श्रीकांत कुवळेकर

इतिहासाची पुनरावृत्ती टाळायची असेल तर गुंतवणूकदारांनी सजग होऊन सोन्या-चांदीमधील व्यवहारासाठी केवळ सोनाराच्या दुकानांव्यतिरिक्त मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असलेली माहितीची अन्य दालने धुंडाळण्याची गरज आहे.

करोनानंतर सध्या कुठला विषय जगभर चर्चेत असेल तर जुलै महिन्यात सोने आणि चांदीच्या भावात झालेली विक्रमी वाढ. गूगलच्या सर्च इंजिनमध्ये याविषयीच्या बातम्या आणि माहितीची विचारणा करणाऱ्या ग्राहकांचा म्हणजे वाचकांचा क्रमांक बराच वरचा असेल हे सांगायला नको इतकी हवा सोन्या-चांदीच्या भावातील तेजीने निर्माण केली आहे. आणि मग शेअर असो किंवा कमॉडिटी, कुठल्याही बाजारात अशी हवा निर्माण होते तेव्हा मोठय़ा संख्येने असणाऱ्या सामान्य गुंतवणूकदारांची विचारशक्ती मागे पडून ते या मालमत्तांच्या भावाचा पाठलाग करू लागतात. आपण इतरांच्या मागे पडतोय या भावनेने मिळेल त्या भावात ते या गोष्टी खरेदी करू लागतात आणि मग बरेचदा अचानक हे भाव कोसळतात. तेही इतक्याही वेगात की सामान्य लोकांना विचार करायला आणि विकायला उसंतदेखील देत नाहीत आणि मग त्यांचे मोठे नुकसान होते. रिअल इस्टेट, शेअर्स आणि कमॉडिटी या सर्वच बाजारांमध्ये दर पाच-सहा वर्षांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतच असतात.

हे सांगण्याचा प्रपंच एवढय़ासाठी की सध्या आपण अशाच प्रकारच्या स्थितीतून जात आहोत. अगदी शेअर्स आणि सोने-चांदी या दोन्ही बाजारात एवढी तेजी आली आहे की या दोहोंपैकी कुठला फुगा आहे आणि कुठली तेजी खरी आहे की दोन्ही फुगे आहेत हे कळेनासे झाले आहे. भारतीय शेअर बाजार मोठय़ा ‘करेक्शन’च्या प्रतीक्षेत आहे हे नक्की असले तरी या लेखातून आपण सोन्या-चांदीमधील तेजीची कारणमीमांसा करूया.

आपण २०११ मध्ये सराफा बाजारात साधारण अशीच परिस्थिती अनुभवली होती. त्यावर्षीच्या एप्रिलमध्ये चांदीच्या भावाने भारतात ७०,००० रुपये प्रतिकिलोचा विक्रम केला होता. तर सोन्याने त्याच वर्षीच्या सप्टेंबरमध्ये २६,००० रुपये प्रति १० ग्रॅमचा विक्रम केला होता. परंतु त्यानंतरच्या आलेल्या मोठय़ा मंदीमुळे चांदीमधील गुंतवणूकदार चांगलेच फसले आहेत. तर सोन्याने आठ वर्षांचा विचार करता एकंदरीत जेमतेम परतावा दिला आहे. त्यामुळे २०११ आणि २०२० मधील परिस्थिती आणि या तेजीमागची ठळक कारणे पाहूनच यापुढील गुंतवणुकीच्या पावलांचा विचार करणे योग्य ठरेल.

भारतात जरी सोने हे प्रत्येकाला ‘असलीच पाहिजे’ या श्रेणीतली कमॉडिटी असली तरी सारे जग सोन्याकडे कमॉडिटीपेक्षा चलन म्हणून अधिक पाहते. देशाच्या अर्थव्यवस्थेची मजबुती बऱ्याचदा त्यांच्याकडे असलेल्या सुवर्णसाठय़ांवरून ओळखली जाते. जगात जेव्हा मोठे राजकीय आणि भौगोलिक पेचप्रसंग किंवा युद्धजन्य वातावरण निर्माण होते किंवा सध्याच्या करोनासारखी परिस्थिती निर्माण होते तेव्हा सर्वप्रथम सर्वजण आपली मालमत्ता सोन्यामध्ये रूपांतरित करतात. कारण इतर मालमत्तेची किंमत जेव्हा शून्य होऊ शकते तेव्हा १२ महिने २४ तास तरलता फक्त सोन्याला असते.

