07 April 2020

News Flash

नियोजन भान : पण उमज पडेल तर..

जबाबदार आर्थिक वर्तन होण्यासाठी आपल्या मुलांना आपणच तयार करायचे असते हा बोध बाल दिनाच्या निमित्ताने आपण घ्यायचा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अनुराधा सहस्रबुद्धे

दीपक पवार (४६) माझे मागील १२ वर्षांपासून अशील आहेत. तुमचे काही अशील असे असतात, की त्यांचे आणि तुमचे संबंध निव्वळ व्यावसायिक न राहता, त्यापुढची कक्षा ओलांडणारे असतात. ते त्यांच्या घरातील मंगलकार्याचे तुम्हाला आमंत्रण पाठवतात; घरात घडलेल्या एखाद्या दु:खद प्रसंगी तुम्ही त्यांना सांत्वनपर भेट देता. पवार कुटुंबीयांशी नात्याने व्यावसायिक औपचारिकता कधीच ओलांडली होती.

दादर भागात पवार कुटुंबीयांचे दुकान आहे. दुपारच्या वेळी दादर भागात जाणे झाले तर पाच-दहा मिनिटांसाठी दुकानात डोकावून मी पुढील कामाला जाते. जुलै २०१८ मध्ये दीपक पवार यांच्या मुलाने शिकण्यासाठी परदेशी जाण्याचा मानस आपल्या आई-वडिलांजवळ बोलून दाखविला. बऱ्याच उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील, मुलाने किंवा मुलीने उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणे निश्चित असते. वित्तीय नियोजन करताना पालकांचे हे ठाम आर्थिक ध्येय असते. तसे ते दीपक पवार यांचेसुद्धा होते; परंतु त्यांच्या मुलाने चार वर्षे आधी परदेशी शिक्षण घेण्याचे ठरविल्याने सर्व नियोजन कोलमडले. ही गोष्ट केवळ दीपक पवार यांच्या बाबतीत घडली असे नसून उच्च मध्यमवर्गातील २० ते २५ टक्के पालक या समस्येला सामोरे जात आहेत. हल्ली मुले केवळ भारतातील कठिणातील कठीण प्रवेश परीक्षेची तयारी करतात असे नव्हे, तर उच्च शिक्षणाच्या जोडीला बदलती जीवनशैली, सामाजिक बदल या सगळ्यांना ते सामोरे जात असतात. पालक आणि मुले दोघेही त्या बदलाला सामोरे जात असतात. मूळ नियोजनानुसार दीपक पवारांचा मुलगा, आशय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परदेशात जाणार होता; परंतु बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे आशयने पदवी अभ्यासक्रमासाठी परदेशी जाण्याचे ठरविले.

आज जगभरात उच्च शिक्षणाच्या जगामध्ये बऱ्याच पर्यायांचा समावेश आहे. मुलांच्या शिक्षणाबाबत असलेल्या इच्छा- आकांक्षांचे केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणानुसार हल्लीची पिढी उपलब्ध पर्यायांपैकी नवनवीन वाटा धुंडाळत असले तरी पालकांची यासाठी जी आर्थिक तयारी लागते ती नसते. मुलांसह पालक समाजमाध्यमांतून ज्येष्ठ आणि माजी विद्यार्थी आणि अभ्यासक्रम आणि क्रेडिट्स कसे वाढतात हे शोधण्यासाठी सल्लागार, ज्या पालकांना आपल्या मुलांना परदेशात पाठविण्याचा अनुभव आहे असे पालक, शिष्यवृत्ती आणि कर्जाची शक्यता आणि नंतर रोजगाराच्या संधी शोधतील याबाबत माहिती मिळविताना दिसतात. वास्तविक मुख्यत: पशाच्या निर्णयावर मुलांची इच्छा पूर्णत्वाला जाते. येत्या आठवडय़ात येणाऱ्या बाल दिनाच्या निमित्ताने उच्च शिक्षणासाठी करावयाच्या तरतुदींचा नव्याने आढावा घेऊ या.

प्रथम मुलाशी खर्चाबद्दल आणि कुटुंबाने केलेल्या आर्थिकतरतुदी, उपलब्ध पर्याय याबद्दल स्पष्टपणे बोलावे. जर मुलाच्या शिक्षणासाठी कुटुंबाची एखादी संपत्ती विकणार असाल तर, तसे स्पष्टपणे सांगा. कुटुंबाच्या एकूण संपत्तीच्या तुलनेत ही रक्कम किती मोठी आहे? हा खर्च केल्यानंतर पालकांचे निवृत्तीपश्चातचे उत्पन्न किती सुरक्षित आहे? यामुळे कुटुंबातील इतर मुलांच्या बजेटवर याचा काय परिणाम होतो? यामुळे पालकांच्या सेवानिवृत्तीच्या उद्दिष्टांना कितपत बाधा येणार आहे याचा विचार करणे गरजेचे आहे. मुलाला पालकांनी आनंदाने पैसे दिले तरी कुटुंबातील हा निर्णय किती मोठा आहे हे त्याला समजू द्या. भविष्यात पश्चात्ताप होईल यापेक्षा सुरुवातीलाच हे सांगणे कधीही चांगले. गरज भासल्यास कर्ज घेण्याचा पर्यायाचा विचार करावा.

