|| सुधीर जोशी

सुट्टीच्या दोन दिवसांमुळे तीनच दिवस कामकाज झालेल्या गेल्या सप्ताहात बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात दोन टक्क्यांहून अधिक वाढ झाली. नवीन वित्तीय वर्षाच्या सुरुवात उत्साहाने झाली. धातू व पोलाद क्षेत्रातील समभागांनी तेजीला मुख्य हातभार लावला. जागतिक बाजारातील मागणी पुरवठ्यातील तफावत व वाढणाऱ्या किमती या क्षेत्राला सध्या फायद्याच्या ठरत आहेत.

बाजारातील तेजीच्या उत्साहात बँकिंग क्षेत्राचा फारसा सहभाग नाही. सर्वोच्च न्यायालयाने कर्जवसुली स्थगितीच्या प्रकरणाबद्दल दिलेल्या निकालाने बँकांच्या वित्तीय कामगिरीमधील एक अनिश्चिातता आता दूर झाली आहे. मार्च अखेरच्या निकालांमध्ये याचे प्रत्यंतर येईल. सध्या स्टेट बँक व आयसीआयसीआय बँकेचे समभाग परत एकदा खरेदीयोग्य पातळीवर आले आहेत. ४२-४५ टक्के ‘कासा रेशो’ (करंट व सेव्हिग खात्यांचे प्रमाण) असलेल्या या बँकांना कमी व्याजात भांडवल उपलब्ध आहे. दोन्ही बँकांनी उत्तम डिजिटल कार्यपद्धती अमलात आणल्या आहेतच. अर्थव्यवस्थेमध्ये होणाऱ्या वाढीचा फायदा घेण्यास या बँका सज्ज आहेत.

बजाज हेल्थकेअर ही घाऊक औषधे व एपीआय बनविणारी स्मॉल कॅप कंपनी प्रगतीपथावर आहे. करोना काळात वाढलेल्या औषधांच्या मागणीचा कंपनीला फायदा झाला आहे. गेल्या तिमाहीचे निकाल कंपनीसाठी उच्चांकी ठरले. गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्पन्नात ऐंशी टक्के तर नफ्यात तीन पट वाढ झाली. कंपनीने गेल्या पाच वर्षात उत्पन्नात १३ टक्के तर नफ्यात २२ टक्के वार्षिक वाढ साधली आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत कंपनीचे एक हजार कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट आहे. लहान कंपनी असल्यामुळे ‘स्टॉप लॉस’वर नजर ठेवून केलेली गुंतवणूक मोठा फायदा देऊ शकते.

रिलॅक्सो फुटवेअर ही पादत्राणे निर्मितीतील कंपनी मध्यम किमतीच्या अनेक नाममुद्रांसाठी प्रसिद्ध आहे. ‘जीएसटी’ची अंमलबजावणी व करोना काळातील टाळेबंदीचा परिणाम होऊन अनेक लहान उद्योगांकडून होणारी स्पर्धा कमी झाली आहे. गेल्या वर्षी सारखी कडक टाळेबंदी परत होण्याची शक्यता कमी आहे. घरातून काम करण्याच्या पद्धतीमुळे ‘कॅज्युअल’ प्रकारच्या पादत्राणांची मागणी कायम आहे. कंपनीमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीला वाव आहे.

करोना संकटानंतर लागू झालेल्या टाळेबंदीला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या वर्षी मार्चअखेर बाजाराचे प्रमुख निर्देशांक –  सेन्सेक्स २८,००० च्या तर निफ्टी ८,००० च्या पातळीवर आले होते. याला प्रमुख कारण होते विषाणूजन्य साथ आणि टाळेबंदीमुळे आलेली अनिश्चिातता. त्यानंतरच्या काळात गेल्या दहा वर्षांतील उच्चांकी अशा तेजीने वर गेलेले हे निर्देशांक आता ५०,००० व १५,००० च्या पातळीवर आले आहेत. आधीच्या दोन सप्ताहात बाजारात झालेली घसरण विषाणूच्या वाढत्या कहरामुळे असली तरी ती लवकरच भरून निघाली. कारण आता जगात अथवा भारतात मागील वर्षासारखी प्रदीर्घ टाळेबंदी पुन्हा लागणार नाही. त्यामुळे उद्योगांवरील त्याचा परिणाम सीमितच राहील. अमेरिका, युरोप तसेच भारतातील पीएमआय निर्देशांक अर्थव्यवस्था वाढीचे संकेत देत आहेत. सरकारच्या जीएसटी मिळकतीचे प्रमाण गेले सहा महिने एक लाखांवर असून मार्चमध्ये त्याने १.२४ लाख कोटींचा नवा उच्चांक गाठला आहे. मार्च महिन्यातील वाहन विक्रीतही दमदार वाढ झाली आहे. मार्च महिन्यातील आयात निर्यातीचे आकडेदेखील पन्नास टक्क्यांहून जास्त वाढ दर्शवितात. अर्थात ही आकडेवारी मागील वर्षातील स्थितीच्या, जेव्हा टाळेबंदीमुळे सारेच आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते, त्या तुलनेत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी प्रगती साधायला आणखी वर्ष तरी लागेल. गेल्या वर्षाच्या अनुभवावरून कोणती उद्योग क्षेत्रे विकास साधतील व कोणत्या उद्योग क्षेत्रांना वेळ लागेल हे बऱ्याच अंशी स्पष्ट झाले आहे. करोनामुळे डबघाईस आलेले सेवा निगडित असे पर्यटन, हॉटेल, विमान वाहतूक, करमणूक असे उद्योग पुन्हा पहिल्यासारखे सुरू व्हायला निदान एक वर्ष तरी जावे लागेल. त्यामुळे अशा कंपन्यांमधील गुंतवणूक पूर्णपणे काढून घेऊन बदलेल्या परिस्थितीत फायदेशीर ठरलेल्या कंपन्यांमध्ये वाढविता येईल. त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान, रसायने, पोलाद, ग्राहकभोग्य वस्तू व तयार अन्न पदार्थ या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये फायद्याच्या जास्त संधी मिळतील.

sudhirjoshi23@gmail.com