03 June 2020

News Flash

निवृत्ती नियोजन ‘जरा हटके’!

मागील लेखात (अर्थ वृत्तान्त, ३ नोव्हेंबर) सीनियर सिटिझन सेिव्हग्ज स्कीमचे व्याज ९% आहे असे लिहिले होते.

| November 10, 2014 07:30 am

मागील लेखात (अर्थ वृत्तान्त, ३ नोव्हेंबर) सीनियर सिटिझन सेिव्हग्ज स्कीमचे व्याज ९% आहे असे लिहिले होते. परंतु सहा महिन्यांपूर्वी हे व्याज वाढवून ९.२% झाले आहे. यामुळे ही योजना वरिष्ठ पेन्शन योजनेच्या ८.७३% परताव्यापेक्षा जास्त आकर्षक वाटते. पण काही राष्ट्रीयीकृत बँका दीर्घ मुदतीसाठी ९.२०% पेक्षाही जास्त व्याज देत आहेत म्हणून आधीच्या लेखातील तुलना बदलत नाही.
दरमहा घरखर्चासाठी हातात ठरावीक रक्कम येत राहावी ही मराठी माणसाची धारणा असते. त्यात जोखीम नको असते. दरमहा येणारे व्याज आवश्यक नसेल तर त्याची नंतर पुन्हा गुंतवणूक केली जाते किंवा जमा रक्कम एखाद्या टूरसाठी किंवा एखाद्या मोठय़ा खरेदीसाठी वापरली जाते. हा साचेबंद मराठी दृष्टिकोन झाला. सर्व मध्यमवर्गीय कुटुंबात वेगळा विचार केला जात नाही. म्हणूनच ‘जरा हटके’ विचार केल्यास किती फायदा होतो ते पाहू.
इंग्रजीत ‘िथक आऊट ऑफ द बॉक्स’ म्हणतात त्याप्रमाणे चौकटीच्या बाहेर विचार करणे का गरजेचे ते पाहू. आपली पुंजी महागाई खाऊन टाकते हे आपल्या लक्षातच येत नाही. आपल्या व्याज घेण्यात आणि मुद्दल जोखीममुक्त ठेवण्याच्या नादात आपण मध्यमवर्गीय गरीब होत असतो. पूर्वी सांगितलेली गोष्ट पुन्हा सांगतो-
माझ्या वडिलांचे मित्र १९८२ साली एका मोठय़ा कंपनीतून निवृत्त झाले त्या वेळेस त्यांना दरमहा पगार रु. ८५०/- होता. त्यांना ग्रॅच्युइटी व प्रॉव्हिडंड फंड मिळून रु. एक लाख मिळाले. ते त्यांनी त्या वेळेच्या १२% व्याजदराने राष्ट्रीयीकृत बँकेत ठेव स्वरूपात ठेवले. त्यांना खूप आनंद झाला की दरमहा पेन्शन स्वरूपात घरी बसून रु. १०००/- मिळणार जे शेवटच्या पगारापेक्षा जास्त आहेत. आज त्यांचे रु. एक लाख ९.५०% व्याजाने त्याच बँकेत सुरक्षित आहेत आणि वयाच्या ९२ व्या वर्षी दरमहा त्यांचा फक्त औषधांचा खर्च उत्पन्नाच्या दहापट आहे.
निवृत्ती नियोजन करताना आपले पुढील आयुष्यमान किती मोठे असू शकेल याचा अंदाज घेता येतो. आपल्या आई-वडिलांचे आयुर्मान काय होते, त्यांच्या आईवडिलांचे आयुर्मान काय होते, असा विचार करून त्यामध्ये २५ वष्रे मिळवा. म्हणजे तुमच्या आई-वडिलांचे वय ८०-८५ असेल तर तुम्ही सहज १०५ वष्रे जगणार (होय, सहज!). ‘‘आमचे आईवडील साजूक तुपावर वाढले आम्ही वनस्पती तुपावर वाढलो, म्हणून आमचे आयुर्मान त्यांच्यापेक्षा कमी असेल.’’ हा संवाद भारतातला प्रत्येक आíथक नियोजनकार ग्राहकाकडून ऐकत असतो. यावर सर्व आíथक नियोजनकारांचे एकच उत्तर असते, ‘‘तुमच्या वडिलांच्या वेळेस बायपास सर्जरीची सोय नव्हती, या उलट येत्या काही वर्षांत नॅनो टेक्नॉलॉजीमुळे ही शस्त्रक्रियाच बायपास होईल.’’ निवृत्ती नियोजनाकडे आज डोळसपणे बघण्याची गरज आहे.
av-02
आपण वयाच्या २५ वर्षांपर्यंत शिकत असतो. पुढे ३५ वष्रे गृहस्थाश्रम व नंतरची ४० ते ५० वष्रे आधीच्या ३५ वर्षांत कमावलेले वापरणार असतो. त्यात दरवर्षी बेफाट वाढणारी महागाई. यासाठी ठरावीक चौकटीच्या बाहेर विचार करणे गरजेचे आहे. म्हणजेच गुंतवणूक शेअर बाजारात करणे, ज्यायोगे मासिक उत्पन्नाबरोबरच तुमच्या मुद्दलात वाढ होत राहील. आज शेअर बाजाराचा अभ्यास करणे जड वाटत असेल तर गुंतवणूक म्युच्युअल फंडापर्यंत करता येते.
