पंकज गुप्ता

नोकरीतून एकदा निवृत्ती स्वीकारली म्हणजे भरपूर फावला वेळ. जे मनाला येईल ते करण्याची जणू संधीच. नोकरीत होतो, तेव्हा महिन्याकाठी वेतन-भत्ते जरूर मिळायचे, पण सवडीचे क्षण अभावानेच मिळत असत. नोकरी करीत असताना जे जे करायचे मनी ठरविले होते, ते सर्व निवृत्तीनंतर करायचे असे ठरवूनच अनेकजण निवृत्तीला सामोरे जात असतात. पण एकदा नोकरीतून बाहेर पडलो की, नियमित उत्पन्नही बंद होते. म्हणजे आता हाती वेळ तर भरपूर, पण पैसा मात्र नाही, अशीही अनेकांपुढे अडचण असते. नियमित मासिक वेतनाचा हा दिलासा गमावून बसलेल्या सेवानिवृत्तांची व्यथा अनेकप्रसंगी खूप करुण रूपही धारण करते.

दुहेरी आव्हान :

एक म्हणजे स्थिर उत्पन्नाचा अभाव आणि दुसरा अभाव तरलतेचा. बहुतेकांच्या बाबतीत निवृत्तीनंतर त्यांच्याकडे एकरकमी मोठी रक्कम येते. जर या रकमेचा विनियोग शहाणपणाने झाला नाही, तर काही लक्षात येण्याआधीच ती भुर्रकन उडूनही जाते. तशात मग मुलाबाळांवर आर्थिक मदार ठेवून गुजराण करणे मग भाग ठरते. म्हणूनच सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या लाभरकमेची सुयोग्य गुंतवणूक महत्वाची ठरते, जेणेकरून आर्थिक स्थिरता आणि तरलताही राहिल. निवृत्तीनंतर जीवनमानाचा विचार हा निवृत्त झाल्यानंतर नव्हे तर नोकरीत लागल्यापासूनच खरे तर करावयाचा असतो. या संबंधाने सुरुवात जितक्या उशिराने केली जाईळ, तितके निवृत्तीपश्चात आर्थिक विवंचनात भर घातली जाईल.

हे निवृत्तीपश्चात नियोजन नेमके कसे होते? यासाठी मदतकारक अनेक वित्तीय नियोजनाची साधने सध्या उपलब्ध आहेत. यातील सर्वात लोकप्रिय साधन म्हणजे वर्षांसन अर्थात अ‍ॅन्यूइटीचा आहे. विविध विमा कंपन्यांकडून आज अनेक अ‍ॅन्यूइटी योजना प्रस्तुत केल्या गेल्या आहेत. या अ‍ॅन्यूइटी प्लान्सची रचनाच अशी असते की, सेवानिवृत्तांकडून त्यांच्या निवृत्तीलाभाची एकरकमी गुंतवणूक केली जाते आणि विमा कंपन्या त्या बदल्यात निवृत्तीजीवनासाठी आवश्यक रोखीचा नियमित प्रवाह त्यांना बहाल करतात.

अ‍ॅन्यूइटी प्लान्सचे प्रकार :

मुख्यत: त्वरित (इमिडिएट) आणि स्थगित (डिफर्ड) असे अ‍ॅन्यूइटीचे दोन मुख्य प्रकार आहेत. त्वरित पर्यायात एकरकमी गुंतवणुकीनंतर लगेचच, म्हणजे महिनाभरात मासिक उत्पन्नप्राप्ति सुरू होते. तर स्थगित पर्यायानुसार, भविष्यात विशिष्ट वय ओलाडल्यानंतर, नियमित उत्पन्नाचा लाभ सुरू होतो. हे वय नेमके काय असेल याचे निर्धारण आपणच करायचे असते.

अ‍ॅन्यूइटीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे निवृत्तीनंतर संपूर्ण हयातभर पैशाची भ्रांत राहत नाही. विशिष्ट उत्पन्नाचा ओघ अगदी नोकरी काळात मिळत असलेल्या मासिक वेतनाप्रमाणे सुरू राहतो. शिवाय पुढे व्याजाचे दर किती खाली जातील याचीही चिंता नसते, ठरलेल्या परताव्याच्या दराप्रमाणे लाभ सुरू राहतो. निश्चित व्याजदराची हमी ही ज्येष्ठ नागरिकांसाठी निश्चितच महत्त्वाची मन:शांती ठरते.

मग आहे ना, हा निवृत्तीपश्चात नियमित वेतनाचा पर्याय.

प्रत्येकाला मनाजोगते जीवन जगण्याचा अधिकार आहे. मग सेवानिवृत्त झालेल्या मंडळींनाही नियमित उत्पन्नप्राप्ती नाही म्हणून जीवन जगण्यावर बंधने का यावीत? निवृत्तीच्या वयाच्या जवळ पोहचला असाल, तर आतापासूनच तुमची सक्रियपणे पावले पडायला हवीत.

(लेखक एचडीएफसी लाइफचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य विपणन अधिकारी)