फंडाविषयक विवरण
फंडाचा गुंतवणूक प्रकार    :    गुंतवणूकीसाठी कायम खुली असलेले रोखे गुंतवणूक करणारा         मुदत मुक्त (ओपन एंडेड डेट) फंड  
जोखीम प्रकार     :    रोखे गुंतवणूक असल्याने मुद्दलाची सुरक्षितता  
गुंतवणूक    :    केंद्र सरकारचे रोखे व सार्वजनिक क्षेत्रातील             कंपन्यांचे उच्च पतधारण करणारे रोखे     
निधी व्यवस्थापक     :    या फंडाचे निधी व्यस्थापक मूर्ती नागराजन                 आहेत. ते क्वांटम म्युच्युअल फंडाच्या निश्चित उत्पन्न                 देणाऱ्या योजनांचे प्रमुख आहेत. क्वांटम म्युच्युअल                 फंडात दाखल होण्याआधी ते टाटा म्युच्युअल फंडात                 निधी व्यवस्थापक होते.
गुंतवणूक पर्याय    :    वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (पे आउट व रिइन्व्हेंस्ट)
फंडाबद्दल अन्य माहिती    :    हा फंड ‘नो लोड’ प्रकारात मोडतो. या फंडाची प्राथमिक विक्री             २९ एप्रिल २०१५ ते १३ मे २०१५ दरम्यान सुरु असून, २५ मे             पासून फंड नियमित व्यवहार व पुन्हा गुंतवणुकीला खुला होईल.             क्वांटम     म्युच्युअल फंडाच्या योजना कोणत्याही मध्यस्थाशिवाय                 विकल्या जातात. या फंडात गुंतवणूक करण्यासाठी कंपनीच्या सेवा                 प्रतिनिधीशी ९८७०० ०९९६० या क्रमांकावर संपर्क करावा.
जे कोणी वाचक ‘लोकसत्ता कत्रे म्युच्युअल फंडां’च्या आज प्रसिद्ध झालेल्या परताव्याच्या दराशी मागील आठवड्याच्या दराशी तुलना करत असतील त्यांच्या हे लक्षात आले असेल की, इक्विटी म्युच्युअल फंडांच्या योजनांचा परताव्याचा दर घसरला आहे. एका महिन्यापूर्वी असलेल्या परताव्याच्या दरापेक्षा त्या फंडाचा आजचा परताव्याचा दर जवळपास पाच ते सात टक्यांनी कमी आहे. हे घडले कारण भारतीय शेअर बाजारात मागील दोन महिन्यात मोठी घसरण झाली. ५ मार्च रोजी नऊ हजाराच्या समीप असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीची आज ८,३०० ची पातळी सांभाळताना तारांबळ उडत आहे. अशा परिस्थितीत जे कोणी वाचक पुढील तीन वर्षांत विशेष जोखीम न घेता बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा अधिक परतावा मिळवू इच्छित असतील अशा गुंतवणूकदारांसाठी आजचा फंड आदर्श गुंतवणूक ठरावी. जगभरात रोखे गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड वैयक्तिक गुंतवणूकदारांत अत्यंत लोकप्रिय आहेत. परंतु भारतात अर्थसाक्षरतेचा अभाव असल्याने बँकांच्या मुदत ठेवी हा बहुतांशांनी स्वीकारलेला पर्याय आहे. बदलत्या परिस्थितीनुसार गुंतवणूकदारांनी सुद्धा आपल्या गुंतवणुकीत बदल करणे गरजेचे आहे.
रोखे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडांची कामगिरी ही प्रामुख्याने अर्थव्यवस्थेतील व्याजदरांच्या दिशेवर निश्चित होत असते. एखाद्या वर्षांत प्रमुख शेअर निर्देशांक खाली जाऊन देखील म्युच्युअल फंडांची एखादी योजना सकारात्मक परतावा देणे शक्य आहे. परंतु रोखे म्युच्युअल फंडाच्या योजनेच्या बाबतीत असे घडत नाही. एखाद्या वर्षांत व्याजदर वर गेले तर सर्व रोखे गुंतवणूक करणाऱ्या योजना आधीच्या वर्षांच्या तुलनेत कमी किंवा नकारात्मक परतावा देतील. मागील वर्षभरात व्याजदर कमी होण्याच्या अपेक्षेने व मागील आíथक वर्षांत प्रत्येकी पाव टक्क्याची दोन वेळा रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर कपात केल्याने रोखे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या योजनांनी दहा टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. (रोखे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या योजनांसाठी दोन आकडय़ातील परतावा अव्वल समजला जातो.) रोखे गुंतवणूक करणाऱ्या योजना प्रामुख्याने एका वर्षांपर्यंत मुदतीच्या रोख्यात (शॉर्ट टर्म फंड) दोन ते पाच वर्षांपर्यंत मुदतीच्या रोख्यात (मीडीयम टर्म फंड) व पाच ते दहा वर्षांपर्यंत मुदतीच्या रोख्यात (लॉंग टर्म फंड) जे मुख्यत्वे सरकारी रोख्यात (जी-सेक) गुंतवणुका करतात. क्वांटम डायनॅमिक बॉंड फंड या योजनेचा ८० टक्के निधी सरकारी रोख्यात तर उर्वरित निधी केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपन्यांनी जारी केलेल्या व अव्वल पतधारण करणाऱ्या रोख्यांत गुंतविला जाईल. उदाहरणार्थ रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन सारख्या रोख्यांना म्युच्युअल फंडांकडून मोठी मागणी असते.   
डायनॅमिक बॉंड फंड या प्रकारच्या योजनांत निधी व्यवस्थापक व्याजदराच्या दिशेनुसार गुंतवणूक करीत असलेल्या रोख्याची मुदत त्वरीत बदलत गुंतवणुकीवरील परताव्याचा दर निश्चित करीत असतात. ज्या वेळेला व्याजदर वाढण्याची शक्यता असेल तेव्हा कमी मुदतीच्या रोख्यात तर व्याज दर कमी होण्याची शक्यता असताना दूरची मुदतपूर्ती असलेल्या रोख्यात गुंतवणूक केली जाते. सध्याच्या कर कायद्यानुसार रोखे म्युच्युअल फंडाच्या योजनेतून मिळणाऱ्या नफ्यावर इंडेक्सेशनचा फायदा मिळण्यासाठी गुंतवणुकीचा कालावधी किमान तीन वष्रे असणे जरूरीचे आहे. अर्थात व्यवस्थेतील सध्याची व्याजदराची पातळी व महागाईचा दर पाहता पुढील वर्षांत व्याजदर किमान एका टक्क्याने खाली यावेत, असा अंदाज अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. जे कोणी या अंदाजाशी सहमत होतील त्यांनी तीन वर्षांसाठी या फंडात गुंतवणूक केल्यास दोन आकडय़ांतील परताव्याचा दर मिळेल अशी आशा बाळगता येईल. 
mutualfund.arthvruttant@gmail.com