आमच्या एका ग्राहकाने निवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेपकी रु. दहा लाख १ एप्रिल २००३ मध्ये एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या प्रुडन्स फंड योजनेत, समृद्धी (ग्रोथ) पर्यायामध्ये गुंतविले. त्या वेळेस त्या योजनेचे निव्वळ मालमत्ता मूल्य रु. २४.०७ होते. १ जून २००३ रोजी गुंतविलेल्या दहा लाखांसाठी त्यांना ४१५४५.४९२३ युनिट्स मिळाले. ही योजना त्या वेळेस ‘व्हॅल्यू रिसर्च’ संस्थेने पंचतारांकित श्रेणीत नामांकित केली होती. आज या योजनेचे नामांकन तीन तारांकित आहे (कमी झाले आहे!). १ मे २००३ पासून ते दरमहा १०००० रु. या योजनेतून काढतात (सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लॅन). बरोबर दहा वर्षांनंतर १ एप्रिल २०१३ रोजी या योजनेचे निव्वळ मालमत्ता मूल्य रु. २२३.६२७ होते व त्यांच्या शिल्लक २८६१९.७६३८ युनिट्सची किंमत ६४ लाख रुपये होती. म्हणजे दरवर्षी १२% पेंशनसारखे (करमुक्त) उत्पन्न व मुदलात सहापटीपेक्षा जास्त वाढ. दरमहा काढलेली रक्कम ही मुद्दल अधिक फायदा या स्वरूपात असते म्हणून पहिल्या वर्षी त्यांना शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झाला व त्यावर १५% कर द्यावा लागला. नंतर त्यांना कधीही कर द्यावा लागला नाही.
दहा वर्षांनंतर १ मे २०१३ पासून त्यांनी दरमहा २०,००० रुपये या योजनेतून काढण्यास सुरुवात केली आहे. आज या योजनेचे निव्वळ मालमत्ता मूल्य रु. ३६८.४८ (१ नोव्हेंबर २०१४ रोजी) आहे व त्यांच्या मूळ दहा लाख रुपयांची किंमत ९० लाख रुपयांच्या वर आहे.
ही योजना १ फेब्रुवारी १९९४ रोजी सुरू झाली. मूळ म्हणजे युनिटमागे १० रुपयाने गुंतवणूक करणाऱ्यास वार्षकि परतावा २०.६५% आहे आणि आपण मराठी माणसे चर्चा ८.७३% व्याजापेक्षा ९.२० किंवा ९.५०% कसे सरस आहे अशी करतो आणि त्यावर आयकर भरतो. काहीही कष्ट न करता २०.६५% करमुक्त परतावा वर्षांनुवष्रे मिळणे आपल्या विचारातच येत नाही. या २० टक्क्यांतील १२% दरमहा स्वरूपात काढून घेतले तरी उर्वरित ८% मुद्दल वाढवीत राहतात. ही एकच योजना नाही, कोणत्याही जुन्या इक्विटी योजनेचा विचार करता दीर्घ मुदतीत २०% नफा येतो. अशा काही योजना खालीलप्रमाणे-
या व्यतिरिक्त सर्वात प्रथम आलेली योजना ज्यात लोकांनी मुदत ठेवीप्रमाणे विश्वासाने रक्कम गुंतवली ती म्हणजे ऑक्टोबर १९८६ मध्ये आलेली युनिट ट्रस्टची मास्टर शेअर्स योजना. मध्यंतरीच्या काळात यातील ‘ट्रस्ट’ जाऊनसुद्धा याचा वार्षकि परतावा १९.१६% आहे.
मासिक उत्पन्नाच्या दृष्टीने दुसरा चौकटीच्या बाहेरचा विचार म्हणजे दरमहा मिळणारे भाडे (रेंट). मराठी माणूस पुण्यात एखादे घर घेऊन ‘कृतकृत्य’ होतो. पण हे घर भाडय़ाने देऊन दरमहा पेन्शनसारखे भाडे मिळेल आणि गुंतविलेली रक्कमसुद्धा वाढेल असा विचार करीत नाही. घरच का? दुकान का नाही? दहा बाय दहाचा दुकानाचा लहान गाळासुद्धा बँकेला एटीएम मशिन ठेवण्यासाठी भाडय़ाने देता येतो.
लहान आकाराचे दुकान खरेदी केल्यास निवृत्तीनंतर साधा-सोपा व्यवसाय चालू करता येतो. माझ्या मित्राला पन्नासाव्या वर्षी नाइलाजाने (स्वेच्छा)निवृत्ती घ्यावी लागली. आलेल्या रकमेतून त्याने एक दुकान घेऊन तेथे लाँड्रीचा व्यवसाय सुरू केला. आज त्याची त्याच शहरात पाच दुकाने आहेत व नोकरीपेक्षा पाचपट कमाई आहे. दुकान असेल तर व्यवसायाचे पर्याय पुष्कळ असू शकतात. मोन्जीनीझ, चितळे किंवा एखाद्या आइसक्रीमची फ्रॅन्चायझी घेता येते. अशा पद्धतीत निवृत्तीनंतरही पुढे २५-३० वष्रे कार्यरत व कमावते राहता येईल. कार्यरत राहा व तंदुरुस्त व्हा आणि आपल्या मुलांकडे व्यवसाय सुपूर्द करा म्हणजे त्यांनासुद्धा निवृत्तीनंतरची काळजी शिल्लक राहणार नाही.

(लेखक सेबीकडे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2014 7:30 am

Web Title: planning for retirement
टॅग Arthvrutant
Next Stories
1 छोटय़ांच्या बाजाराची, मोठी झेप!
2 खाणकामाला गती कंपनीसाठी आशादायी
3 आधी केलेल्या गुंतवणुकांचा आढावा घेणे महत्त्वाचेच!
Just Now!
X