नफा-नुकसान हे आपण गुंतवणूक करताना कोणती विचारसरणी वापरतो त्यावर अवलंबून असते. कमीत कमी जोखीमयुक्त गुंतवणूक करून जास्तीत जास्त    फायदा मिळविण्याची विचारसरणी अर्थात ‘पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग’ हा मुख्यत: नवशिक्यांसाठी अतिशय उपयुक्त पर्याय आहे..
शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या नवशिक्यांसाठी सर्वात अनुरूप अशी पद्धत म्हणजे पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट. बऱ्याचदा शेअर बाजार (आपल्या अंदाजापेक्षा) वेगळ्याच मार्गाने जात असतो. याला कारणे अनेक आहेत. त्यापकी प्रमुख  म्हणजे जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी. काही ठरावीक गुंतवणूकदारांना त्या अगोदर माहिती होतात. अशा वेळी इतर गुंतवणूकदारांपर्यंत ती माहिती पोहोचण्यापूर्वीच ते बाजारात स्वत:चे व्यवहार करतात. त्याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे हिन्दुस्तान युनिलिव्हर. युनिलिव्हर पी.एल.सी. आणि युनिलिव्हर एन.व्ही. या पालक कंपन्या हिन्दुस्तान युनिलिव्हर या भारतातील कंपनीमध्ये आपला हिस्सा वाढवण्यासाठी त्या कंपनीचे शेअर्स ६०० रु.च्या भावाने खरेदी करणार, ही बातमी सर्वसाधारण गुंतवणूकदारांना ३० एप्रिलला समजली आणि त्या एका दिवसात त्या शेअरचा भाव आदल्या दिवशीच्या बंद भावावरून (४९७ रु.) ५९७ रु.पर्यंत, म्हणजे सुमारे २० टक्क्यांनी वाढला. परंतु ज्या काही थोडय़ा गुंतवणूकदारांना याची अगोदर कुणकुण होती त्यांनी एक दिवस अगोदर म्हणजे २९ तारखेलाच त्या शेअर्सची खरेदी केली. आदल्या दिवशीच्या (२६ एप्रिल २०१३) ४९५ रु.च्या बंद भावावरून २९ तारखेला त्या शेअरचा भाव ४९९ रु.पर्यंत वाढला (सुमारे ७ टक्के). त्या गुंतवणूकदारांचा ३० एप्रिलपर्यंतचा म्हणजे दोन दिवसांतील नफा १३२ रु. (सुमारे २८ टक्के) हे झाले अगदी अलीकडचे उदाहरण. १९९२, २००१, २००८ च्या मंदीच्या काळातही असाच प्रकार झाला होता. ज्यांना घोटाळ्यांची माहिती अगोदर मिळाली ते आपापला नफा बांधून बाजारातून बाहेर पडले. सर्वसाधारण गुंतवणूकदार मात्र होरपळून निघाले. या सर्व पडझडीचा अभ्यास केला तर पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंटच्या तर्कशास्त्राचे महत्त्व प्रकर्षांने जाणवते. या पद्धतिमीमांसेचे तत्त्व आहे – ‘‘उच्च प्रतीच्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करा आणि तेही दीर्घ काळाच्या उद्देशाने.’’
कंपन्यांच्या वार्षकि अहवालामधील कोणत्याही मथळ्याखालच्या किचकट आकडय़ांचा अभ्यास करायची डोकेदुखी न करता शेअर बाजाराच्या निर्देशांकामधील कंपन्यांचे शेअर्स त्या त्या कंपनीच्या निर्देशांकामधील भारांकनानुसार खरेदी करणे ही पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंटमधील सर्वात सोपी आणि सहजसुलभ पद्धत आहे. सामान्य गुंतवणूकदारांसाठी बाजाराच्या परताव्यापेक्षा जास्त परतावा पदरात पाडणे अतिशय कठीण आहे. किंबहुना अशक्य आहे. अस्थिर बाजारामध्ये जेव्हा त्याचा कल समजत नाही आणि नुसतीच तेजी-मंदीचे धूमशान चालू असते, तेव्हा तर सर्वसामान्य गुंतवणूकदारांची चक्क कत्तल होते. गुंतवणुकीमध्ये एक प्रकारची शिस्त ठेवली आणि मंदीच्या काळात, जेव्हा इतर गुंतवणूकदार बाजारापासून चार हात दूर राहणे पसंत करतात, त्या वेळी चांगल्या कंपन्यांचे शेअर्स कवडीमोल भावाने, हप्त्या हप्त्याने खरेदी करीत राहिले, तर खरेदीची सरासरी किंमत कमी होते आणि त्यानंतर येणाऱ्या तेजीमध्ये ‘छप्पर फाडके’ परतावा प्राप्त होतो. २००८ च्या मंदीमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी अशा प्रकारची योजनाबद्ध खरेदी केली त्यांनी दोन वर्षांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा अनुभवला आहे.
