25 September 2020

News Flash

नियोजन भान : सुरक्षित सेवानिवृत्तीसाठी   

सेवानिवृत्तीच्या जितक्या जवळ असताना सेवानिवृत्ती नियोजनाला सुरुवात कराल तितक्या गोष्टी आवाक्याच्या बाहेर जातील.

(संग्रहित छायाचित्र)

अनुराधा सहस्रबुद्धे

माझ्या परिचितांपैकी एका व्यक्तीने माझ्याबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी करायच्या बचतीबाबत विस्तृत चर्चा केली होती. त्यानंतर त्यांच्या गुंतवणुकीचा वार्षिक आढावा घेताना त्यांच्या सेवा निवृत्तीपश्चात उदरनिर्वाहासाठी करायच्या नियोजनाच्या रुळावर मी ठरवून देखील गाडी काही येत नव्हती. सेवानिवृत्ती सुरक्षित करण्याचे सेवानिवृत्ती नियोजन हे एक साधन आहे. सेवानिवृत्ती नियोजन ही पहिल्या पगारापासून आचरणात आणायची गोष्ट आहे. सेवानिवृत्ती नियोजनाला जेवढी उशिरा सुरुवात कराल तितक्या गोष्टी कठीण होत जातील. कारण चक्रवाढ वाढीचे घातांकी स्वरूप. सेवानिवृत्तीच्या जितक्या जवळ असताना सेवानिवृत्ती नियोजनाला सुरुवात कराल तितक्या गोष्टी आवाक्याच्या बाहेर जातील.

माझ्या अनुभवावरून मी असे सांगू इच्छिते की, अनेकांच्या आपल्या निवृत्तीबद्दल अवास्तव कल्पना असतात. या कल्पनांनी मला एकूणच सेवानिवृत्ती नियोजनाबद्दल विचार करायला प्रवृत्त केले. मागील दहा वर्षांत सेवानिवृतांची संख्या तिप्पट झाली आहे. पुढील दहा वर्षांत ही संख्या आजच्या सेवानिवृतांची संख्येच्या तिप्पट असेल. लोकसंख्या विज्ञान हे त्या देशातील लोकसंख्येचा अभ्यास करते. आपली अर्थव्यवस्था युरोप आणि जपानी लोकसंख्येइतकी ज्येष्ठ नागरिकांची बहुसंख्या असणारी नसली तरी धोक्याची जाणीव व्हावी इतपत दखल नक्कीच घेणे आवश्यक आहे. या मोठय़ा संख्येने वाढणाऱ्या ज्येष्ठांच्या संख्येचे म्युच्युअल फंड आणि विमा कंपन्या लाभार्थी आहेत. कारण ज्येष्ठांकडून वार्षिकीसारख्या (अ‍ॅन्युइटी) योजनांना मागणी असते.

* पहिला गैरसमज

तो असा की, ‘विमा पॉलिसी, भविष्य निर्वाह यामधून मिळणारा परतावा माझ्या सेवानिवृत्तीपश्चातच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसा असेल.’

विमा उत्पादने आणि परताव्याचा दर निश्चित असलेली उत्पादने आपल्या भविष्यातील खर्चाचा केवळ नगण्य भागच पूर्ण करू शकतील. दुसरे, भविष्य निर्वाह निधी किंवा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही काही अव्वल चक्रवाढ वृद्धीदर असलेली बचत साधने नाहीत. अनेकदा अनेक पालक त्यांनी उपयोगात आणलेली बचत साधनेच पाल्यांनीही उपयोगात आणावी असा आग्रह धरतात. परंतु त्यांच्या काळी या बचत साधनांचा वृद्धीदर दोन अंकात होता. तसेच त्यांनी अगदी लहान वयातच या साधनांच्या वापरास सुरुवात केल्याने ही साधने त्यांना ३०-३५ वर्षांत मोठी रक्कम जमविण्यास साहाय्यभूत ठरली. आर्थिक वर्ष २००० मध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर मिळणारे व्याज १२ टक्के होते. २०१९ मध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर मिळणारे व्याज ८.७ टक्के आहे. भारतातील सर्वात मोठय़ा निवृत्तिपश्चात निधीची व्यवस्थापक असलेले भारतीय आयुर्विमा मंडळ आपल्या पेन्शन प्लानवरील खात्रीशीर परताव्याचा दर वर्षांगणिक कमी करीत आहे. आज परताव्याचा दर सातत्याने कमी होत असताना मोठय़ा निवृत्तिपश्चात निधीसाठी ही उत्पादने पुरेशी आहेत काय? तसेच हल्लीची पिढी जेव्हा नोकरी बदलते तेव्हा भविष्य निर्वाह निधी काढून घेतला जातो. त्यामुळे निधी काढल्याचा चक्रवाढ दरावर परिणाम नक्कीच होतो.

