सरलेल्या ९९ तिमाहींत जितके शिकता आले नाही ते सर्व या १०० व्या तिमाहीने शिकविले. जानेवारी – मार्च २०२० या तिमाहीत जगभरातील निर्देशांकांनी नवीन उच्चांक आणि आणि तीन वर्षांतील तळ अशा दोनही टोकाच्या पातळी गाठल्या. या ९९ तिमाहीतील सर्वाधिक अस्थिरतेचा अनुभव या तिमाहीने गुंतवणूकदारांना दिला. प्रत्येक तिमाही काहीतरी शिकवून जाते. सरलेल्या तिमाहीने फंड निवडीत ‘डाऊन – मार्केट कॅप्चर रेश्यो’चे महत्त्व अधोरेखित केले.

म्युच्युअल फंडाचा तिमाही आढावा नुकताच पूर्ण झाला. मागील पंचवीस वर्षे तिमाही आढावा घेत असल्याने सरलेली तिमाही शंभरावी तिमाही होती.

सरलेल्या ९९ तिमाहींत जितके शिकता आले नाही ते सर्व या १०० व्या तिमाहीने शिकविले. जानेवारी – मार्च २०२० या तिमाहीत जगभरातील निर्देशांकांनी नवीन उच्चांक आणि आणि तीन वर्षांतील तळ अशा दोनही टोकाच्या पातळी गाठल्या.

या ९९ तिमाहीतील सर्वाधिक अस्थिरतेचा अनुभव या तिमाहीने गुंतवणूकदारांना दिला. प्रत्येक तिमाही काहीतरी शिकवून जाते. सरलेल्या तिमाहीने फंड निवडीत ‘डाऊन – मार्केट कॅप्चर रेश्यो’चे महत्त्व अधोरेखित केले. ‘डाऊन – मार्केट कॅप्चर रेश्यो’ हे बाजार घसरणीत फंडातीच्या निधी व्यवस्थापकाच्या मुद्दल संरक्षित करण्याच्या कामगिरीचे सांख्यिकीय मापन आहे.

जेव्हा निर्देशांक घसरतो तेव्हा निधी व्यवस्थापकाने त्या कालखंडातील निर्देशांकाच्या तुलनेत किती भांडवल सुरक्षित राखले हे मूल्यांकन करण्यासाठी या परिमाणाचा वापर होतो. घसरणीच्या काळात निधी व्यवस्थापकाचा परतावा निर्देशांकाच्या परताव्याला भागून आलेल्या संख्येस १०० ने गुणाकार करून गुणोत्तर मोजले जाते.

बाजार घसरणीत १०० पेक्षा कमी ‘डाऊन – मार्केट कॅप्चर रेश्यो’ असलेले फंड मुद्दलाचे संरक्षण करण्यास यशस्वी ठरल्याचे मानले जाते. या निकषावर अ‍ॅक्सीस ब्लूचीप फंडाचे (‘डाऊन – मार्केट कॅप्चर रेश्यो’ ५२.७५) निधी व्यवस्थापक असलेल्या श्रेयस देवळकर हे यशस्वी निधी व्यवस्थापक ठरले.

त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर कॅनरा रोबेको इक्विटी डायव्हार्सीफाईड (‘डाऊन – मार्केट कॅप्चर रेश्यो’ ५४.८५) निधी व्यवस्थापक असलेले श्रीदत्त भांडवलदार यांचा क्रमांक लागला.

तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा अ‍ॅक्सीस मल्टीकॅप (‘डाऊन – मार्केट कॅप्चर रेश्यो’ ५७.५९) फंडाचे निधी व्यवस्थापक असेलेले श्रेयस देवळकर यांचा क्रमांक लागतो.

‘सेबी’च्या फंड वर्गवारीनुसार, घसरणीत कमीत कमी नुकसान झालेले सर्वाधिक फंड अ‍ॅक्सीस फंड घराण्याचे असून दुसऱ्या क्रमांकावर कॅनरा रोबेको या फंड घराण्याचा क्रमांक लागतो. या निकषावर कॅनरा रोबेको ब्लूचीप इक्वीटी, कॅनरा रोबेको इक्विटी डायव्हर्सीफाईड आणि कॅनरा रोबेको इमर्जिंग इक्विटीज यांनी त्यांचे ‘कर्ते’पण सिद्ध केले. ऑक्टोबर – डिसेंबर तिमाहीत ‘एलआयसी’च्या फंडांची निवडीच्याने अनेकांना धक्का दिला. परंतु क्रिसिलच्या पतवारीत याच फंडांना अव्वल पत मिळाल्याने फंड निवडीवर शिक्कामोर्तब झाले.

