|| वसंत माधव कुळकर्णी

प्रिन्सिपल इमर्जिग ब्लूचीप फंड

गुंतवणुकीसाठी समभाग ‘बॉटम अप अ‍ॅप्रोच’ पद्धतीने निवडून, दीर्घकालीन गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने निवडले जातात. कंपनीच्या मूल्यांकनाबाबत दीर्घकालीन दृष्टिकोन असला तरी निधी व्यवस्थापक योग्य वेळी समभाग विकून नफावसुली करतात. ‘ग्रोथ अ‍ॅट रिझनेबल प्राइस’ हे फंडाचे सूत्र राहिले आहे.

मागील आठवडय़ात प्रकाशित झालेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या अहवालातील जागतिक आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर केलेले भाष्य देशाच्या अर्थव्यवस्थेला ‘अच्छे दिन’ येतील असे आशादायक चित्र उभे करणारे आहे. रिझव्‍‌र्ह बँक सरकारच्या वतीने डॉलर व अन्य चलनातील रोख्यांत गुंतवणूक करीत असते. या परदेशातील गुंतवणुकीवर रिझव्‍‌र्ह बँकेला मिळणाऱ्या व्याजाच्या उत्पन्नात मागील वर्षांच्या तुलनेत २१ टक्के वाढ झाली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचा ३० जून रोजी संपलेल्या वर्षांचा ताळेबंद ७ टक्क्यांनी वाढला असून मागील वर्षी ही वाढ केवळ २ टक्के होती. रिझव्‍‌र्ह बँकेने सद्य वर्षांत भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत आशादायक सूर लावत अर्थव्यवस्था ७.४ टक्के दराने वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीने अर्थव्यवस्थेवरील ताण वाढविल्याने महागाई वाढण्याचा धोक्याचा इशारा रिझव्‍‌र्ह बँकेने दिला आहे. कुटुंबाचे उत्पन्न कासवगतीने तर खर्च सशाच्या वेगाने वाढत असतात. वाढती महागाई आणि कुटुंबाच्या वाढत्या खर्चाचा उत्पन्नाशी मेळ घालण्यासाठी बचतीवरील परताव्याचा दरसुद्धा पुरेसा हवा. प्रिन्सिपल इमर्जिग ब्लूचीप फंडातील पाच वर्षांच्या नियोजनबद्ध गुंतवणुकीवर वार्षिक २२.७६ टक्के आणि सुरुवातीपासून वार्षिक २२.५० टक्के परतावा देणारा फंड महागाईवर मात करण्यात एक उत्तम पर्याय असल्याचे फंडाच्या परताव्याने सिद्ध केले आहे. गुंतवणूकदारांच्या याच विश्वासामुळे सरत्या आठवडय़ात फंडाने २,००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सुज्ञ गुंतवणूकदारांत प्रिन्सिपल इमर्जिग ब्लूचीप फंडाची, मिड कॅप फंड अशी ओळख असली तरी म्युच्युअल फंडांच्या सुसूत्रीकरणानंतर या फंडाचा समावेश लार्ज अँड मिड कॅप फंड गटात झाला आहे. सनदी लेखापाल असलेले धीमंत शहा या फंडाचे १७ जून २०११ पासून निधी व्यवस्थापक आहेत. गुंतवणुकीसाठी समभाग ‘बॉटम अप अ‍ॅप्रोच’ पद्धतीने निवडून, दीर्घकालीन गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने निवडले जातात. कंपनीच्या मूल्यांकनाबाबत दीर्घकालीन दृष्टिकोन असला तरी निधी व्यवस्थापक योग्य वेळी समभाग विकून नफावसुली करतात. ‘ग्रोथ अ‍ॅट रिझनेबल प्राइस’ हे फंडाचे सूत्र राहिले आहे. नफावसुली केलेला समभाग नव्याने पुन्हा योग्य किमतीत खरेदी करण्याइतपत निधी व्यवस्थापन लवचीक आहे. कदाचित या कारणांमुळे या फंडाची कामगीरी अन्य मिड कॅप फंडाच्या तुलनेत उजवी होत असावी. फंडाच्या गुंतवणुकीत ब्रिटानिया इंडस्ट्रीज, आयशर मोटर्स, बजाज फायनान्स, एआयए इंजिनीअरिंग, एचडीएफसी बँक, एक्साइड इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस, इंडसिंध बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि एमआरएफ या आघाडीच्या दहा गुंतवणुका आहेत.

‘सेबी’च्या आदेशानुसार फंड ज्या फंड गटात मोडतो त्यानुसार फंडाच्या गुंतवणुकीचा ढाचा बदलणे आवश्यक होते. हा फंड लार्ज अँड मिड कॅप फंड गटात असल्याने ३१ जुलै रोजी फंडाची गुंतवणूक अनुक्रमे ३५ टक्के लार्ज कॅप, ४१.४१ टक्के मिड कॅप, २४ टक्के स्मॉल कॅप आणि २.९१ टक्के अन्य ठिकाणी गुंतवणूक आहे. फंड सुसूत्रीकरणापूर्वी फंडाच्या गुंतवणुकीत ३० टक्के दरम्यान असलेली लार्ज कॅपची मात्रा वाढविली आहे. यामुळे फंडाच्या गुंतवणुकीतील जोखीम आधीपेक्षा कमी झाली. लार्ज अँड मिड कॅप फंड गटात ३१ ऑगस्ट २०१८च्या एनएव्हीनुसार ५ आणि ७ वर्षे कालावधीतील सर्वोत्तम ‘एसआयपी’ परतावा असलेला हा फंड आहे. सुसूत्रीकारणापश्चात गुंतवणुकीतील मिड कॅप मात्रा कमी झाल्यामुळे गुंतवणुकीवरील परतावा कमी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मागील आठवडय़ात निर्देशांकांनी लागोपाठ तीन दिवस नवीन उच्चांक प्रस्थापित केले. बाजाराचे मूल्यांकन धोकादायक नसले तरी निर्धोक गुंतवणूक करावी असे नाही. अशा परिस्थितीत फंडाची निवड करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

श्रावण महिन्यात मिड कॅपची ‘शिवामूठ’ वाहण्याची परंपरा सालाबादाप्रमाणे या वर्षी कायम ठेवता आली. या आधी शिफारस केलेल्या एलआयसी एमएफ मिड कॅप फेड, मिरॅ अ‍ॅसेट इमर्जिग इक्विटीसारखे फंड म्युच्युअल फंड सुसूत्रीकरणापश्चात मिड कॅप न राहता लार्ज अँड मिड कॅप फंड झाले आहेत. मिड कॅपमधील घसरणीमुळे सध्या मिड कॅप फंड नव्याने गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटतात. रुपयाच्या घसरणीमुळे भारतातील निर्यातक्षम उत्पादनांना नक्कीच ‘अच्छे दिन’ येतील. अर्थव्यवस्थेच्या भविष्यातील वाटचालीबद्दल रिझव्‍‌र्ह बँक व अन्य अर्थसंस्था आशावादी आहेत. अर्थगतीचा वाढता वेग मिड कॅप कंपन्यांच्या मूल्यांकनाच्या पथ्यावर पडेल. लार्ज अँड मिड कॅप फंड गटात पाच आणि सात वर्षे कालावधीत एसआयपी परतावा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेला हा फंड आहे. आपल्या जोखीम स्वीकारण्याच्या क्षमतेनुसार सुचविलेल्या फंडांचा गुंतवणूकदरांनी विचार करावा.

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)