अंतरीचा ज्ञान दिवा
वर्षभरात चकली खाल्ली नाही तरी नरकचतुर्दशीच्या दिवशी चकली-चिवडा खाल्याशिवाय दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटत नाही. त्याचप्रमाणे वर्षभरात शेअरची खरेदी, विक्री केली तरी मुहूर्ताच्या सौद्याला खरेदीला मान खास असतो. मुहूर्ताच्या सौद्यांचे वेगळेपण जपण्यासाठी मागील सोमवारपासून सुरु केलेल्या या उपक्रमाच्या आजच्या उत्तरार्धात पाच कंपन्या. हे पाच शेअर म्हणजे त्या त्या विश्लेषकांच्या मर्मबंधातील ठेव आहेत. विश्लेषकांनी अनेक संशोधन अहवाल लिहिले असले तरी प्रत्येकाला या वर्षांत ही कंपनी नफ्याचे भरभरून माप पदरात टाकेल अशी खात्री वाटते. ‘‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’’ नेहमीच वाचकांना नवीन पण सकस देण्याचा प्रयत्न करीत असतो. हा उपक्रम राबविण्याचे ठरल्यावर विविध २७ दलाली पेढ्यातील १०० हून अधिक विश्लेषकांशी संपर्क साधण्यात आला. वर्षभरात त्यांनी संशोधन केलेल्या कंपन्यातून एखादी कंपनी निवडून ती का आवडली हे थोडक्यात कळविण्यास सांगण्यात आले. त्यातून १० कंपन्या निवडून हा उपक्रम राबविला गेला आहे. या बाबतच्या वाचकांचे अभिप्राय जरूर arthmanas@expressindia.com इमेल वर आम्हाला कळवा.   

* आयडिया सेल्युलर
परवाना नूतनीकरण शुल्काबाबत अपेक्षित कौल आला तर अखिल भारतीय स्तरावर सेवा जाळे असलेली दूरसंचार कंपनी म्हणून मोठी लाभार्थी.

आयडिया सेल्युलर देशातील सर्व २२ दूरसंचार परिमंडळांमध्ये टूजी सेवा पुरवठादार असून ११ सर्कलमधील थ्रीजीचा परवानाही तिने मिळविला आहे. इंडस टॉवर्स कंपनीत आयडियाची १६% हिस्सेदारी आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीला ६,३२३ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. कंपनीने ४४८ कोटीचा नफा कमावला आहे. या तिमाहीत बोलण्यासाठी प्रती ग्राहक वापरलेली वेळ ३.०३% घटली. कंपनीच्या म्हणण्यानुसार दरवाढ केली तर वापर कमी होतो. म्हणून पल्स रेट वाढविणे सध्या शक्य होणार नाही. पुढे वापर वाढला तर कंपनी दरवाढीचा विचार करेल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द झालेल्या टूजी परवान्याच्या दुसऱ्या फेरीनंतर दूरसंचार प्राधिकरणाने परवाना शुल्कात ३५ ते ६५% कपात सुचविली आहे. ही कपात सरकारला स्वीकारण्याची सूचना दूरसंचार मंत्रालयाने संयुक्त मंत्रिगटाला केली आहे. ही सूचना स्वीकारल्यास याचे पडसाद २०१५ मध्ये परवान्यांच्या नूतनीकरणात उमटतील. सार्वत्रिक निवडणुकांनंतर येणाऱ्या नवीन सरकारला नूतनीकरण शुल्क ठरवावे लागेल. या सर्व अपेक्षित गोष्टी कंपनीच्या शेअरच्या किंमतीत गृहीत धरलेल्या आहेत. पुढील वर्षी दिवाळीच्या सुमारास या गोष्टी स्पष्ट होतील अपेक्षेप्रमाणे या गोष्टी घडल्या तर या दिवाळीत केलेली पेरणी पुढील दिवाळीत १८-२०% भांडवली नफा मिळवून देऊ शकेल.
अंकिता सोमाणी , एंजल ब्रोकिंग

