News Flash

फंडाचा ‘फंडा’.. : फंड क्षितिजावरील ‘वॉशिंग्टन सुंदर’!

थकलेल्या फंडाला ‘एसआयपी’तून वगळून नव्या दमाच्या फंडात ‘एसआयपी’ सुरू करणे हिताचे ठरेल.

अतुल कोतकर

पीजीआयएम इंडिया फ्लेक्झीकॅप फंड

मल्टीकॅप फंड प्रकारातील गुंतवणुकीचे ‘सेबी’ने प्रमाणीकरण केल्यानंतर म्युच्युअल फंड उद्योगातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या प्रतिक्रियांची दखल घेत ‘सेबी’ने नवीन ‘फ्लेक्झीकॅप फंड’ गटाची निर्मिती केली. परिणामी आजचे फ्लेक्झीकॅप फंड कालचे मल्टीकॅप फंड आहेत. मागील पाच वर्षांतील, जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०२० या काळातील तत्कालीन मल्टीकॅप गटातील फंडांचा आढावा घेतल्यास असे दिसते की, २०१५ ते २०१८ या कालावधीत आयडीएफसी प्रीमिअर इक्विटी, प्रिन्सिपल मल्टीकॅप यासारख्या फंडांचा दबदबा होता. २०१८ ते २०२० दरम्यान निप्पॉन इंडिया मल्टीकॅप, कोटक स्टँडर्ड मल्टीकॅप यासारखे फंड अव्वल स्थानी होते; परंतु जानेवारी २०२० पासून मल्टीकॅप गटातील कल पूर्णपणे बदलला असून कोटक स्टँडर्ड मल्टीकॅपसारख्या फंडांची सद्दी संपलेली दिसत आहे. नव्याने उदयाला येत असलेले, पीजीआयएम इंडिया फ्लेक्झीकॅप, पराग पारीख फ्लेक्झीकॅप, यूटीआय फ्लेक्झीकॅप यासारखे फंड नव्याने उदयाला आले असल्याचे दिसत आहे. मागील १८ महिन्यांत सर्वाधिक वृद्धीदर पीजीआयएम इंडिया फ्लेक्झीकॅप फंडाचा असून पाच वर्षांच्या ‘एसआयपी’वर वार्षिक परतावा १९.३६ टक्के असून फंड सरासरीपेक्षा २८ टक्के अधिक आणि याच कालावधीत फ्लेक्सीकॅप फंडात सर्वाधिक मालमत्ता असलेल्या फंडाच्या परताव्यापेक्षा हा २७ टक्के अधिक लाभ आहे.

अनिरुद्ध नाहा या फंडाचे निधी व्यवस्थापक असून ते या फंडासोबत पीजीआयएम इंडिया मिडकॅप आणि पीजीआयएम इंडिया बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज हे फंड व्यवस्थापित करतात. पीजीआयएम फंड घराण्यात दाखल होण्यापूर्वी ते आयडीएफसी फंड घराण्यात आयडीएफसी स्टर्लिग व्हॅल्यू आणि आयडीएफसी टॅक्स अ‍ॅडव्हान्टेज हे फंड व्यवस्थापित करीत होते. फंड आणि मानदंड यांच्या तीन वर्षे चलत सरासरीच्या तुलनेत एप्रिल २०१४ ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ९८.९६ टक्के वेळा फंडाचा परतावा मानदंडापेक्षा अधिक राहिला आहे. थोडक्यात, त्यांच्या सध्याच्या कामगिरीचे वर्णन सध्या फॉर्मात असलेल्या उभरता भारतीय क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदरच्या कामगिरीशी करता येईल. प्रत्येक खेळीत धावांचा रतीब घालणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरप्रमाणे सध्याचा अनिरुद्ध नाहा यांचा फॉर्म आहे. ते तिमाहीमागून तिमाही गुंतवणूकदारांच्या पदरात परताव्याचा रतीब घालतील अशी चिन्हे दिसत आहेत. या सुचिन्हांचा फायदा घेण्यासाठी नावाजलेल्या परंतु थकलेल्या फंडाला ‘एसआयपी’तून वगळून नव्या दमाच्या फंडात ‘एसआयपी’ सुरू करणे हिताचे ठरेल.

अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा अधिक कमी कालावधीत कोविडपूर्व पातळीवर येत आहे. जवळजवळ सर्वच क्षेत्रांमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटताना दिसत आहे. अर्थव्यवस्थेत असलेल्या विपुल रोकडसुलभतेची मिड कॅप आणि लार्ज कॅप कंपन्यांच्या नफ्यातील वाढीला मदत झालेली दिसत आहे. आधी लार्ज कॅप, मग मिड कॅप आणि सर्वात शेवटी स्मॉल कॅप कंपन्यांचा नफा वाढत असतो. तसेच नव्याने सूचिबद्ध होत असलेल्या कंपन्यांतून गुंतवणुकीची संधी उपलब्ध होताना दिसत आहे.

’   अनिरुद्ध नाहावरिष्ठ निधी व्यवस्थापक, पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंड

atul@sampannanivesh.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 12:01 am

Web Title: pgim india flexicap fund zws 70
Next Stories
1 गोष्ट रिझर्व्ह बँकेची : रिझर्व्ह बँक स्थापनेस गोलमेज परिषदांतून चालना
2 करावे कर-समाधान : गुंतवणूक लाभ आणि कर आकारणी
3 माझा पोर्टफोलियो : ‘सदाहरित’ क्षेत्रातील अग्रेसर शिलेदार
Just Now!
X