्त गुंतवणूक करायला तयार आहेत, त्यांच्यासाठी निष्क्रिय गुंतवणूक (पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट) हा एक वाजवी पर्याय आहे. आणि या प्रकारच्या गुंतवणुकीमधे इंडेक्स म्युचुअल फंड बसतात.

हे म्युचुअल फंड बीएसई सेन्सेक्स, एनएसई निफ्टी, एनएसई नेक्स्ट ५० वगैरे निर्देशांकामधे जे समभाग ज्या प्रमाणात असतात, तेच समभाग त्याच प्रमाणामध्ये ठेवतात आणि निर्देशांकाशी थेट निगडीत असलेले परतावे देतात. थोडक्यात म्हणायचे तर जर बीएसई सेन्सेक्समध्ये पैसे गुंतवायचे असतील तर बीएसई सेन्सेक्स इंडेक्स फंड हा सोपा पर्याय आहे. सगळ्या लार्ज कॅप कंपन्यामधे एका फटक्यात गुंतवणूक होते. याच्यात एसआयपी (किमान ५०० रुपयांपासून) सुद्धा करता येते. आणि एक जमेची बाजू म्हणजे अशा फंडांचा खर्च हा इतर सक्रिय फंडापेक्षा कमी असतो. कारण येथे फंड मॅनेजरला फंडाचे पैसे किती आणि कुठे गुंतवायचे हे काम नसते. शिवाय गुंतवणूकदाराला या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागत नाही की मार्केट वर जातेय पण माझा म्युचुअल फंड मागे का राहतोय? मागील १५-१६ वर्षांंमध्ये अशा प्रकारच्या फंडातील एसआयपी गुंतवणुकीतून साधारणपणे १२ टक्के ते १३ टक्के (आयआयआर) इतके परतावे मिळालेले आहेत. या गुंतवणुकीतून होणाऱ्या फायद्यावर लागणारा कर हा समभाग गुंतवणूकीप्रमाणे असतो. या सर्व कारणांमुळे साधारण जोखीम क्षमता असणाऱ्यांसाठी आणि लार्ज कॅप गुंतवणूकदारांसाठी इंडेक्स फंड हा एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे.

आली आली दिवाळी, होवो अज्ञानाची राख रांगोळी

सणासुदीची मजाच न्यारी, त्यात सुद्धा गुंतवणुकीची करा तयारी

दारो-दारी रंगांची कमाल करा, पोर्टफोलिओमधे नवे रंग भरा

गोड, तिखट, चुरचुरीत खा, दीर्घकालीन गुंतवणुकीचा आनंद घ्या

पोटाची काळजी खायच्या आधी जरा, जोखीम पाहून गुंतवणूक करा

दिव्यांचा मंगल प्रकाश सर्वत्र पसरूद्या, तुमचा आर्थिक आराखडा यशस्वी होऊ द्या.

trupti_vrane@yahoo.com

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)

First Published on November 5, 2018 1:35 am

Web Title: passive investment 2