|| भालचंद्र जोशी

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हा एक वैविध्यपूर्ण गुंतवणुकीचा पर्याय आहे, ज्यामुळे तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर तुमची आर्थिक उद्दिष्टे अवलंबून असल्यामुळे तुम्हाला योग्य गुंतवणुकीचा पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते. वय कमी असतानाच योग्य प्राधान्य देऊन म्युच्युअल फंडाद्वारे तुमच्या निवृत्तीसाठी नियोजन करा आणि निवृत्तीनंतरच्या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचा फायदा घ्या.

गुंतवणूक कशी करावी?

खास करून निवृत्तीच्या नियोजनासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे तीन फायदे खाली देण्यात आले आहेत :

  • एसआयपी सुविधा : आजच्या खर्चात कोणतीही अडचण निर्माण न करता निवृत्त जीवनासाठी बचत करण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेन्ट प्लॅन (एसआयपी) हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे तुम्हाला दरमहा पद्धतीने अगदी कमीत कमी रकमेची गुंतवणूक करता येते. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) ही निवृत्तीनंतरच्या तुमच्या आनंदी जीवनाची गुरुकिल्ली असू शकते. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक योग्य मार्ग ‘एसआयपी’द्वारा गुंतवणूक करणे. ‘एसआयपी’मध्ये तुम्ही अगदी रु.५०० इतक्या लहान रकमेची गुंतवणूक करू शकता. ‘एसआयपी’मुळे तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार बनता, त्याचवेळी त्यामुळे तुमच्या पैशाला व्यावसायिक फंड व्यवस्थापन कौशल्याचा लाभ होतो, ज्यामुळे निवृत्तीच्या नियोजनात तुमचे आर्थिक उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होते.
  • स्विच करण्याची क्षमता : एक तरुण गुंतवणूकदार म्हणून, तुम्ही अधिक परतावा मिळविण्यासाठी अधिक जोखीम घेऊ शकता, त्यामुळे इक्विटीत अर्थात समभागसंलग्न पर्यायात गुंतवणूक करणे ही गुंतवणुकीची सर्वोत्तम पद्धती आहे. परंतु, तुम्ही जसे निवृत्तीच्या वयाच्या जवळ जाता तशी तुमची गुंतवणूक हळूहळू डेट फंडासारख्या कमी जोखमीच्या मत्तेकडे वळविण्याचा सल्ला दिला जातो. म्युच्युअल फंड तुम्हाला एकाच फंड हाऊसच्या वेगवेगळ्या फंडांमध्ये स्विच करण्याची सुविधा देतो. सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (एसटीपी) मुळे तुम्हाला ठरावीक रक्कम पद्धतशीरपणे एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वळविता येते, या सुविधेमुळे तुम्ही इक्विटी फंडात केलेली गुंतवणूक डेटमध्ये ट्रान्सफर करता येते.
  • नियमित मिळकत : म्युच्युअल फंड तुम्हाला दर महिन्याला/तिमाहीला/सहामाही/वार्षिक पद्धतीने आपोआप ठरावीक रक्कम काढण्याची परवानगी देतो. त्यामुळे तुम्हाला निवृत्तीनंतर देखील नियमित मिळकतीचा स्रोत उपलब्ध होतो.

निवृत्तीपूर्वीचे आणि नंतरचे जीवन यातील प्रमुख फरक म्हणजे मिळकतीचा स्रोत, जो निवृत्तीनंतर उपलब्ध नसतो. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीमुळे तुम्हाला जोखमीच्या वैविध्यतेच्या फायद्यासह नियमित मिळकतीचा स्रोत उपलब्ध होतो. तुम्ही अधिक चांगल्या निवृत्त जीवनासाठी सर्वाधिक योग्य फंडाची निवड करू शकता.

पुढच्या लेखात आपण निवृत्ती नियोजनाविषयी गुंतवणुकांची विस्तृत माहिती घेऊ या.

(लेखक गेली २७ वर्षे बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रात कार्यरत असून, सध्या रिलायन्स म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार सेवा आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख आहेत.)

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.