अजय वाळिंबे

अखेर आपला पोर्टफोलियो थोडा का होईना पण फायद्यात दिसत आहे. याचा आनंद तुमच्याप्रमाणेच मलाही होत आहे. पण सध्याच्या वातावरणात हा आनंद अजून किती काळ टिकेल याची खात्री देता येणार नाही. लवकरच रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण तसेच कंपन्यांचे सहामाही निकाल जाहीर होतील. गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन गुंतवणुकीचे धोरण अवलंबून संयम दाखविणे आवश्यक आहे.

गेल्या आठवडय़ात सरकारच्या केवळ एका घोषणेमुळे शेअर बाजाराचा मूडच बदलला. एका दिवसात पाच टक्क्य़ांनी बाजार वधारल्यावर सोमवारीदेखील तेजी कायम राहिली. नंतर मात्र बाजाराचे तळ्यातमळ्यात चालू आहे. केवळ कर सवलतीने हा गहन मंदीचा तसेच द्रवणीयतेचा (लिक्विडिटी) प्रश्न सुटणार नाही हे गुंतवणूकदारांच्या ध्यानात येऊ लागले आहे. पहिल्या तिमाहीचे निराशजनक निकाल, जागतिक बाजारपेठेतील समस्या, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कर सवलतीमुळे वाढलेली वित्तीय तूट आणि वाहन उद्योगावर दाटलेले सावट अशा अनेक चिंता आर्थिक जगताला भेडसावत आहेत. त्यातच अल्टिको कॅपिटल ही एक मोठी बिगरबँकिंग वित्तीय कंपनी आणि आणि पीएमसी या महाराष्ट्रातील आणखी एका मोठय़ा सहकारी बँकेचा निकाल लागला आहे. केवळ एका महिन्यात महाराष्ट्रातील चार सहकारी बँकांवर रिझव्‍‌र्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. एकंदरीतच यंदा लांबलेल्या पावसाळ्याचे मळभ भारतीय अर्थव्यवस्थेवर अजून बरेच दिवस राहण्याची शक्यता आहे.

‘माझा पोर्टफोलियो’चा नऊमाही आढावा- २०१९