पाईनब्रिज म्युच्युअल फंडाच्या देशांतर्गत गुंतवणुकीच्या योजना कोटक महिंद्र अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या ताब्यात आल्या आहेत. यामुळे पाईनब्रिजच्या स्थानिक रोखे व समभाग गुंतवणूक योजनांची भर पडून कोटकच्या व्यवस्थापनयोग्य गंगाजळी (एयूएम) ६६० कोटी रुपयांनी वाढणार   आहे.
देशांतर्गत म्युच्युअल फंडांच्या ३१ ऑगस्ट २०१४ अखेर एकूण १० लाख कोटी रुपयांच्या गंगाजळीपैकी कोटकच्या गंगाजळीचे प्रमाणे सुमारे ३७,००० कोटी रुपयांचे आहे. विद्यमान २०१४ सालात देशाच्या म्युच्युअल फंड उद्योगात झालेला या धर्तीचा हा दुसरा व्यवहार आहे, तर गेल्या दोन वर्षांत देशाच्या फंड उद्योगातून माघार घेणारी पाइनब्रिज ही पाचवी जागतिक वित्तीय सेवा संस्था आहे. मॉर्गन स्टॅन्ले, आयएनजी इन्व्हेस्टमेंट, दाइवा, फिडेलिटी यांनी यापूर्वी भारतातील म्युच्युअल फंड व्यवसायातून अंग काढून घेतले आहे. दरम्यान, महिंद्र समूहही एका विदेशी मालमत्ता व्यवस्थापन कंपनीच्या भारतातील व्यवसायाचे अधिग्रहण करण्याच्या तयारीत असून याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.
पाईनब्रिज इन्व्हेस्टमेंट अॅसेट मॅनेजमेंट कंपनीमार्फत सुरू असलेल्या रोखे व समभाग गुंतवणुकीच्या योजना आता कोटकच्या पंखाखाली आल्या आहेत. सुरुवातीला त्या जुन्याच नावाने वितरित केल्या जाणार असून याबाबतच्या सेबीच्या परवान्यानंतर त्यांना कोटक्रचे कोंदण मिळेल. या नव्या व्यवहारामुळे कोटक महिंद्रचा समभाग गुंतवणुकीच्या व्यवसायात वाढ होणार असून या क्षेत्रातील अधिक उत्पादने, योजना सादर करता येईल, अशी भावना यानिमित्ताने कोटक महिंद्रू म्युच्युअल फंड कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभागाचे प्रमुख गौरांग शहा यांनी म्हटले आहे.

या उलट निप्पॉन आणि टी. रोवे प्राइस या विदेशी संस्थांनी अनुक्रमे रिलायन्स म्युच्युअल फंड आणि युटीआय म्युच्युअल फंडात प्रत्येकी २६ टक्के हिस्सा मिळविणारी गुंतवणूकही केली आहे.