* टाटा ग्लोबल बीव्हरेजेस
– १६७.८० सद्य भाव
– १९३ दिवाळी २०१४ लक्ष्य
गृहोपयोगी वस्तू क्षेत्रातील असूनही एक उभरती व निरंतर वाढीच्या शक्यता असलेली कंपनी
टाटा ग्लोबल ही भारतातील बहुराष्ट्रीय पेय (बिगर मद्य) उत्पादक असून जगातील दुसऱ्या क्रमांकाची चहा उत्पादक आहे. टाटा टी, टेटली, कानन देवन, अग्नी, गुड अर्थ या नाममुद्रांनी डबाबंद चहा ती विकते. टाटा टी ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी डबाबंद चहाची नाममुद्रा असून टेटली ही इंग्लंड व कॅनडामध्ये विक्री होणारी दुसऱ्या क्रमांकाची नाममुद्रा आहे. कंपनीचा ७०% महसूल चहाच्या विक्रीतून येतो, तर ३०% कॉफी विक्रीतून येतो. स्टारबक्सबरोबर संयुक्तरित्या स्थापलेल्या कंपनीने एका वर्षांपूर्वी मुंबईत पहिले कॉफी दालन उघडून व्यवसायाला सुरुवात केली. एका वर्षांत सुरू केल्या दालनांची संख्येने २५ चा आकडा ओलांडला आहे. हा व्यवसाय मागील पाच वर्षांत ९% चक्रवाढ दराने वाढला. भारतात उत्तम पावसामुळे चहाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे चहाच्या किंमतीत घट झाली आहे त्यामुळे नफाक्षमता चालू आíथक वर्षांत वाढेल. कंपनीची पेप्सिकोबरोबर भागीदारी असून त्या पायावर कंपनी आपला व्यवसाय विस्तार जगभरात करीत आहे. टाटा वॉटर प्लस, टाटाग्लुको प्लस या नाममुद्रांनी बाटलीबंद पिण्याचे पाणीही ती विकत आहे.  कंपनी गृहोपयोगी वस्तू क्षेत्रातील असल्यामुळे आíथक अरिष्टाचा कमी परिणाम तिच्यावर झाला आहे. टाटा-स्टारबक्सचा सध्या एकूण विक्रीत कमी हिस्सा असला तरी हा भविष्यातील वाढणारा व्यवसाय आहे.

दिशा हजारी , जीईपीएल कॅपिटल disha@geplcapital.com

* कोरोमंडल इंटरनॅशनल
केंद्र सरकारच्या पोषणमूल्य आधारीत अनुदान योजनेची (एनबीएस) सध्या सर्वात मोठी लाभार्थी ही कंपनी आहेच, शिवाय अनुदाने विरहीत व्यवसायाचा सध्याचे एकूण नफ्यात ३०% प्रमाण २०१५ पर्यंत ५०% वर नेण्याची तिची योजना आहे.
– २१८.९५ सद्य भाव
– ३०० दिवाळी २०१४ लक्ष्य

कोरामंडल इंटरनॅशनल ही मुरुगप्पा चेट्टीयार समूहातील रासायनिक खते व कीटकनाशके उत्पादित करणारी कंपनी आहे. फोस्फेटिक खतांची भारतात दुसऱ्या क्रमांकाची उत्पादनक्षमता असणारी ही कंपनी आहे. ग्रो मोअर, परफॉर्म, पेरीगोल्ड, पेरीगोल्ड सुपर व गोदावरी या नाममुद्रांनी आपली उत्पादने कंपनी विकते. खतांच्या विक्रीव्यतिरिक्त शेतीशी संबंधित उत्पादने विकण्यासाठी ६४६ दुकानांची साखळी तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश व पाँडेचरी राज्यात सुरु केली आहे. संपूर्ण भारतात १२ हजार विक्रेते असून आंध्र प्रदेशातील दोन व तामिळनाडूतील दोन अशा चार कारखान्यांची मिळून एकूण उत्पादन क्षमता ३३ लाख टन आहे. चालू आíथक वर्षांत कंपनीने हाती घेतलेली काकिनाडा कारखान्याची विस्तार योजना पूर्ण होऊन ती ३६ लाख टनांवर जाईल. कंपनीने लिबर्टी फॉस्फेट व लिबर्टी उर्वरक या दोन कंपन्यांचे स्वत:मध्ये विलिनीकरणाची योजना संबंधित उच्च न्यायालयांच्या मंजुरीसाठी सादर केली आहे. केंद्र सरकारच्या पोषणमूल्य आधारीत अनुदान योजनेची (एनबीएस) सर्वात मोठी लाभार्थी ही कंपनी ठरली आहे. कंपनीचा अनुदाने विरहीत व्यवसाय सध्याच्या एकूण नफ्याच्या ३०% नफा पातळी वरून २०१५ पर्यंत ५०% नफा पातळीवर नेण्याची योजना आखली आहे. कंपनीच्या पाण्यात विरघळून द्यायच्या खताची बाजारपेठ संथ पण स्थिर गतीने  वाढत आहे. या वर्षी एकूण सरासरीच्या ८५% पाउस झाल्यामुळे जलस्त्रोतात पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे वर्षभरात कंपनीच्या उत्पादनांना पुरेशी मागणी राहील. म्हणून या कंपनीची दिवाळी खरेदीसाठी शिफारस करावीशी वाटते.
–  श्वेता कामत प्रभू, आनंद राठी
shwetaprbhu@rathi.com