दुसरे म्हणजे मुलाने कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील याची रूपरेषा सांगा. हे सांगितल्याने मूल अस्वस्थ होईल, असा विचार करू नका. शक्य असल्यास दुसऱ्या त्रयस्थ व्यक्तीमार्फत तुम्ही उचलत असलेल्या आर्थिक बोजाची, त्याच्या परिणामांची जाणीव करून द्या. जेव्हा अपेक्षेनुसार गोष्टी घडणार नसल्या तर त्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत हे ठरवा. अनेकदा एका पर्यायातून दुसरा पर्याय अशी पर्यायांची मालिका सुरूहोते. चार वर्षांत पदवीधर किंवा दोन वर्षांच्या पुढे पदव्युत्तर पदवीधारक होण्याची वेळ वाढत जाते. याचा कुठे तरी विचार होणे गरजेचे आहे. आपल्याला परवडेल इतकाच प्रासंगिक खर्च करण्याची मर्यादा निश्चित असणे गरजेचे आहे. परदेशी शिक्षणासाठी गेलेली मुले इतके पैसे या कारणासाठी पाठवा, अशी ईमेल ते पुन्हा करणार नाहीत. परदेशी शिक्षणाची उपलब्ध झालेली संधी हे ज्ञानसंपादन करण्यासाठी आहे आणि त्यासाठी खर्च होणारा पसा हा माझ्या वडिलांच्या सेवानिवृत्तीपश्चात उदरनिर्वाहासाठी असलेल्या पशातून झाला आहे, हे मुलास हे शिकवावे लागेल. त्या वेळी मुलासमोर स्पर्धा जिंकल्याचा आव न आणता बदलत्या परिस्थितीमुळे कुटुंबाने आपल्या काही गरजा दूर सारल्या आहेत, याची जाणीव वारंवार करून द्यावी लागेल. ही वारंवारता व्यक्तीसापेक्ष बदलेल. १८ ते २५ वर्षे वयोगटातील तरुण प्रौढांसाठी आर्थिक जबाबदारी मुख्यत्वे खर्च करण्याच्या स्वातंत्र्याविषयी असते. त्यांनी स्वत:ला ज्ञान, कौशल्य आणि वृत्ती तयार करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून त्यांना अपेक्षित असलेले जीवन ते जगू शकतील. या प्रक्रियेत पालकांना म्हटले तर बरेच करण्यासारखे असते आणि म्हटले तर बरेच काही समजावून सांगण्यापलीकडचे असते. काय करायचे हा शोध वैयक्तिक आणि मुलांचा स्वत:चा आहे, मुले कोणत्या जगात राहतील हे माहीत नसताना पैसे उपलब्ध करून देण्यापलीकडे फारसे आपल्या हातात काही नसते.

सध्या दोघे कमावणारे आणि एकच मूल असल्याने बऱ्याच पालकांना मुलाने मागितलेल्या गोष्टी परवडतात. पालकांच्या अशा वर्तणुकीमुळे मुलांना त्यांची मागणी हा जन्म दिल्याने मिळालेला हक्क असल्यासारखी वर्तणूक असते. समंजस पालकत्व निभावताना मुलांना स्वत:च्या मागण्यांसाठी करायची तरतूद अभ्यासाव्यतिरिक्त अन्य पर्यायांनी करू देण्यावर मुलांचे आर्थिक वर्तन निश्चित होत असते. जबाबदार आर्थिक वर्तन होण्यासाठी आपल्या मुलांना आपणच तयार करायचे असते हा बोध बाल दिनाच्या निमित्ताने आपण घ्यायचा आहे.

(लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आहेत, akswealth@gmail.com ई-मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2019 4:05 am

Web Title: retirement term insurance scheme abn 97
Next Stories
1 अर्थ वल्लभ : तारांकित सुधारणेचा संभाव्य लाभार्थी
2 इच्छापत्र : समज-गैरसमज : इच्छापत्र : समज-गैरसमज
3 बाजाराचातंत्र कल : निर्देशांकावर तेजीची रोषणाई
Just Now!
X