* दुसरा गैरसमज

तो असा की, ‘माझी मुले, माझी काळजी घेतील.’

मालमत्ता, सोने आणि अभौतिक आर्थिक साधने पुढील पिढीकडे नक्कीच सोपविता येतील. परंतु आपल्या निवृत्ती नियोजनाचा आपणच विचार करायला हवा. आज सरासरी आयुर्मान वाढल्यामुळे अनेक घरांत ९० वर्षांचे आजोबा आणि साठीच्या वर असलेला त्यांचा मुलगा पाहायला मिळतात. आज आरोग्य खर्चात सातत्याने वाढ होत आहे आणि मुलांची संख्या मर्यादित होत आहे. सर्वोत्कृष्ट जीवनाची आस असलेल्यांनी निवृत्ती नियोजनासाठी सुद्धा गुणवत्तेची कास धरायला हवी.

* तिसरा गैरसमज

तिसरा गैरसमज हा की, ‘मी सेवानिवृत्तिपश्चात अधिक काम करेन.’

ज्यांचे सेवा निवृत्ती नियोजन परिपूर्ण नाही किंवा ज्यांच्याकडे ‘नॉन काँट्रिब्युटरी पेन्शन’चा अभाव आहे अशी मंडळी आज सेवानिवृत्तिपश्चात काम करण्याची चर्चा करतात. आज तंत्रज्ञानामुळे एखादी नोकरी करण्यासाठी लागणारी कौशल्ये वेगाने बदलत आहेत. वाढत्या वयात नवीन कौशल्य आजमावण्याची क्षमता कमी होत असताना यांच्यासाठी त्यांना अपेक्षित पगार देणाऱ्या नोकऱ्या उपलब्ध असतील काय? याचा ही मंडळी विचार करीत नाहीत. पूर्वीच्या पिढीने निवृत्त होईपर्यंत काम केले. सध्या पन्नाशीच्या आत-बाहेर अनेकांना सक्तीची निवृत्ती दिली जाते.

* वास्तव..

सत्य असे आहे की- सेवानिवृत्तीच्या नियोजनात आपण खूप मेहनत करणे, जास्त वेळ काम करणे किंवा वारसांवर अवलंबून राहणे आवश्यक नाही. यासाठी फक्त एक नियोजनबद्ध बचतीची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. नोकरीच्या ३५ वर्षांत दरमहा ५,००० रुपयांची नियोजनबद्ध गुंतवणूक वार्षिक ९ टक्के दराने वाढली तर २१ लाखांचे १.४८ कोटी रुपये होऊ शकतात. ही बचत दर वर्षी ५ टक्के वाढवत राहिली तर ५४ लाखांच्या गुंतवणुकीचे ९ टक्के वार्षिक परताव्याने २.५२ कोटी रुपयांची पुंजी तयार होऊ शकेल. या आकडेमोडीत गृहीत धरलेले आकडे अवास्तव नाहीत. अवास्तव आहेत त्या सुरक्षित सेवानिवृत्तीबद्दलच्या अपेक्षा. या अवास्तव कल्पना काढून टाकल्यास सेवानिवृत्ती सुरक्षित करणे शक्य आहे.

