26 February 2021

News Flash

रपेट बाजाराची : विक्रीवाल्यांचा जोर

नेस्ले इंडियाच्या डिसेंबरअखेर संपलेल्या वार्षिक निकालात, नफ्यामध्ये २.३ टक्क्यांची मामुली वाढ झाली.

|| सुधीर जोशी

सप्ताहाच्या सुरुवातीलाच बाजाराला काही सकारात्मक संकेत मिळाले होते. डिसेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादन एक टक्क्याने वाढले. कारखानदारीतून उत्पादनाचा टक्का वधारून, १.६ टक्के नोंदला गेला. वीजनिर्मिती ५.१ टक्क्यांनी वाढली. जानेवारी महिन्यात प्रवासी वाहन विक्री ११ टक्क्यांनी वाढली. अमेरिकेच्या अर्थ प्रोत्साहनात वाढ होण्याची देखील बातमी आली. परिणामी बँक-निफ्टीने ३,८०० अंकांची झेप घेत सप्ताहाची सुरुवात जोरकस केली.

नंतरच्या दिवसात माहिती तंत्रज्ञान, आरोग्यनिगा, ग्राहकोभोग्य कंपन्यांमध्ये व खासगी बँकांमध्ये नफ्यासाठी विक्रीचा जोर वाढून प्रमुख निर्देशांक एक टक्क्याने खाली आले. प्राथमिक समभाग विक्रीतील उत्साह बाजारात टिकून आहे. रेलटेलच्या समभाग विक्रीला उदंड प्रतिसाद मिळून ४१.५ पटीहून जास्त मागणी नोंदवली गेली. खासगीकरणाच्या घोषणेमुळे सरकारी बँकांचे समभाग हे खरेदीदारांचे लक्ष्य बनले व सरकारी बँकांचा क्षेत्रीय निर्देशांक ११ टक्क्यांनी वर गेला.

नेस्ले इंडियाच्या डिसेंबरअखेर संपलेल्या वार्षिक निकालात, नफ्यामध्ये २.३ टक्क्यांची मामुली वाढ झाली. करोनाकाळाचा हा परिणाम आहे. कंपनीने आधी जाहीर केलेला पुढील तीन-चार वर्षांसाठी २६०० कोटींचा भांडवली खर्चाचा संकल्प व जाहिरातींवरील खर्चात झालेली वाढ कंपनीच्या भविष्यकाळातील विश्वासाचे संकेत देतात. नेसकॅफे, मॅगी, किटकॅट, नॉरसारख्या प्रसिद्ध नाममुद्रा असणाऱ्या कंपनीचे समभाग सध्याच्या घसरण झालेल्या भावात खरेदीची संधी वाटते.

अंबुजा सिमेंटला डिसेंबरअखेरच्या तिमाहीत वाढीव विक्रीमुळे ३४ टक्के जास्त नफा झाला. डिसेंबरअखेरच्या संपलेल्या वर्षांत कंपनीचा सामूहिक नफा ११.६२ टक्क्यांनी वाढला. दीर्घावधीसाठी या कंपनीमध्ये गुंतवणुकीला वाव आहे.

करोनाकाळात सर्वाधिक परिणाम झाला होता तो पर्यटन आणि हॉटेल्सवर. परंतु जशी टाळेबंदी शिथिल होत गेली त्या सरशी या उद्योगांना चांगले दिवस येऊ लागले आहेत. लेमन ट्री या मध्यम बजेट क्षेत्रातील हॉटेल्स चालविणाऱ्या कंपनीला खर्चावर मर्यादा घालून तोटा कमी करण्यात तिसऱ्या तिमाहीत थोडे यश आले आहे. कंपनीची हॉटेल्स ५० टक्के क्षमतेने चालत आहेत. उद्योग व्यवसाय व पर्यटन व्यवसायात सुधारणा होण्याबरोबर या कंपनीचा व्यवसाय सुधारू लागेल. असंघटित क्षेत्रातील मध्यम बजेटमधील अनेक बंद झालेल्या हॉटेल्सचा व्यवसाय या कंपनीकडे जाऊ शकतो. करोनापूर्व काळापेक्षा ३० टक्के कमी किमतीमध्ये उपलब्ध असलेला समभाग दीर्घ मुदतीसाठी घेऊन ठेवता येईल.

अव्वल दर्जाच्या बांधकामासाठी प्रसिद्ध असलेली पीएनसी इन्फ्राटेक ही कंपनी गुंतवणूक करण्यास योग्य वाटते. १५,८०० कोटींच्या हातात असलेल्या मागण्या कंपनीला पुढील तीन वर्षांसाठी पुरेशा आहेत. आणखीही काही नवीन कंत्राटे अपेक्षित आहेत. कंपनीच्या डिसेंबरअखेरच्या तिमाही नफ्यामध्ये ३३ टक्के वाढ झाली आहे. रस्ते व पायाभूत सुविधांच्या बांधणीमधील आणखी एक अग्रेसर नाव म्हणजे दिलीप बिल्डकॉन. गेल्या तिमाहीत उत्पन्न व नफ्यात ११ व पाच टक्क्यांची मामुली वाढ झाली असली तरी कंपनीच्या हातात २,६०० कोटींचे प्रकल्प आहेत. विक्रीच्या किमती उत्पादन खर्चाशी निगडित असल्यामुळे वाढत्या किमतीचा कंपनीच्या नफा क्षमतेवर परिणाम होणार नाही. कंपनीच्या उत्पन्नात रस्ते बांधणीचा वाटा आता केवळ ६२ टक्के राहिला असून विमानतळ, मेट्रो, बोगदे, खाणी अशा विविध क्षेत्रांत कंपनी प्रगती करीत आहे. सध्याचे भाव खाली येण्याची थोडी वाट पाहून या दोन्ही कंपन्यांमधील गुंतवणूक फायदेशीर राहील.

सेन्सेक्स ५२ हजारांचा टप्पा पार करून घसरणीला लागला, तरी ५१ हजारांजवळची पातळी टिकवून आहे. परदेशी गुंतवणुकीच्या ओघाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया एक वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांना व रिझव्‍‌र्ह बँकेच्या धोरणात्मक निर्णयांना मिळालेली ही एक पोच पावती आहे. कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल बाजाराच्या सध्याच्या पातळीचे समर्थन करीत आहेत. करोनाकाळात लागू केलेल्या खर्च कपातीच्या योजना, व्याजाचे घटलेले दर याचाही कंपन्यांना फायदा झाला आहे. करोनाचे संकट पुन्हा मोठय़ा प्रमाणात डोके वर काढण्याचा धोका सोडला तर बाजार मोठय़ा फरकाने खाली येण्याची शक्यता कमी आहे.

sudhirjoshi23@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 12:01 am

Web Title: rapet market emphasis on salespeople akp 94
Next Stories
1 करावे कर-समाधान : घराचा ताबा मिळाल्यावरच, गृह कर्ज व्याजाची कर वजावट!
2 गोष्ट रिझव्‍‌र्ह बँकेची : ब्रिटिश सरकार विरूद्ध भारतीय ठिणगी
3 माझा पोर्टफोलियो : गुंतवणुकीतील आवश्यक ‘बेअरिंग प्रतिबल’
Just Now!
X