तृप्ती राणे

‘‘या वर्षी सिंगापूर, पुढच्या वर्षी इंडोनेशिया, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि मग जपान? हे सगळं आधी करू आणि मग युरोप, चीन, रशिया आणि अमेरिका. त्यानंतर वाटलंच तर आफ्रिका आणि नॉर्थ आणि साऊथ पोल. काय कसा वाटतोय माझा ट्रॅव्हल प्लॅन?’’ नवीन नोकरी लागलेल्या वरुणने त्याच्या मित्राला, म्हणजेच तेजसला विचारलं.

त्यावर तेजस म्हणाला – अरे, हो हो! नुकती नोकरीला सुरुवात केली आहेस, पण प्लॅन तर असा बनवतोयेस जणू काय दहावा वार्षिक बोनस मिळालाय. काय रे, कमवायच्या आधीच गमवायच्या गोष्टी? तेजस जरी वरुणचा मित्र असला तरी त्याच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठा होता. दोघांची मत्री झाली ती एमबीए करताना. वरुण बीकॉम करून आलेला तर तेजस चार वर्षे नोकरी केल्यानंतर आला होता. वरुण अवखळ होता आणि तेजस संयमी आणि विचारी. म्हणूनच त्यांची मत्री टिकून होती.

तेजसने असं म्हटल्यावर वरुण जरा रागावलाच. म्हणाला – ‘‘काय यार तू पण! प्लीझ पप्पांसारखा बोलू नकोस. माझ्या लहानपणी ते मला घेऊन कुठे फिरायला नाही गेले, आता स्वतच्या पशाने जातो म्हणतो तर तू काडी घालतोस? आता का हात आवरू? माझा पसा मला मजा करायला नाही मिळाला तर उपयोग काय त्याचा? शिवाय दर वर्षी फिरायचं हे मी मनाशी खूप आधी ठरवून ठेवलं आहे. सो, नो मोअर कॉम्प्रोमाइझ! बॅग भरो निकल पडो. आता तर पशांसाठी कुठे हात पसरायला पण नको. पगार, क्रेडिट कार्ड आणि हॉलिडे पॅकेज – कसलं भन्नाट कॉम्बो आहे बघ. कालच एका ट्रॅव्हल कंपनीचा फोन येऊन गेला. झकास प्लॅन पाठवलाय. तुला पण फॉरवर्ड करतो. बघ आणि सांग.’’

त्याचं सगळं शांतपणे ऐकून घेतल्यावर तेजस म्हणाला – ‘‘हे बघ वरुण! मी तुझ्या भावना समजू शकतो, परंतु एक ध्यानात ठेव की, पशाचं सोंग कधीच आणता येत नाही आणि आपल्यासारख्या प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना खूप विचार करून पैसे खर्च करावे लागतात. आपली नोकरी आज आहे पण उद्याची खात्री नाही. आपल्याला पेन्शन नाही. शिवाय या तणावग्रस्त राहणीमानामुळे आपण किती वर्षे नोकरी करू शकू हेसुद्धा नक्की नाही. त्यामुळे आज मिळत असलेला पसा थोडा सांभाळून, योग्य ठिकाणी गुंतवून मग त्यातून हौस पूर्ण केली तर. उस में भी अलग मजा है! तेव्हा बाबांनी दिलं नाही म्हणून आता बेलगाम पैसे उडवणं हे योग्य नाही. त्यांना कदाचित त्या काळात परवडलं नसेल तुला फिरायला नेणं. पण म्हणून त्यांनी तुझ्या शिक्षणात कुठलीही कमतरता ठेवली नाही. कुठलंही कर्ज न उचलता तुझ्या एमबीएचा सगळा खर्च व्यवस्थित सांभाळला. तुझ्याबरोबर तुझ्या छोटय़ा बहिणीचासुद्धा त्यांनी विचार केला असेलंच ना? तुम्हा दोघांना तुमच्या पायावर उभं राहता येईल ही तरतूद त्यांनी केली आहे. तेव्हा तुझ्या मनातून तुझ्या वडिलांविषयी असलेली अढी तू खोडलीस तर बरं होईल.’’

वरुण हे सर्व ऐकून थोडा गहिवरला. त्याच्याही डोळ्यासमोर त्याचं बालपण आलं आणि एका संयुक्त कुटुंबाची जबाबदारी बाबांनी कशी पेलली याची जाणीव त्याला झाली. घरात कमावणारा एक आणि खाणारे सहा, त्यामुळे नेहमीच तारेवरची कसरत. तरीसुद्धा कधी उसनवारी नाही की पोटाला चिमटे काढणं नाही. यात मुलांचे सगळेच हट्ट नाही पुरवले, पण स्वतवर एक पैसा खर्च केला नाही. गरजेनुसार खर्च केला आणि निवृत्तीपश्चात आपली सोय करून ठेवली. आज तेजसमुळे त्याला स्वतच्या वडिलांबद्धल फार फार अभिमान वाटला आणि भानावर येत तो म्हणाला – ‘‘तेजस, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण मला मन मारून जगायचं नाहीये. आनंदाने स्वतची आणि त्याबरोबर कुटुंबाचीसुद्धा हौसमौज पुरवायची आहे. तर मी काय करू?’’

हे ऐकून तेजस खूश झाला आणि म्हणाला – ‘‘शाब्बास दोस्ता! ये हुई न बात! तू खालीलप्रमाणे गोष्टी केल्यास तर तुला नक्की फायदा होईल.’’

१ स्वतचं आर्थिक नियोजन कर. एक चांगला सल्लागार निवड जो तुला सगळ्या गोष्टी समजावेल आणि तुझ्या पशाला योग्य ठिकाणी वाढवेल.

२ फिरण्याची हौस नक्की पुरी कर, पण नियोजन करून. त्यामुळे पैसेसुद्धा वाचतात.

३ ट्रॅव्हल प्लॅन्स/क्लब मेंबरशिपच्या नावाखाली कुणी आपल्याला लुटत तर नाही ना याची खात्री करून घे.

४ क्रेडिट कार्ड हे शहाण्याने गरजेलाच वापरावं, न पेलणारे खर्च करण्यासाठी नाही.

५ कर्ज काढून हौस करू नकोस, खूप महागात पडतं. त्यापेक्षा नियमित गुंतवणूक कर आणि मौज करून घे.

६ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर दाखवायला फिरायला जाणार असशील तर तुझ्यासारखा मूर्ख तूच! दुसरे जातात म्हणून मला आताच जायला पाहिजे या भुलाव्यापासून स्वतला लांब ठेव.

७ आधी गुंतवणूक मग खर्च. हे बाळकडू स्वतमध्ये रुजवून घे. महिन्याच्या शेवटी राहिलेली छोटी रक्कमसुद्धा कालांतराने मोठी होते.

८ आपल्या खऱ्या गरजा आधी ओळख आणि मग हौसेसाठी प्लॅन बनव. असे नको व्हायला की हौस पुरी झाली आणि गरजेला तिजोरी खाली.

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार )

trupti_vrane@yahoo.com