आपण गुंतवणूक करताना कोणती विचारसरणी वापरतो त्यावर आपले नफा-नुकसान आणि त्याचे प्रमाण अवलंबून असते. ‘जास्त प्रमाणात जोखीम जास्त प्रमाणात नफा’ हे बाजाराचे मूलतत्त्व आहे. माझ्या मते, थोडय़ाफार प्रमाणात आटोपशीर जोखीम घेतली तर बऱ्यापकी म्हणजे महागाईच्या दरापेक्षा जास्त प्रमाणात फायदा नक्कीच पदरात पडतो. कमीत कमी जोखीमयुक्त गुंतवणूक करून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट हा अतिशय उपयुक्त पर्याय आहे.
गुंतवणुकीची आखणी करताना मूळ रकमेमध्ये शक्यतो घट येणार नाही याची खबरदारी, भाववाढीपेक्षा जास्त अशी माफक प्रमाणातील परताव्याची अपेक्षा, वेगवेगळ्या व्यवसायांतील उच्च प्रतीच्या कंपन्यांमधील गुंतवणूक आणि दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणुकीची तयारी या गोष्टींचे काटेकोरपणे पालन केले तर शेअर बाजारामधील गुंतवणूक नक्कीच फायदेशीर होऊ शकते.
या बाजाराबाबत एक महत्त्वाची गोष्ट कायम ध्यानात ठेवणे आवश्यक आहे आणि ती म्हणजे- बाजार हा सर्वश्रेष्ठ आहे (सबका बाप है). अगदी पुढच्या तासात बाजार कसा असेल हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. हे त्या बाजाराबाबतचे वास्तविक आत्मसात करेपर्यंत आणि आचरणात आणेपर्यंत प्रत्येक गुंतवणूकदार बरेच पसे घालवत असतो. एका विदेशी तज्ज्ञाने यासंबंधी अतिशय छान विश्लेषण केले आहे – ‘‘बाजारात दोन प्रकारचे गुंतवणूकदार असतात. काहींना बाजाराचा कल कोणत्या दिशेने असेल त्याची माहिती नसते आणि काहींना आपल्याला काहीच माहिती नाही याचीच कल्पना नसते. बाजारात एक तिसरा प्रकारही असतो. व्यावसायिक गुंतवणूकदार. त्यांना बाजाराचे काय होणार आहे याची कल्पना नसते आणि त्याची त्यांना जाणीवही असते. परंतु आपणास सर्व काही माहिती आहे हे भासवण्यावर त्यांचा चरितार्थ चालत असतो.’’ नवीन गुंतवणूकदार या तथाकथित तज्ज्ञांच्या भाकितांवर विश्वास ठेवून बाजारात प्रवेश करतात आणि पस्तावतात.
आता प्रश्न पडतो- अशा परिस्थितीत मी काय करायचे? उत्तर आहे – बाजाराच्या निर्देशांकाची खरेदी. अशा खरेदीने बाजारात सर्वसाधारपणे मिळणारा परतावा नक्कीच प्राप्त होऊ शकतो.
