02 June 2020

News Flash

नियोजन भान : पहिले ते हरिकथा निरूपण

पहिल्या पगारापासून सेवानिवृत्ती नियोजन करण्याशिवाय दुसरे आणखीही कुठलेही साधन नाही.

(संग्रहित छायाचित्र)

अनुराधा सहस्रबुद्धे

निवृत्तीपश्चात जगण्याची सुरक्षितता सुनिश्चित करायची तर, पहिल्या पगारापासून सेवानिवृत्ती नियोजन करण्याशिवाय दुसरे आणखीही कुठलेही साधन नाही.

आज मराठवाडय़ातील तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे मुक्कामास असलेल्या सचिन सुभाष पाटील (३०) आणि सुचिता सचिन पाटील (२७) यांच्या आर्थिक नियोजनाच्या निमित्ताने, ‘तरुण जोडप्याला आर्थिक नियोजकाची का गरज असते?’ याविषयी जाणून घेणे गरजेचे वाटते.

सचिन सुभाष पाटील हे शासकीय कर्मचारी, तर सुचिता सचिन पाटील या राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरी करतात. तर या दाम्पत्याचे एकूण मासिक उत्पन्न ७२,००० रुपये आहे. त्यांनी त्यांच्या नियोजनाबाबत काही प्रश्न विचारले होते. या कुटुंबाचे नियोजन सदरासाठी निवडले याला दोन प्रातिनिधिक कारणे आहेत. पहिले कारण पाटील पती-पत्नी ‘एनपीएस’ खातेधारक आहेत. दुसरे कारण असे हे जोडपे तिशीच्या आतबाहेर असल्याने नियोजनाचा प्रदीर्घ काळ फायदा घेता येईल. ‘‘आमच्या तालुक्यात स्टेट बँकेची शाखा आहे, तेथे विचारणा केली तर एसबीआय लाइफच्या विमा उत्पादनांचा (‘युलिप’) आग्रह धरतात किंवा एसबीआय म्युच्युअल फंडांची शिफारस होते त्यापलीकडे बँकेचे कर्मचारी फारसे काही सांगत नाहीत.

सचिन आणि सुचिता यांच्याकडे खर्च वजा जाता सरासरी ५० हजार रुपये शिल्लक राहतात. वित्तीय नियोजनाची सुरुवात शुद्ध विम्याच्या (टर्म प्लान) खरेदीने करायची असते. सचिन आणि सुचिता यांचे उत्पन्न पाहता त्यांनी प्रत्येकी पन्नास लाख रुपयांचे विमा छत्र देणारा आणि तीस वर्षे मुदतीचा विमा खरेदी करावा. यासाठी त्यांना वार्षिक ३,८०० ते ४,६०० रुपयांदरम्यान हप्ता असलेल्या योजना उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त प्रत्येकी ५० लाख अपघाती विमा छत्र देणारी ‘पर्सनल अ‍ॅक्सिडंट पॉलिसी’ खरेदी करण्यास प्रत्येकी ५,१०० रुपये हप्ता भरावा लागेल.

अनेक कर्मचारी ज्यांना औषध उपचार आरोग्य खर्चाची परतफेड होते ते आरोग्य विम्याची खरेदी करीत नाहीत. पुरेसे पैसे कमावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची स्वतची कमी रकमेची का होईना आरोग्य विमा योजना असणे गरजेचे आहे. पाटील कुटुंबाने आरोग्य खर्चाला वार्षिक तीन लाखांचे छत्र देणाऱ्या ‘फॅमिली फ्लोटर’ प्रकारच्या योजनेची खरेदी करावी. अपत्यप्राप्तीनंतर अपत्याचे नाव या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत जोडण्यास प्राधान्य हवे.

