27 September 2020

News Flash

बाजाराचा तंत्र कल : अनर्थ टाळायचा तर..

भांडवली बाजार हा ना मूलभूत विश्लेषणावर चालतो. तांत्रिक बाजाराची वाटचाल ही भावनेवर कदापि नसते.

(संग्रहित छायाचित्र)

आशीष ठाकूर

अर्थव्यवस्थेच्या बाबतीत उदास, निराशाजनक, मंदीसूचक बातम्यांचा ओघ सुरू आहे; पण प्रत्येक मंदीसूचक बातमी धडकल्यानंतर क्षणिक, हलकीशी घसरण दिसते अन् तेव्हाच तेजी ठासून सांगू लागते.. ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन!’ हा तेजीचा निशाणा ज्या गुंतवणूकदारांना कळला ते आज आनंदाच्या परमोच्च बिंदूवर आहेत. या पार्श्वभूमीवर आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ४१,६८१.५४/ निफ्टी : १२,२७१.८०

गेल्या तीन महिन्यांपासून या स्तंभातील प्रत्येक लेखात एक अधोरेखित वाक्य असायचे – ‘तेजीच्या वातावरणात आपण एक हलकीशी घसरण अनुभवणार आहोत. त्यानंतर नवीन ऐतिहासिक उच्चांक सेन्सेक्सवर ४१,८०० ते ४२,५०० आणि निफ्टीवर १२,३०० ते १२,५०० चा स्तर दृष्टिपथात येईल. हा स्तर आता प्रत्यक्षात येत असताना, ही तेजी कशी हाताळावी याचा आज आपण आढावा घेऊ या.

मूळ विषयाला हात घालण्याअगोदर महात्मा जोतिबा फुले यांच्या क्रांतिकारी विचारांचा आधार घेऊ या..

विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली।

नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले।

वित्तविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

हे क्रांतिकारी विचार आमच्या भांडवली बाजारालादेखील तंतोतंत लागू पडतात.. भांडवली बाजारातील सगळे आर्थिक अनर्थ हे केवळ आणि केवळ तेजीत समभाग विकले नाहीत म्हणून घडतात. कसे ते पाहा..

भांडवली बाजार हा ना मूलभूत विश्लेषणावर चालतो. तांत्रिक बाजाराची वाटचाल ही भावनेवर कदापि नसते. भावनेची दोन प्रमुख अंगे असतात.. लालसा व भीती! प्रत्येकाला सुख, समाधान मिळालेच पाहिजे; पण सुखासमाधानाची लक्ष्मणरेषा ओलांडली की हव्यास, लालसा जन्माला येते व प्रत्येक तेजी हे या लालसेचे मूर्तिमंत उदाहरण असते.

आता चालू असलेली तेजी ही आर्थिक आघाडीवर टिकूच शकत नाही. जी काही नवनवीन तेजीची शिखरे गाठली जातात ती तांत्रिक विश्लेषणातील विविध प्रमेयांमुळे व आता या प्रमेयांचीदेखील वरची लक्ष्य सेन्सेक्सवर ४१,८०० ते ४२,५०० आणि निफ्टीवर १२,३०० ते १२,५०० साध्य होताना दिसत आहेत. त्यामुळे आता सावध होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने अल्प मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांची, नफ्यातील समभाग विकण्याच्या दृष्टीने, त्यांची मानसिकता तयार होण्यासाठी खालील गोष्टी उपयुक्त ठरतील.

१. आपल्याकडे असलेल्या चांगल्या प्रतीच्या समभागांची जी आपण विक्री करणार आहोत ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे, किंबहुना ही नफारूपी विक्री आहे. चांगल्या, गुणवत्तेचे मापदंड जोपासणाऱ्या कंपन्या या कधीच वाईट नसतात, असते ती वाईट वेळ असते. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या कंपन्यांचे अध्रे समभाग तेजीत विकले की मंदीत तेच समभाग पुन्हा स्वस्तात खरेदी करता येऊ शकतात. हे सांगण्यामागे मुख्य उद्देश हा गुंतवणूक धारणा आणि मर्यादित भांडवलाचा आहे. जोपर्यंत मध्यमवर्गीय गुंतवणूकदार समभाग विकत नाहीत तोपर्यंत फेरखरेदीसाठी भांडवल उपलब्ध होणे अशक्य. मग अध्रे समभाग नफ्यात विकले तर काय चूक? व एकदा का तेजी येऊन गेली की पुन्हा तेजी कधी येणार? ती पुन्हा आपल्याच समभागात येईल का? याची खात्री नाही. मंदीच्या दाहकतेत समभागाचे भाव अर्ध्यावर आले की आर्थिक फटका तर बसतोच, पण त्याहून कैक पटींनी अधिक मानसिक धक्का बसतो. पुराव्यादाखल हर्षद मेहता, केतन पारेख व गेल्याच वर्षीच्या ऑगस्ट २०१८च्या तेजीत ज्यांनी नफ्यातील समभाग विकले नाहीत त्यांना या तेजीनंतरच्या मंदीची दाहकता जरूर विचारा.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2019 4:04 am

Web Title: recession market trends investment abn 97
Next Stories
1 अर्थ वल्लभ : ‘विविधता वास्तविक असावी, आभासी नव्हे’
2 टाटांना धक्का, सायरस मिस्त्री पुन्हा होणार अध्यक्ष
3 अर्थ वल्लभ : फंड दहा हजारी
Just Now!
X