* येस बँक
रिझव्‍‌र्ह बँकेने ढासळत्या रुपयाला आधारासाठी उगारलेल्या आसूडामुळे सर्वच बँकांचे भाव गडगडले. परंतु रुपयाच्या समर्थनार्थ योजलेली बंधने जशी सैल होत आहेत, त्याची सर्वात मोठी लाभार्थी हीच बँक ठरत आहे.
– ३७८.०५ सद्य भाव
–  ४७४ दिवाळी २०१४ लक्ष्य
येस बँक ही २००३मध्ये ज्या दोन बँकांना रिझव्‍‌र्ह बँकेने बँक परवाने दिले त्यापकी एक. मागील आíथक वर्षांत गुंतवणूकदाराना त्यांच्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळवून देणारी ही बँक होती. या बँकेची रचना इतर बँकांपेक्षा वेगळी आहे. या बँकेचा भर किरकोळ ग्राहकांपेक्षा कंपन्या व मोठ्या ग्राहकांवर असल्यामुळे इतर खाजगी व राष्ट्रीयीकृत बँकांच्या तुलनेत ‘कासा’ अर्थात बचत व चालू खात्यात असलेल्या रकमेचे प्रमाण एकूण दायित्वाच्या तुलनेत फारच कमी आहे. याचा परिणाम बँकेला आपल्या गरजा भागविण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेवर अवलंबून राहावे लागते. जुल महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेने रुपयाच्या विनिमय दरातील चढउतार रोखण्यासाठी अतिरिक्त रोखता कमी करण्यासाठी व्यापारी बँकांना रिझव्‍‌र्ह बँकेकडून होणाऱ्या अल्पमुदतीच्या पतपुरवठ्यावर अनेक बंधने घातली, एमएसएफचा दर वाढवला, बँकांना रोख राखीव प्रमाणात रोज ८०% असलेली सवलत रद्द करून रोजच ९९% रक्कम राखण्याचे बंधन घातले. त्यामुळे येस बँकेला रिझव्‍‌र्ह बँकेकडून होणारा पतपुरवठा आवळला गेला. १६ जुल रोजी पहिल्यांदा रिझव्‍‌र्ह बँकेने आसूड उगारला तेव्हा शेअरचा भाव गडगडायला सुरुवात झाली व २८ ऑगस्टला वर्षभरातील नीचांक रु. २१६.१० नोंदला गेला.
बँकेचे तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आहेत. निव्वळ नफ्यात २१% वाढ झाली आहे. व्याजाचे दर वाढल्यामुळे रोख्यांच्या किंमतीत पर्यायाने बँकेच्या गुंतवणुकीची घट झाली. या कारणाने तरतुदीत वाढ झाली. दुसऱ्या तिमाहीत २५ शाखा व ५४० कर्मचारी संख्या वाढली. बॅझल-३ नुसार तिमाहीअखेर टियर -१ भांडवलाचे प्रमाण एकूण भांडवलाच्या ९.५% आहे. रिझव्‍‌र्ह बँक या आधी लादलेली बंधने हळूहळू सल करेल. ही बंधने सल होतील तशी रिझव्‍‌र्ह बँकेकडून होणाऱ्या पतपुरवठा सुरळीत होईल. रिझव्‍‌र्ह बँकेच्या दुसऱ्या तिमाही पतधोरणात एमएसएफ दर पाव टक्क्याने घटविल्याचा सर्वात मोठे लाभार्थी येस बँक व इंडसइंड या खासगी बँका ठरल्या आहेत.  
– अल्पेश मेहता ,मोतीलाल ओस्वाल
alpesh.mehta@motilaloswal.com

