25 April 2019

News Flash

‘प्रोबेट’! इच्छापत्र : समज-गैरसमज ५

‘प्रोबेट’ हे सक्षम न्यायालयाकडून प्रमाणित केलेला दस्तऐवज होय.

|| डॉ. मेधा शेटय़े

इच्छापत्राचे महत्त्व आणि ते नामनिर्देशनापेक्षा (नॉमिनेशन) कसे वेगळे आहे हे या सदरातील आजवरच्या लेखांतून आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला. या लेखात आपण ‘प्रोबेट’, ‘निष्पादक’ (एक्झीक्युटर), ‘प्रशासक’ (अ‍ॅडमिनिस्ट्रेटर) याबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊ या.

‘प्रोबेट’ हे सक्षम न्यायालयाकडून प्रमाणित केलेला दस्तऐवज होय. या जारी केलेल्या प्रमाणपत्रावर न्यायालयाचा शिक्का आणि न्यायालयातील मुख्य निबंधक यांची सही असणे आवश्यक आहे. हा दस्तऐवज इच्छापत्र वैध आहे, असे शिक्कामोर्तब करते; पण या दस्तऐवजाबरोबर इच्छापत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. इच्छापत्र व न्यायालयाने प्रमाणित केलेले पत्र हे दोन्ही मिळून जारी केलेल्या दस्तऐवजाला एकत्रितपणे ‘प्रोबेट’ असे म्हणतात. प्रोबेटनामक प्रमाणपत्र इच्छापत्रात नमूद केलेल्या निष्पादकालाच जारी करतात. म्हणजेच निष्पादक हा प्रोबेटसाठी न्यायालयात अर्ज करू शकतो. हे प्राप्त झाल्यास निष्पादकाने इच्छापत्रात नमूद केलेली व त्यानुसार बजावलेली कर्तव्ये वैध ठरतात. उदाहरणार्थ, इच्छापत्र करणारी व्यक्ती ही  १ मार्च २०१७ ला मयत झाली असेल व त्याचे प्रोबेट १ जानेवारी २०१८ साली प्राप्त झाले तर त्या कालावधीत निष्पादकाने बजावलेली कर्तव्ये वैध ठरतात.

‘प्रोबेट’ करणे का महत्त्वाचे आहे?

१. प्रोबेट हे इच्छापत्र वैध असल्याचा निर्णायक पुरावा ठरतो.

२. इच्छापत्र करणारी व्यक्तीदेखील इच्छापत्र करण्यास कायदेशीररीत्या सक्षम होती याचा हा पुरावा होय.

३. इच्छापत्रात नमूद केलेली विधाने व निष्पादकाची नेमणूक वैध ठरते.

‘प्रोबेट’ करणे महत्त्वाचे आहे खरे, पण ते आवश्यक दस्तऐवज नाही. ते फक्त मुंबई, कोलकाता व चेन्नई या शहरांत आवश्यक आहे. एकापेक्षा जास्त निष्पादक असल्यास प्रोबेट त्या सर्वाना एकाच क्षणी किंवा भिन्न वेळेला प्राप्त होऊ शकते.

निष्पादक (एक्झीक्युटर) म्हणजे नेमके कोण?

इच्छापत्रात नमूद केलेल्या इच्छेची अंमलबजावणी करण्याकरिता नेमलेल्या व्यक्तीला निष्पादक असे म्हणतात. निष्पादकाची नेमणूक इच्छापत्र करणारी व्यक्तीच करते. वरील नमूद केल्याप्रमाणे निष्पादकालाच प्रोबेट देण्यात येते व प्रोबेट प्राप्त झाल्यास वर्षभरात निष्पादकाला इच्छापत्रात नमूद केलेल्या इच्छांची अंमलबजावणी करणे गरजेचे असते. तुमच्या विश्वासातला माणूस तुम्ही निष्पादक म्हणून नेमू शकता. तो तुमच्या आप्त-नातेवाईकांपकी कोणीही असू शकतो किंवा नातेसंबंधांव्यतिरिक्त कोणीही असू शकतो. तुमच्या इच्छापत्रातील लाभार्थीलाही निष्पादक म्हणून नेमता येतो; पण असा प्रश्न उद्भवतो की, जर निष्पादकाची नेमणूक इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीने केली नसेल तर?

सक्षम न्यायालय प्रशासकाची (अ‍ॅडमिन्रिटेटर) ची नेमणूक करते.

प्रशासकाची नेमणूक नेमकी कोणत्या प्रसंगात होते

१. इच्छापत्रात निष्पादकाची नेमणूक केली नसेल तर

२. निष्पादकाची नेमणूक केल्यास, पण तो निष्पादक म्हणून कार्य करण्यास असमर्थ असेल तर

३. निष्पादक म्हणून नेमलेल्या व्यक्तीने निष्पादकाची भूमिका बजावण्यास नकार दिला तर

४. निष्पादकाचा मृत्यू इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीच्या पश्चात, पण प्रोबेट मिळायच्या आधी झाला असेल तर प्रशासकाची नेमणूक होऊ शकते.

अशा व्यक्तींना प्रशासन पत्र दिले जाते, त्यामुळे प्रशासकाला इच्छापत्रात नमूद केलेल्या इच्छाची अंमलबजावणी करता येते. लाभार्थी न्यायालयात प्रशासकासाठी अर्ज करू शकतात.

(लेखिका कायदाविषयक तज्ज्ञ)

(या संदर्भातील आपले प्रश्न पाठविण्यासाठी ई-मेल : willassure@gmail.com)

First Published on January 28, 2019 2:14 am

Web Title: probate