अजय वाळिंबे

यंदाच्या वर्षांत जे काही चांगले ‘आयपीओ’ बाजारात आले त्यांत पॉलीकॅब इंडियाचा समावेश करावा लागेल. एप्रिल २०१९ मध्ये ५३८ रुपयांना दिला गेलेला हा शेअर सध्या ९०० रुपयांच्या आसपास उपलब्ध असल्याने गुंतवणूकदारांना त्याचा चांगलाच फायदा झालेला आहे. १९९६ मध्ये स्थापन झालेली पॉलीकॅब इंडिया लिमिटेड ही कंपनी तार, केबल्स आणि फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रिकल गुड्स (एफएमईजी) उत्पादनांचे उत्पादन, विक्री आणि वितरण या व्यवसायात आहे. कंपनीच्या मुख्य उत्पादनात एफएमईजी उत्पादने, सौर उत्पादने, ल्युमिनेयर्स, एलईडी लाइटिंग, इलेक्ट्रिक फॅन आणि स्विचगियर यांचा समावेश होतो.

कंपनीच्या २५ उत्पादन सुविधा असून त्यात गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड तसेच दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो. यामध्ये टेक्नो आणि ट्रॅफिगुरा या दोन संयुक्त  उद्यमांचादेखील समावेश आहे. या उत्पादन सुविधांपैकी तीन एफएमईजी उत्पादन प्रकल्प आहेत, ज्यात टेक्नो यांच्या संयुक्त सहकार्याने उभा राहिलेला एलईडी उत्पादनांचा प्रकल्प आहे. २०१६ मध्ये कंपनीने कॉपर वायर रॉड्स (रायकर प्लांट) उत्पादनासाठी ट्राफिगुरा या कमोडिटी ट्रेडिंग कंपनीच्या संयुक्त विद्यमाने हलोळ येथे प्रकल्प उभारला आहे. कंपनीची २० राज्यांत २९ गोदामे असून देशभरात २८०० हून अधिक वितरक आहेत.

भारतीय बाजारपेठेत १८ टक्के हिस्सा असलेली पॉलीकॅब आज वायर आणि केबल क्षेत्रातील एक नामांकित ब्रँड आहे. ४० हून अधिक देशांत आपली उत्पादने निर्यात करणाऱ्या या कंपनीने गेल्या दोन वर्षांत चांगलीच प्रगती केली आहे. सप्टेंबर २०१९ अखेर संपलेल्या तिमाहीसाठीदेखील कंपनीने उत्तम आर्थिक कामगिरी करून दाखवली आहे. या तिमाही कालावधीत कंपनीने २,२३९.८५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १९२.१६ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या कालावधीच्या तुलनेत तो तब्बल १०८ टक्क्यांनी जास्त आहे. औद्योगिक क्षेत्रात मंदीचा माहोल असतानादेखील कंपनीने समाधानकारक प्रगती केलेली आहे. सध्या पॉलीकॅबचा शेअर वार्षिक उच्चांकाच्या जवळपास आहे. मात्र मंदीच्या कालावधीत संधी मिळताच मध्यम कालावधीसाठी खरेदी करून चांगला नफा कमावता येईल असा हा शेअर आहे.

पॉलीकॅब इंडिया लि.

शुक्रवारचा बंद भाव : रु. ९३८.००

(बीएसई कोड – ५४२६५२)

लार्ज कॅप समभाग

प्रवर्तक : जयसिंघानी कुटुंब

व्यवसाय : केबल्स, वायर, दिवे

बाजारभांडवल:  रु. १४,११४ कोटी

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक:     रु. ९५०/५२५

भागभांडवल:  रु. १४८.६५ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक    ६८.६९

परदेशी गुंतवणूकदार  ३.७५

बँक/ म्यु. फंड/ सरकार    १४.२८

इतर/ जनता    १३.२८

पुस्तकी मूल्य : रु. २१८.६

दर्शनी मूल्य :   रु. १०/-

लाभांश :  ३०%

प्रति समभाग उत्पन्न :    रु.४३.९६

पी/ई गुणोत्तर :     २१.६

समग्र पी/ई गुणोत्तर :    १५

डेट इक्विटी गुणोत्तर :    ०.०४

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : १४.६६

रिटर्न ऑन कॅपिटल : २७.७८

बीटा :    ०.९