02 June 2020

News Flash

वारसा हक्क कायदा

आपल्या नावावर असलेल्या संपत्तीचे विभाजन हे वारसा हक्क कायद्याप्रमाणे होते.

(संग्रहित छायाचित्र)

इच्छापत्र : समज-गैरसमज

डॉ. मेधा शेटय़े

व्यक्ती हयात असताना पुढच्या पिढीला संपत्तीचे हस्तांतरण कसे करता येईल याबद्दल या स्तंभातील लेखातून आपण आजवर माहिती करून घेत आलो आहोत. इच्छापत्र, त्याचे वेगवेगळे प्रकार, इच्छापत्राद्वारे ट्रस्ट स्थापन करून, त्याद्वारे असे संपत्तीचे हस्तांतरण वारसदारांमध्ये करता येते. एकुणात, मालमत्तेचे नियोजन आपल्यापश्चात नातेवाईकांसाठी कसे करावे हे आपण जाणले. पण जर ते आपण योग्य प्रकारे केले नाही, तर आपल्या नावावर असलेल्या संपत्तीचे विभाजन हे वारसा हक्क कायद्याप्रमाणे होते.

आपल्याकडे विविध वारसा हक्क कायदे आहेत. ही विविधता भारतात अनेक धर्माचे लोक राहत असल्यामुळे आहे. प्रत्येकाला आपला धर्म जोपासण्याची मुभा आहे व प्रत्येक धर्माच्या चालीरीतींना अनुरूप कायदे आहेत. त्यामुळेच तुमच्या धर्माप्रमाणे वारसा हक्क कायदा लागू होतो.

सर्वप्रथम आपण हिंदू धर्मातले वारसा हक्क कायदे थोडक्यात जाणून घेऊया.

वारसा हक्ककायदा कधी लागू होतो? जर कुणी व्यक्ती इच्छापत्र किंवा ट्रस्ट न करता गेली, तर त्या व्यक्तीच्या संपत्तीच्या विभाजनाचा प्रश्न उपस्थित होतो, त्या वेळी हा कायदा लागू होतो. या कायद्यात विभाजन करते वेळी मृत व्यक्ती कोणत्या लिंगाची आहे, स्त्री अथवा पुरुष हे पाहावे लागते.

‘हिंदू सक्सेशन कायद्या’प्रमाणे स्त्री व पुरुष यांच्या संपत्तीचे विभाजन वेगवेगळ्या पद्धतीने होते. लग्न झालेल्या स्त्रियांकरिता त्यांच्याजवळ असलेली मालमत्ता (सासर, माहेर किंवा स्वकष्टाने कमावलेली) त्यांना कशी प्राप्त झाली आहे, हेदेखील पाहावे लागते. त्याप्रमाणे कायद्यात नमूद केलेल्या वेगवेगळ्या नियमांप्रमाणे त्याचे विभाजन होते.

सर्वसाधारण प्रमाणे स्त्री असो किंवा पुरुष दोघांच्याही बाबतीत संपत्तीचे वितरण हे त्याच्या आप्त-नातेवाईकांना कायद्यात नमूद केलेल्या प्राधान्य यादीप्रमाणे होते. हे विभाजन जरी सूचीप्रमाणे झाले तरी सर्व वारसदारांना मालमत्तेचा हक्क एकाच वेळी व समप्रमाणात दिला जातो. जर का वारसदाराचा मृत्यू वाटप होण्याआधी झाला असेल तर त्याचा हिस्सा त्याच्या वारसदारांना समप्रमाणात दिला जातो. २०१५ मध्ये आलेल्या तरतुदीमुळे आता आपल्याला हेदेखील लक्षात ठेवायला हवे की, लग्न झालेल्या मुलीचादेखील आपल्या वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणेच समान हक्क असतो.

उदाहरणार्थ, श्याम या व्यक्तीला पत्नी कुंदा व तीन मुले आहेत – राम, लक्ष्मण आणि गीता. श्यामला सगळी मिळून खाली नमूद केल्याप्रमाणे पाच नातवंडे आहेत. लक्ष्मण याला दोन मुले, गीता हिला एक मुलगा व रामला दोन मुले आहेत. मुलगा लक्ष्मण हा श्याम जिवंत असतानाच मयत होतो. त्यानंतर श्यामही इच्छापत्र न करता मरण पावतो. त्यामुळे मालमत्तेचे विभाजन वारसा हक्क कायद्याप्रमाणे करावे लागते. श्यामला पत्नी कुंदा व तीन मुले असल्यामुळे त्याच्या संपत्तीचे चार भाग केले जातात. कुंदा, लक्ष्मण, गीता व राम हे त्याचे वारसदार, प्रत्येकाच्या वाटय़ाला चारातला एक हिस्सा प्राप्त होतो. पण वर नमूद केल्याप्रमाणे लक्ष्मण श्यामच्या आधीच मरण पावतो. त्यामुळे त्याचा एक हिस्सा त्याच्या दोन मुलांमध्ये समप्रमाणात दिला जातो. या उदाहरणामुळे वारसा हक्क कायद्याप्रमाणे विभाजन कसे होते याचा आढावा तुम्हाला नक्कीच आला असेल व हेदेखील समजले असेल की हिंदू स्त्रियांना वारसा हक्क कायद्याप्रमाणे लिंग भेदभाव न करता समान हक्क प्राप्त आहे.

(लेखिका कायदेतज्ज्ञ आहेत.)

(या संदर्भातील आपले प्रश्न पाठविण्यासाठी ई-मेल : willassure@gmail.com)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2019 1:59 am

Web Title: rights in parents property act abn 97
Next Stories
1 बाजार-साप्ताहिकी : अखेर स्वप्नवत तेजी
2 नियोजन भान : पहिले ते हरिकथा निरूपण
3 बाजाराचा तंत्र कल : तेजीचं तुफान उठलं रं! 
Just Now!
X