या संदर्भात आणखी माहिती मिळवण्यासाठी पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आणि अ‍ॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी यांमधील फरक जाणून घेऊ या. शेअर बाजारातील तेजी-मंदीच्या चक्राचा ज्या शेअर्सवर कमीत कमी परिणाम होतो असे उच्च दर्जाच्या कंपन्यांचे शेअर्स घेऊन ते दीर्घ काळाच्या गुंतवणुकीच्या उद्देशाने जवळ बाळगणे म्हणजे पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी. अ‍ॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंटचा पाठपुरावा करणारे गुंतवणूकदार सर्वसाधारण परताव्यावर समाधानी नसतात. त्यांना त्यापेक्षा फार जास्त कमाईची अपेक्षा असते. काही वेळा ते त्यामध्ये यशस्वीही होतात. परंतु अंदाज चुकला तर परतावा कमी होतो किंवा नुकसानही होते. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे तर सचिनच्या खेळीवर बेटिंग करणे ही पॅसिव्ह स्ट्रॅटेजी आणि सेहवागच्या खेळीवर बेटिंग करणे ही अ‍ॅक्टिव्ह स्ट्रॅटेजी. सेहवागचा खेळ एखाद्या मॅचमध्ये किंवा सीरिजमध्ये सचिनपेक्षा वरचढ होऊ शकतो. परंतु सचिनच्या खेळामध्ये जी दृढता आणि सुसंगती आहे ती सेहवागमध्ये नक्कीच नाही.
शेअर बाजाराच्या निर्देशांकामधील गुंतवणुकीच्या संदर्भातील उदाहरणाने हा फरक स्पष्टपणे जाणून घेऊ या.
समजा, बाजारात १०० गुंतवणूकदार आहेत, त्यापकी ५ पॅसिव्ह गुंतवणूकदार आहेत. (प्रत्यक्षात ५ टक्केही नसतात, कारण या गुंतवणुकीत थ्रिल हा प्रकार नसतो) उरलेले ९५ अ‍ॅक्टिव्ह गुंतवणूकदार आहेत. यापकी प्रत्येकाने बाजारामधील एकूण एक शेअर्सची खरेदी केलेली आहे. समजा, एका वर्षांत बाजार १० टक्क्यांनी वाढला. अशा वेळी या शंभर गुंतवणूकदारांची कमाई (दलाली, टॅक्स वगरे विचारात न घेता) काय असू शकेल? बाजार १० टक्क्यांनी वाढला म्हणजे पॅसिव्ह इन्व्हेस्टरांची (५) कमाई १० टक्के. उरलेल्या ९५ गुंतवणूकदारांच्या बाबतीत मात्र नफ्यासंदर्भातील चित्र वेगळे असेल. अगदी ९५ वेगवेगळे आकडे असण्याचीही शक्यता आहे. काहींच्या बाबतीत कमीजास्त प्रमाणात नफा असेल तर काहींच्या बाबतीत तोटा. या सर्वाच्या नफ्या-तोटय़ांची सरासरी काढली तर ती बाजाराच्या सर्वसाधारण वाढीइतकीच म्हणजे १० टक्के असेल. मग अशा परिस्थितीत वेळोवेळी खरेदी विक्री करून जास्त नफा मिळविण्याच्या उद्देशाने, ज्यामध्ये नुकसानीचीही शक्यता आहे, असा धोपट मार्ग स्वीकारण्यापेक्षा सरळ, सोपा आणि हमखास फायदा करून देणारा पॅसिव्ह गुंतवणुकीचा मार्ग का स्वीकारू नये?
थोडक्यात, नवीन गुंतवणूकदारांसाठी निर्देशांकामधील गुंतवणूक हाच सर्वात किफायतशीर मार्ग आहे. मान्य आहे की त्यात धाडस किंवा थ्रिल नाही. किंबहुना तो थोडा बोअरिंगही आहे. परंतु गुंतवणुकीचा मूळ उद्देश काय आहे, हे पहिल्याने समजून घेतले पाहिजे. संपत्ती वाढविणे की थ्रिलचा अनुभव घेणे? अर्थात निर्देशांकाच्या गुंतवणुकीमध्येही थोडाफार फेरफार करून हमखास फायद्याबरोबर थ्रिलचाही अनुभव घेता येतो. त्याची विस्तृत माहिती पुढील भागामध्ये घेऊया.