एकूण बचतीत रोखे व समभाग यांचे संतुलन असणे आवश्यक आहे. आपल्या बचतीपैकी दहा टक्के रक्कम पीपीएफमध्ये गुंतवावी. उर्वरित ७० टक्के रक्कम गुंतविण्यासाठी चार म्युच्युअल फंड सुचवीत आहे. म्युच्युअल फंडातील या आवर्ती गुंतवणुका किमान तीस वर्षे सुरू राहिल्या तर आर्थिक ध्येयांसाठी चांगला निधी जमवता येईल. आर्थिक नियोजन म्हणजे कागदोपत्री नियोजन व नियोजनाप्रमाणे अंमलबजावणी आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे दर वर्षी आपल्या गुंतवणुकीचा आढावा घेणे. एका वित्तीय नियोजकाचा शोध घेणे व या वित्तीय नियोजकाकडून आपल्या गुंतवणुकीची वार्षिक तपासणी हे नियोजनाहून महत्त्वाचे आहे.

माझ्या एका अशिलाने माझ्याकडून मुलांचे शिक्षण, परदेशातील प्रवास यासारख्या वित्तीय ध्येयांचे नियोजन केले होते. परंतु जेव्हा जेव्हा मी त्यांच्या सेवानिवृत्तीबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा त्यांनी तो विषय शिताफीने टाळला. त्याला वाटले की, सेवानिवृत्त होण्यास अद्याप बराच कालावधी शिल्लक आहे, मग इतक्यात त्याची चर्चा कशाला हवी? निवृत्तीपश्चात जगणे सुरक्षित ठेवण्याचे पहिल्या पगारापासून सेवानिवृत्ती नियोजनाशिवाय दुसरे आणखीही कुठलेही साधन नाही. मला माझ्या अनेक अशिलांनी त्यांच्या निवृत्तीबद्दल त्यांच्या अवास्तव कल्पनांबद्दल विचार करायला भाग पाडले. सेवानिवृत्ती नियोजन नसेल आणि तुम्ही तुमच्या सेवानिवृत्तीच्या जवळ असताना किंवा ६० व्या वर्षी, आर्थिक नियोजन करणे कठीण होते. भविष्य निर्वाह निधी पुरेसा आहे असा समज अनेक जण करून घेतात. पेन्शन योजनांमध्ये कमी गुंतवणूक केली जाते आणि साहजिकच पुरेसे उत्पन्न मिळत नाही. आपल्या भविष्यातील राहण्याच्या खर्चाचा केवळ नगण्य भागाचे हे स्रोत पूर्तता करू शकतात. दुसरे, भविष्य निर्वाह निधी, ईपीएफ किंवा पीपीएफ ही शक्तिशाली बचत साधने असली तरी त्यांच्यावर मिळणारा एक आकडी परतावा बचतीची चक्रवाढ वृद्धी होण्यास अडथळ्याचा ठरतो. आपण नोकरी बदलतो तेव्हा आपण बऱ्याचदा आपला भविष्य निर्वाह निधी काढून घेतो. त्यामुळे चक्रवाढीवर दुहेरी मर्यादा येतात. सरासरी आयुष्यमान वाढत आहे आणि ८५ वर्षे धरले तरी निवृत्तीनंतर किमान २५ वर्षे या रकमेवर गुजराण करायची आहे. म्हणूनच पहिल्या पगारापासून आर्थिक नियोजन करणे योग्य ठरते. दासबोधातील अकराव्या दशकातील पाचव्या समासात चौथ्या आणि पाचव्या ओव्यांतून स्वामींनी आदर्श जीवन पद्धत सांगितली आहे. त्यात पहिले सूत्र ‘हरिकथा निरूपण,’ दुसरे ‘राजकारण,’ तिसरे ‘सर्व ठिकाणी सावधपणा’ आणि चौथे सूत्र ‘अत्यंत साक्षेप’ म्हणजे आळसाला यित्कचितही थारा न देता सतत उद्योग करीत राहणे. वित्तीय नियोजनात शुद्ध विमा, आरोग्य विमा, बचतीचे विभाजन आणि एसआयपी सुरू असलेल्या फंडांची कामगिरी याचा वार्षिक आढावा ही चतुसूत्री आहे.

(लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आहेत, akswealth@gmail.com ई-मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2019 12:28 am

Web Title: retirement planning ideas safety of living abn 97
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : तेजीचं तुफान उठलं रं! 
2 नावात काय? : ‘लेहमन क्रायसिस’ आणि आपण!
3 क.. कमॉडिटीचा : जा जा रे पावसा
Just Now!
X