या तिमाहीत आयडीबीआय म्युच्युअल फंडांच्या दोन फंडांनी या यादीत पहिल्यांदाच स्थान मिळवले आहे. निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंडाच्या कामगिरी चिंता वाढविणारी आहे. मालमत्तेनुसार पहिल्या दहा फंड घराण्यांपैकी केवळ युटीआय इक्विटी फंड या यादीत आपले स्थान राखण्यात यशस्वी ठरला.

‘क्वाटरटाइल रँकिंग’ ही जगभरात मान्यता पावलेली म्युच्युअल फंड संधोधन पद्धती आहे. एखाद्या म्युच्युअल फंडाने त्याच्या फंड वर्गातील इतर सर्व फंडांच्या तुलनेत किती चांगली कामगिरी केली याचे मोजमाप करून त्या फंड गटातील फंडांची विभागणी पाच भागांत केली जाते.

या क्रमवारीत घसरत्या क्रमाने सर्वात चांगली कामगिरी असलेल्या फंडांपैकी २५ टक्के फंडांना ‘टॉप क्वाटरटाईल’मध्ये स्थान मिळते. त्यानंतरचे २५ टक्के फंड ‘अपर मिडल क्वाटरटाईल’ त्यानंतरचे २५ टक्के फंड ‘मिडल क्वाटरटाईल’ त्यानंतरचे २५ टक्के फंड ‘बॉटम मिडल क्वाटरटाईल’ आणि उर्वरित सुमार कामगिरी असलेल्या फंडांची वर्गवारी ‘बॉटम क्वाटरटाईल’मध्ये केले जाते. ‘टॉप क्वाटरटाईल’आणि ‘अपर मिडल क्वाटरटाईल’मध्ये स्थान राखलेल्या फंडांचा गुंतवणुकीसाठी विचार करावा असा प्रघात आहे.

‘सेबी’ वर्गवारीनुसार फंडांचे ‘क्वरटाइल रँकिंग’ खाली असलेल्या तक्त्यामध्ये दिले आहे. वाचकांनी आपल्या सल्लागाराची मदत घेऊन गुंतवणुकीसाठी फंड निवड करणे अपेक्षित आहे. ‘क्वरटाइल रँकिंग’ फंड निवडीसाठी नसून    निवडलेल्या फंडांच्या फंड गटातील तौलनिक कामगिरीचे मूल्यमापन करण्याची पद्धती आहे. ‘टॉप क्वाटरटाईल’मध्ये असलेल्या फंडांची कामगिरी तर अव्वल आहेच; परंतु ‘अपर मिडल क्वाटरटाईल’ मध्ये असलेल्या फंडाची कामगिरी अजून सुधारण्याची शक्यता आहे, असा होतो.

आमच्या तीन फंडांचा ‘लोकसत्ता कर्ते’ म्युच्युअल फंडांच्या यादीमध्ये समावेश झाल्याचा मला खूप आनंद होत आहे. एडेलविस म्युच्युअल फंड म्हणून आमची एक गुंतवणूक विचारधारा असून आम्ही सातत्याने या विचारधारेनुसार काम करतो. आमच्या या विचारधारेची दखल घेतल्याने आमच्या फंड घराण्याला मोठय़ा गुंतवणूक समुदायापर्यंत नक्कीच पोहचता येईल. एका आघाडीच्या प्रादेशिक वर्तमानपत्राकडून आमचे फंड समजून घेण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांचे खरोखर कौतुक वाटते.

– राधिका गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, ऐडलवाईज म्युच्युअल फंड.

(गुंतवणुकीसाठी सुचविलेले फंड सरासरी फंड गटातील १८ ते २० टक्के मालमत्तेचे प्रतिनिधित्व करतात.)