News Flash

माझा पोर्टफोलियो : मिळकतवाढ दमदार

यंदाच्या तिमाहीच्या उलाढालीत गेल्या डिसेंबर २०१९ च्या तुलनेत कंपनीने २१.३% वाढ नोंदवून ती १२११ कोटींवर गेली आहे

|| अजय वाळिंबे

सुमारे ३० वर्षांपूर्वी गुजरात अंबुजा एक्सपोटर्सची स्थापना विजयकुमार गुप्ता यांनी केली. १९९७-९८ मध्ये गुजरात अंबुजा एक्सपोटर्समध्ये अंबुजा समूहाच्या गुजरात अंबुजा कॉटस्पिन आणि गुजरात अंबुजा प्रोटीन्स यांचे विलीनीकरण झाल्यानंतर आज कंपनी कॉर्न स्टार्च डेरिव्हेटिव्हज, सोया डेरिव्हेटिव्हज, खाद्यपदार्थ, कॉटन यार्न आणि खाद्यतेल तेलाच्या उत्पादनातील एक आघाडीची कंपनी आहे. १९९१ मध्ये अस्तित्वात आल्यापासून कंपनी कृषी-प्रक्रिया क्षेत्रातील दीर्घकालीन वाढीची रणनीती असलेले अन्न, फार्मास्युटिकल, फीड आणि इतर अनेक उद्योगांना आपली विविध उत्पादने पुरवते. कंपनीच्या रिफायर्ड एरंडेल तेल, हायड्रेटेड एरंडेल तेल आणि हायड्रोजनेटेड एरंडेल तेलाच्या उत्पादनांना चांगली मागणी असून  डिटर्जंट्स, वंगण आणि रसायने बनविणाऱ्या उद्योगांमध्ये या उत्पादनांचा विस्तृत वापर आहे. मका प्रक्रियेमध्ये प्रति दिन सुमारे ३००० टन गाळप असलेली गुजरात अंबुजा ही सर्वात मोठी कंपनी असून तिचा बाजारात २५% हिस्सा आहे. याव्यतिरिक्त लवकरच कंपनी पश्चिम बंगालच्या मालदा येथे नवीन ग्रीन फिल्ड प्रकल्पाद्वारे प्रतिदिन १००० टन मक्याच्या प्रक्रियेची क्षमता असलेला प्रकल्प कार्यान्वयित करत आहे, त्यामुळे मका प्रक्रियेमध्ये उच्च मार्जिन डेरिव्हेटिव्ह उत्पादनांचे प्रमाण महाराष्ट्रातील चाळीसगाव येथे नुकत्याच कार्यान्वित झालेल्या नवीन डेरिव्हेटिव्हज क्षमतांसह आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

कंपनीचे मुख्यत्वे अ‍ॅग्रो डिव्हिजन, स्टार्च डिव्हिजन आणि कॉटस्पिन डिव्हिजन हे तीन प्रमुख उत्पादन विभाग असून भारतभरात गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, प. बंगाल तसेच महाराष्ट्र या राज्यात आठ उत्पादन प्रकल्प आहेत. गेली काही वर्षे कंपनी सातत्याने उत्तम कामगिरी करत असून गेल्या कठीण वर्षातही कंपनीने चांगली कामगिरी करून दाखवली आहे. नुकत्याच संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. यंदाच्या तिमाहीच्या उलाढालीत गेल्या डिसेंबर २०१९ च्या तुलनेत कंपनीने २१.३% वाढ नोंदवून ती १२११ कोटींवर गेली आहे, तर नक्त नफ्यात तब्बल १०२.२% वाढ होऊन तो १०९.५२ कोटी रुपयांवर गेला आहे, तर डिसेंबर २०२० पर्यंतच्या नवमाहीत कंपनीने ३०२८.७६ कोटी रुपयांची उलाढाल साध्य केली असून २१९.७२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या नवमाहीच्या तुलनेत तो १४०.४% ने अधिक आहे. कंपनीची विविध उत्पादने असून कारभार प्रामुख्याने खाद्य प्रक्रिया उद्योगावर अवलंबून आहे. सध्या या क्षेत्राला बरे दिवस आले असून साहजिकच कंपनीच्या उत्पादनांना चांगली मागणी राहण्याची शक्यता आहे. सध्या शेअर बाजारात १२७ रुपयांना उपलब्ध असलेला हा शेअर प्रत्येक पडझडीला मध्यम कालावधीसाठी खरेदी करण्याजोगा आहे.

गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स लि.

(बीएसई कोड – ५२४२२६)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १२७/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु.१५५ / ४३

संक्षिप्त विवरण

६ शेअर गट   : स्मॉल/ मायक्रो कॅप

६ बाजार भांडवल     : रु. २,९२४ कोटी

६ प्रवर्तक     : मनीष गुप्ता, अंबुजा समूह

६ व्यवसाय क्षेत्र       : अन्नप्रक्रिया/ खाद्यतेल

६ पुस्तकी मूल्य        : रु. ६२.६

६ दर्शनी मूल्य          : रु. १/-

६ गतवर्षी लाभांश    : ५०%

भरणा झालेले भागभांडवल रु. २२.९३ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक         ६३.८४

परदेशी गुंतवणूकदार  २.९१

बँक/ म्यु. फंड/ सरकार        ०.१९

इतर/ जनता    ३३.०६

शेअर शिफारसीचे निकष

प्रति समभाग उत्पन्न :  रु. १२

पी/ई गुणोत्तर :   १०.७

समग्र पी/ई गुणोत्तर :    २०

डेट इक्विटी गुणोत्तर :   ०.०७

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :        ६१.३

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : १३

बीटा :   ०.९

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 12:00 am

Web Title: portfolio increased income growth akp 94
Next Stories
1 गोष्ट  रिझव्‍‌र्ह बँकेची :  काँग्रेसचा बहिष्कार सरकारच्या पथ्यावर
2 क..कमॉडिटीचा :  तेलबिया क्रांतीसाठी योग्य वेळ
3 माझा पोर्टफोलियो : वंगण क्षेत्रातील दीर्घावधीची बाजी
Just Now!
X