तृप्ती राणे

पोर्टफोलिओतील शेअर्स चांगला फायदा दाखवत असल्याचे बघण्यात जी मजा आहे ती काही औरच आहे. पण त्यासाठी बाजाराला नक्की काय वर नेतं आणि काय खाली खेचतं हे मात्र जाणून घेता यायला हवे..

जगातील सर्वात मोठय़ा अर्थव्यवस्थेतील एक मोठा सोहळा नुकताच पार पडला. अमेरिकेतील मतदान हा लोकशाहीचा सोहळाच! खरे तर जगाचं लक्ष बायडेन की ट्रम्प याबाबत तिथली जनता काय कौल देते याकडे होतं. निकाल कोणाच्या बाजूने लागेल, आणि त्यांनतर जागतिक शेअर बाजारांवर त्याचा काय परिणाम होईल, इतर गुंतवणूक पर्यायांचं काय होईल, अशा प्रकारची अनिश्चितता बऱ्याच प्रमाणात होती.

आणि जेव्हा अनिश्चितता वाढते तेव्हा मुरलेला गुंतवणूकदार जोखीम कमी करून थोडी वाट बघतो. आपल्या गुंतवणुकीवर परिणाम करणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत आणि या प्रत्येक गोष्टीचा गुंतवणुकीवर काय परिणाम होईल याचा अंदाज बांधून पुढची पावलं उचलतो. याउलट सर्वसाधारण गुंतवणूकदार बाजार वर जाताना पैसे गुंतवतात आणि खाली आल्यावर तोटय़ात विकतात. तसं पाहायला गेलं तर शेअर बाजारात गुंतवणूक दोन मानसिकतेनुसार केली जाते. एक, दीर्घकालीन फायदे – ज्यामध्ये वर्षांनुवर्षे शेअर्स घेऊन ठेवले जातात, तर दुसरी अल्पकालीन फायदे – ज्यामध्ये बाजाराचा रोजचा कल लक्षात घेऊन सतत खरेदी-वक्रीचे व्यवहार केले जातात. अनेक जण यात सक्रिय आहेत, आणि अनेकांनी याच्यातून नफा कमावलेला आहे. आपल्या नोकरी-धंद्यांना सांभाळूनसुद्धा काही गुंतवणूकदारांनी स्वत:चा चांगला पोर्टफोलिओ बनविलेला आहे. परंतु ज्यांना बाजार समजत नाही त्यांना मात्र याच्या तेजीच्या सापळ्यात अडकायला होतं, आणि मग हे अभिमन्यू बाजाराला कायमचा रामराम ठोकतात. शेअर बाजारातून नक्कीच फायदा होऊ शकतो, पण त्यासाठी त्याच्यावर कोणत्या गोष्टींचा परिणाम होतो हे जाणून घेतलं तर नक्कीच चुका कमी. तेव्हा आजच्या लेखातून बाजाराला नक्की काय वर नेतं आणि काय खाली खेचतं हे थोडक्यात जाणून घेऊया. आजचा विषय चांगलाच खोल आहे, परंतु साध्या भाषेत खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे.

१. कंपन्यांची कामगिरी

एखादी कंपनी जेव्हा चांगले परिणाम दाखवते किंवा अपेक्षेपेक्षा वेगळे काहीतरी करून दाखवते, तेव्हा तिची किंमत वधारते. तर काही वेळा ती वर्षांनुवर्षे स्वत:ची एक चांगली प्रतिमा तयार करते, गुंतवणूकदाराच्या मनात भरवसा निर्माण करते आणि म्हणून तिच्या शेअरला चांगली मागणी असते. याविरुद्ध, अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान किंवा कमी नफा मिळवणाऱ्या कंपन्यांचे शेअर मात्र खाली येतात. कधी कधी भारतीय कंपनीवर परदेशात नुकसान झालं किंवा तिथे एखाद्या कायद्याच्या कचाटय़ात ती सापडली तरीसुद्धा तिच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो.

२. आर्थिक/पतधोरण

देशातील अर्थव्यवस्था कशी चालू आहे, महागाई किती आहे, येत्या काळात कोणत्या प्रकारची आर्थिक संकटे येण्याचा अंदाज आहे, अशा सगळ्या क्लिष्ट गोष्टींचा विचार करून आपली मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझव्‍‌र्ह बँक ही रेपो दर, रिव्हर्स रेपो दर, इत्यादी प्रकारे व्याज दर आणि रोकडसुलभता यांचा समतोल सांभाळत असते. जेव्हा रेपो दरात वाढीचं रिझव्‍‌र्ह बँक धोरण आखते तेव्हा बाजारात निराशा पसरते, पैशांचा पुरवठा कमी होतो आणि मग बाजारात घट होते. त्याउलट, जेव्हा व्याज दर कमी असतात तर त्याचा  फायदा कर्ज घेणाऱ्या व्यवसायांना होतो, त्यांचे फायदे वाढतात किंवा नुकसान कमी होतं, गुंतवणूकदारांकडे रोकडसुलभता वाढते आणि पर्यायाने गुंतवणूक वाढते. म्हणून रिझव्‍‌र्ह बँक काय करत आहे याकडे लक्ष नक्की ठेवावे.

