portfolio4दिवस किती वेगात बदलतात हे सध्या शेअर बाजाराचा घसरता निर्देशांक, शेअर्सचे नवीन नीचांक बघून सहज लक्षात येते. नवीन सरकार, नवीन परिणामकारक योजना आणि नवीन आश्वासने अशा आश्वासक वातावरणात गेल्या वर्षी शेअर बाजाराच्या तेजीला सुरुवात झाली. सुदैवाने त्यात घसरत्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे चलनवाढ आटोक्यात राहिलीच, शिवाय चालू खात्यावरील तूटही बव्हंशी भरून निघाली. अर्थसंकल्पदेखील बऱ्यापकी वाटल्याने ही तेजी कायम राहील, असे वाटत असतानाच, ही तेजी होती की निर्देशांकला आलेली सूज होती, असे आता भासायला लागले आहे. सध्याची देशांतर्गत किंवा जागतिक परिस्थिती बघता तेजीचे दिवस अजून बरेच दूर आहेत असे वाटू लागले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे पातधोरण जाहीर करताना, गव्हर्नर रघुराम राजन यांनी सगळे काही आलबेल नसल्याचे सुतोवाच केले आहे. दिवाळखोरीत निघालेला ग्रीस, अमेरिकेतील व्याजदर वाढीची शक्यता, चीनमध्ये तेथील मध्यवर्ती बँकेने जाहीर केलेली व्याजदरातील कपात वगैर जागतिक घडामोडीच्या पाश्र्वभूमीवर भारतातील दुष्काळी परिस्थिती, घसरता रुपया आणि बँकांच्या अनुत्पादित कर्जाचे वाढते प्रमाण या सगळ्यांचा एकत्रित परिणाम नाही झाला तरच नवल. गेल्या काही आठवडय़ांपासून नरम गरम असलेल्या बाजारात आता मंदीचे वातावरण आले आहे. आणि मंदीचा सर्वात मोठा फटका बसतो तो नेहमी मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सना. अशा कालावधीत कुठलाही गुंतावणूकदार गोंधळून जाणे साहजिक आहे. मात्र हीच वेळ संयमाची असते आणि तसेच चांगले शेअर्स खरेदी करण्याची. चांगला गुंतवणूकदार हा नेहमीच दीर्घकालीन विचार करणारा असल्याने त्याला भीतीचे काहीच कारण नाही.

काही कंपन्या आपल्या गुणवत्तेच्या आणि कामगिरीच्या जोरावर पुढे जातात त्यातलीच एक स्वबळावर मोठी झालेली कंपनी म्हणजे विनाती ऑरगॅनिक्स. १९९१ मध्ये आयपीओद्वारे भांडवली बाजारात प्रवेश केल्यानंतर २३ वर्षांत कंपनीने सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखविली आहे. सुरुवातीला महाराष्ट्रातील महाड येथून आयजो ब्युटाईल बेन्झिन या बल्क ड्रग्सचे आयएफपी फ्रान्सच्या सहकार्याने उत्पादन करणाऱ्या या कंपनीने नंतर विस्तार कार्यक्रम हाती घेऊन खेडमध्ये लोटे परशुराम येथूनही सोडियम मिथाइल सल्फोनेट (रटअर) आणि अक्रिमालिडो मिथाइलप्रोपेन सल्फोनिक अ‍ॅसिड (अळइर) उत्पादन चालू केले. रटअर चे उत्पादन घेणारी ही भारतातील एकमेव आणि जगातील तिसरी कंपनी आहे. २०१४-१५ या आíथक वर्षांत कंपनीने ७५९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ११५.८ कोटी रूपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ३७% जास्त असून प्रति समभाग उत्पन्न २२.४ वर गेले आहे. काही वर्षांपूर्वी आपल्या भागधारकांना २:१ बक्षीस समभाग देणाऱ्या या कंपनीचे भरणा झालेले भागभांडवल केवळ १०.३२ कोटी असल्याने आगामी कालावधीत कंपनीकडून बोनस शेअर्सची अपेक्षा आहे. काही वर्षांपूर्वी ७०-७५ च्या आसपास मिळणारा हा शेअर आता ५५० रुपयांच्या वर गेल्याने काहींना हा शेअर थोडा महाग वाटू शकेल. मात्र सध्याच्या वातावरणात सुरक्षित गुंतवणुकीसाठी विनातीसारखेच शेअर्स खरेदी करायला हवेत. मंदीत हा शेअर थोडय़ा खालच्या किमतीत मिळाला तर अथवा टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यासाठी विनातीचा जरूर विचार करावा.
vinti

सूचना : लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये कुठलीही गुंतवणूक नाही तसेच या कंपनीशी कुठलाही संबंध नाही. सुचवलेल्या कंपनीकडून लेखकाने कुठलेही मानधन घेतलेले नाही.

stocksandwealth@gmail.com