* रॅलीज् इंडिया
सरकारने शेतीमालाच्या आधारभूत किमतीत केलेली वाढ, त्यातच यावर्षी उत्तम झालेले पाऊसपाणी कृषी क्षेत्रातील कंपन्यांच्या फायद्याचेच ठरणार आहे. दरसाल नव्या उत्पादनांची निरंतर भर घालणारी ‘रॅलीस’चा फायदा खासच!
– १५७.१५ सद्य भाव
– २१० दिवाळी २०१४ लक्ष्य

रॅलीज इंडिया ही टाटा समूहातील कृषी-जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आहे. खते, संशोधित बी बियाणे, कीटक नाशके या व्यवसायात ती कार्यरत आहे. देशांतर्गत विक्रीबरोबरच निर्यातीचे मोठे प्रमाण असलेली ही कंपनी आहे. स्थानिक शेतकऱ्यांना विकण्याबरोरच घारडा, एक्सेल, नागार्जुन, बायर, सिजेन्टा युनायटेड फॉस्फरस आदी कृषी-रसायन क्षेत्रातील कंपन्यांची ती प्रमुख पुरवठादार कंपनी आहे.
यावर्षी पाऊसपाणी उत्तम झाल्यामुळे सर्वच शेतीशी संबंधित कंपन्यांची दिवाळी खुशीत जाणार आहे तसे रॅलीज इंडियाचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आहेत. परंतु अतिवृष्टीने गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्याच्या काही भागातील शेती बाधीत झाली आहे. कंपनीने मागील तिमाहीत आपल्या विविध उत्पादनांच्या किंमतीत ५-८% वाढ केली आहे. विक्रीत वाढ होऊनही वाढलेल्या विक्रीचे नफ्याच्या दृष्टीने मोठ्या वाढीत रुपांतर करण्यात कंपनीला अपयश आले आहे. याचे कारण देताना कंपनीने चलनातील अनपेक्षित वध-घट होणे हे दिले आहे. या वर्षी हवामान खात्याच्या हवाल्यानुसार १८ ऑक्टोबपर्यंत सरासरीच्या ८६% पाऊस झाला आहे. देशाच्या पाणी साठ्यात मागील वर्षांपेक्षा ८-१०% वाढ दिसून येत आहे. म्हणून मागील वर्षी खरीपाच्या पेरण्या पाणी साठ्याअभावी होऊ शकल्या नव्हत्या. या वर्षी अशी परिस्थिती नाही. सरकारने शेतीमालाच्या आधारभूत किमतीत केलेली वाढ कृषी क्षेत्रातील कंपन्यांच्या फायद्याचीच ठरणार आहे. कंपनीने आपल्या नाममुद्रांकित बियाणांच्या शृंखलेत नवी उत्पादने यावर्षी भर घातली आहे. कंपनीच्या क्रिस्टल, प्रभा आदी नाममुद्रा शेतकऱ्यांच्या परिचयाच्या असल्यामुळे कंपनीने याच नाममुद्रांखाली नवीन उत्पादने आणत जाहिरातींचा कमी खर्च लक्षणीय कमी केला आहे. या नवीन उत्पादनांना ग्राहकांचा समाधानकारक प्रतिसाद लाभल्याचे कंपनी सूत्रांनी दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर विश्लेषकांबरोबर साधलेल्या संवादात स्पष्ट केले. बी-बियाणे व्यवसाय या संपूर्ण व्यवसायात १२-१५% वाढ दिसून येणे अपेक्षित असल्याचे कंपनीने सांगितले. कंपनीने गुजरात राज्यातील दहेज येथील कारखान्यात खते, बी-बियाणे यांची चाचणी घेण्याकरीता पथदर्शक प्रकल्पाला सुरुवात केली असून हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास असा प्रकल्प अन्य ठिकाणी राबविण्यात येईल. नफा व गुंतवणुकीत असलेली जोखीम यांचे जुळणारे गुणोत्तर पाहता ही कंपनी दिवाळी खरेदीसाठी योग्य वाटते.  
– रोहन गुप्ता ,एम्के ग्लोबल
rohan.gupta@emkeyglobal.com