या शक्यतांचा विचार करून अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाने अ‍ॅक्सिस रिटायरमेंट सेव्हिंग्ज फंड गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिला आहे. या योजनेत गुंतवणुकीचे तीन विकल्प उपलब्ध आहेत. ‘अ‍ॅग्रेसिव्ह प्लान’मध्ये समभाग गुंतवणूक ६५ ते ८० टक्के असेल, डायनॅमिक प्लानमध्ये ६५ ते १०० टक्के समभाग गुंतवणुकीच्या जोडीला अस्थिरता कमी करण्यासाठी अंशत: समभाग गुंतवणूक ‘हेज’ केलेली असेल. ‘कन्झव्‍‌र्हेटिव्ह प्लान’ या तिसऱ्या विकल्पात ८०-९० टक्के रोखे आणि २० ते १० टक्के समभाग गुंतवणूक असेल.

या योजनेत एकरकमी गुंतवणुकीशिवाय पद्धतशीर गुंतवणुकीद्वारे (एसआयपी) गुंतवणूक करता येईल.

ही योजना तीन गुंतवणुकीचा पर्याय देईल. फंड घराण्याने या योजनेंतर्गत ‘आय प्लस’ हे गुंतवणूकदाराला विमा कवच उपलब्ध करून दिले असून या विमा संरक्षणाची कमाल मर्यादा ५० लाख आहे. दुर्दैवाने एसआयपी कालावधीत गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास ही सुविधा गुंतवणूकदाराच्या वारसाला त्याच्या एसआयपीच्या उर्वरित वचनबद्धतेइतकी रक्कम प्रदान करते. उदाहरणार्थ, एखाद्या गुंतवणूकदाराने १० वर्षांच्या एसआयपीसाठी वचनबद्धता दिली असेल, तर १२ हप्त्यांनंतर विमाछत्राला सुरुवात होईल. समजा २० हप्त्यांनंतर या गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास उर्वरित ८० हप्त्यांइतकी रक्कम वारसाला विमा कंपनीकडून मिळेल. सेवानिवृत्तीचे नियोजन ही निवृत्तीच्या उत्पन्नाची उद्दिष्टे ठरविण्याची प्रक्रिया आणि ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक कृती आणि निर्णय आहे.

सेवानिवृत्ती नियोजन म्हणजे सेवानिवृत्तिपश्चात उत्पन्नाचे स्रोत निश्चित करणे, खर्चाचा अंदाज घेणे आणि त्यासाठी कमावत्या वयात बचतीला सुरुवात करणे, तर सेवानिवृत्तिपश्चात मालमत्ता विभाजन व जोखीम व्यवस्थापन यांची सांगड निवृत्तीनंतरच्या उद्दिष्टांशी घालणे होय.

निवृत्तीनंतरची ठरविलेली उद्दिष्टे साध्य होतील की नाही हे भविष्यकाळातील रोख प्रवाह निश्चित करतात. सेवानिवृत्तीची योजना आखणे ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. आपण निवृत्ती नियोजनाला कधीही सुरुवात करू शकतो. परंतु आपण सुरुवातीपासूनच आपल्या आर्थिक नियोजनाचा घटक ठरविल्यास सुरक्षित आणि संपन्न निवृत्तीची खात्री करण्याचा हा उत्तम मार्ग आहे. या गंभीर आणि कदाचित कंटाळवाणा विषय टाळण्याकडे लोकांचा कल असला तरी सेवानिवृत्ती ही कोणी टाळू शकत नाही. म्हणून आजच या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही तुमच्या वित्तीय नियोजकाबरोबर चर्चा करणे गरजेचे आहे.

* (लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आहेत, akswealth@gmail.com ई-मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2019 4:11 am

Web Title: planning for a secure retirement abn 97
Next Stories
1 थेंबे थेंबे तळे साचे : पैसा सांभाळून वापरण्याचे काळ खुणावतोय!
2 नावात काय? : जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पादन)
3 अर्थ वल्लभ : मिडकॅप आवडे कोणाला?
Just Now!
X