३. विनिमय दर

भारतीय चलनाचा इतर देशांच्या चलन दराबरोबर असलेल्या नात्यामुळे त्याच्या विनिमय दरामध्ये सारखा बदल होत असतो. रुपया वधारला की आपल्याकडून निर्यात होत असलेल्या गोष्टी महाग होतात. याचा वाईट परिणाम निर्यात करणाऱ्या कंपन्यांच्या कामगिरीवर होतो. आणि याउलट जेव्हा रुपया पडतो तेव्हा आपण आयात करतो त्या गोष्टी स्वस्त होतात आणि आपल्या देशाचे पैसे वाचतात. बाहेरच्या देशातून माल खरेदी करणाऱ्या कंपन्यांचा फायदा वाढतो. तेव्हा या घटकाचा परिणाम नुसता कंपनीवर नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो. या दरावर म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेचं व्यवस्थित लक्ष असतं.

४. राजकारण

राजकारणातील घडामोडी, जसं की निवडणूक, परराष्ट्रीय धोरणातील बदल, अशा गोष्टींचासुद्धा शेअर बाजारावर परिणाम होतो. परकीय गुंतवणुकीसाठी चांगलं वातावरण, व्यवस्थित आणि शाश्वत कर रचना ठेवल्याने, इतर देशातून आपल्या देशात होणाऱ्या गुंतवणुकीवर आणि पर्यायाने शेअर बाजाराच्या तेजी आणि मंदीवर होतो. निवडणुकीच्या काळात जेव्हा सरकारकडून विकासात्मक धोरणांवर जास्त लक्ष दिलं जाऊन त्यानुसार पुढे हालचाली सुरू होतात तेव्हा बाजार वधारतो आणि युद्धजन्य स्तिथी निर्माण झाल्यास, वित्तीय परिस्थिती बिघडल्यास किंवा विकासकार्ये थांबली की बाजारात अस्थिरता निर्माण होते.

५. नैसर्गिक आपत्ती

करोनामुळे मार्चच्या अखेरीस जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण होऊन सगळेच बाजार खाली आले. परंतु हेच बाजार नंतर येणाऱ्या बातम्यांमुळे आणि परिस्थितीचा आढावा बऱ्यापैकी आल्याबरोबर वधारतानाही दिसले. कारण या अशा प्रकारच्या आपत्तीमध्ये देशातील व्यवसायचक्र थांबते, आर्थिक नुकसान होतं, गुंतवणूकक्षमता कमी होते आणि सगळीकडे निराशामय वातावरण निर्माण होतं. म्हणून अशा वेळी कंपनीच्या उद्योग क्षेत्रानुसार तिच्या शेअरच्या किमतीवर परिणाम होतो.

६. सोनं आणि रोखे

सोनं आणि सरकारी रोखे यांची मागणी वाढली की शेअर बाजार खाली येतो. सोनं आणि सरकारी रोखे हे सर्वात सुरक्षित गुंतवणुकीच्या श्रेणीत बसतात. म्हणून बाजारात खूप अस्थिरता निर्माण व्हायची चिन्हं दिसू लागली की, शेअर बाजारातून पैसे या दोन गुंतवणूक पर्यायांकडे  वळतात. परिणामी बाजार खाली येतो. २००८ सालचं आर्थिक  संकट, या वर्षीचं करोना संकट या दोन्ही जागतिक संकटांच्या वेळी सोन्यामधील गुंतवणुकीने चांगलेच विक्रम केले. शिवाय जेव्हा खासगी कर्ज बुडीत निघायचं प्रमाण वाढतं तेव्हासुद्धा सरकारी रोख्यांची मागणी वाढते आणि शेअर बाजारातील गुंतवणूक कमी होते.

वरील नमूद केलेले घटक हे प्रत्येक क्षणी शेअर बाजारावर परिणाम करत असतात. कधी एखाद्या कंपनीवर, तर कधी एखाद्या उद्योग क्षेत्रावर, तर कधी सरसकट संपूर्ण बाजारावर. आणि फक्त देशातील नाही तर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा, इतर देशातल्या राजकीय निर्णयांचा, तिथल्या मध्यवर्ती बँकांच्या आर्थिक धोरणांचासुद्धा आपल्या बाजारावर परिणाम होतो. या आणि अशा प्रकारच्या इतर घटकांचा एकमेकांशी असलेला संबंध जेव्हा एखादा गुंतवणूकदार समजून घेतो, तेव्हा त्याला बाजारात कधी शिरायचं तर कधी त्यातून बाहेर पडायचं हे बऱ्यापैकी कळतं. आणि मग आधी म्हटल्याप्रमाणे एक तर फायदा होतो किंवा नुकसान कमी होतं. परंतु एक महत्त्वाची गोष्ट इथे प्रकर्षांने नमूद करावीशी वाटते. शेअर बाजार हा अपेक्षांचा हिशोब आहे. फायद्याची अपेक्षा बाजार वर नेते तर तोटय़ाची भीती बाजाराला खाली आणते. भीती आणि लालसा हे या बाजाराचे दोन ध्रुव आहेत. आणि या दोन ध्रुवांमध्ये गुंतवणूकदार कसरती करत असतो.

तेव्हा, बाजारात येताना प्रामाणिकपणा, सामान्य ज्ञान आणि चिकाटी या गोष्टींची तयारी करून आलं तर फायदा होईल असं मला वाटतं. आपला पोर्टफोलिओ आणि तोही चांगला फायदा दाखवणारा, बघण्यात जी मजा आहे ती काही औरच आहे. तर या दिवाळीमध्ये ‘मुहूर्त ट्रेडिंग’साठी सज्ज व्हा! या वर्षीच्या आगळ्यावेगळ्या दिवाळीमध्ये जरा आगळेवेगळे प्रयोग होऊन जाऊ दे!

 

लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.

trupti_vrane@yahoo.com