बऱ्याचदा प्रचंड आर्थिक झटक्यांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आणि पर्यायाने जागतिक बाजारांमध्ये मोठी घसरण होते. तेव्हा सोने अधिक चकाकते आणि चांदी, ज्याला सोन्याचा लहान भाऊ किंवा गरिबांचे सोने म्हणतात त्यालाही याचा थोडा फायदा मिळतो. जेव्हा २००८ मध्ये अमेरिकेतील कर्ज-अरिष्टामुळे तेथील अर्थव्यवस्था धोक्यात आली तेव्हा त्याला उभारी देण्यासाठी फेडरल रिझव्‍‌र्हने १५०,००० कोटी डॉलरचे आर्थिक पॅकेज दिले. म्हणजे तेवढय़ा नोटा छापल्या असे म्हणता येईल. याचा परिणाम डॉलरची क्रयशक्ती कमी झाली आणि सोन्याला फायदा मिळत गेला. त्यातून २०११ मध्ये सोने विक्रमी पातळीवर गेले असे ढोबळपणे म्हणता येईल. तेव्हा २००८ चे संकट हे प्रामुख्याने अमेरिकेचे होते आणि इतरांचे त्यात नुकसान झाल्यामुळे त्यांनादेखील चलनवाढ करायला लागली.  त्या तुलनेत आजची परिस्थिती खूपच वेगळी आहे. करोनामुळे सर्वच अर्थव्यवस्था भरडल्या जात आहेत. नोटा छापल्या जात आहेत. आजपर्यंत अमेरिका, युरोप, चीन, जपान, कोरिया आणि भारत यांची एकत्रित आर्थिक मदत ८,००,००० कोटी डॉलर झाली आहे आणि यात अजून वाढ संभव आहे. म्हणजे २००८ पेक्षा सहा पट अधिक चलन निर्माण केले गेले आहे. त्या तुलनेत आजची सोन्या-चांदीच्या भावातील तेजी खूपच कमी असे म्हणता येईल. परंतु दुसरी गोष्ट जर सोने हे डॉलरला पर्यायी चलन आहे असे मानले तर सध्या सोने वाढत आहे म्हणण्यापेक्षा डॉलरचे मूल्य वेगाने घटत आहे हे म्हणणे जास्त योग्य ठरेल.

आता दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे मागणी आणि पुरवठा हे समीकरण पाहू. २००८ नंतरच्या सोन्याच्या तेजीमध्ये आणि अगदी २०११ ते २०१८ च्या मंदीमध्ये प्रत्यक्ष सोन्याच्या जागतिक मागणीमध्ये फार मोठे चढ-उतार झालेले नव्हते. परंतु करोना काळात चीन आणि भारत या जगातील दोन मुख्य खरेदीदारांच्या मागणीमध्ये अगदी ६० ते ८० टक्क्यांहून अधिक घट झालेली दिसत आहे. या दोन देशांची वार्षिक आयात १,८०० टन म्हणजे जागतिक उत्पादनाच्या सुमारे ४५ टक्क्यांहून अधिक असते. तरीही भावात झालेली मोठी वाढ बऱ्याच महत्त्वाच्या खाणी बंद असल्यामुळे थांबलेल्या पुरवठय़ामुळेच आहे असेही म्हणता येईल.

तसेच आज जागतिक सराफा बाजारात असलेल्या प्रचंड अस्थिरता आणि अकार्यक्षम मूल्यसाखळीमुळे सोन्याचे भाव अमेरिकेतील डॉलरमध्ये असलेल्या प्रमाणित किमतीपेक्षा लंडन, भारत आणि चीनमध्ये एक-ते-अडीच टक्के ‘डिस्काउंट’ला आहे तर काही देशात तो त्यापेक्षा खूप अधिक आहे. या किमतीतील तफावतींमुळे ‘आर्ब्रिटाज ट्रेडिंग’ होत असते. यातून निर्माण झालेल्या व्यापारी गतिशीलतेमुळे देखील भावामध्ये मोठे चढ-उतार होत असतात. ‘आर्ब्रिटाज’ म्हणजे जेथे सोने स्वस्त तेथे घ्यायचे आणि तत्क्षणी जेथे महाग तेथे विकायचे. यामध्ये जोखीममुक्त नफा मिळत असतो.

सध्या मागणी फक्त अमेरिका आणि युरोपमधील मोठय़ा एक्स्चेंज ट्रेडेड फंड अथवा ईटीएफ या एकाच गुंतवणूक साधनामध्ये आहे. भारतातही त्यात वाढ होत आहे. परंतु आभूषणे आणि दागिने बाजार पूर्ण बसलेला आहे.

आता थोडय़ा वेगळ्या पद्धतीने या परिस्थितीकडे पाहूया. आजचे जग हे ‘डेटा’चे आहे. त्यामुळे आपण सोन्याविषयीचा डेटा ढोबळपणे पाहू. आज सोने ५२,००० रुपयांच्या घरात आहे आणि चांदी ६२,००० रुपये. साधारणपणे वेगवेगळ्या वेळी चांदी आणि सोन्याच्या भावात विशिष्ट गुणोत्तर असते. कधी चांदीचा भाव सोन्याच्या भावापेक्षा दीडपट किंवा दीड आणि दोनपट या कक्षेत राहत असे. या डेटा नियमानुसार एप्रिल २०११ मध्ये सोने २२,५०० रुपये तर चांदी ७०,००० रुपये होती. म्हणजे गुणोत्तर तीन पेक्षा अधिक होते. यावर्षी काही आठवडय़ापूर्वी अशी परिस्थिती होती की चांदी ४२,००० रुपये आणि सोने ४८,००० रुपये, म्हणजे गुणोत्तर एक पेक्षा खाली आले होते. आजही सोने ५२,००० आणि चांदी ६२,००० रुपये म्हणजे ऐतिहासिक दीड ते दोन हे गुणोत्तर जरी गृहीत धरले तरी  चांदीचा भाव किमान १५,००० रुपये वाढायला जागा आहे. त्यामुळे चांदी ८०,००० रुपये होण्यास चांगली जागा आहे. जागतिक बाजार पाहता सप्टेंबर २०११ मध्ये सोने १९२२ डॉलरवर गेले होते तर आता ते १९०० डॉलरपासून हाकेच्या अंतरावर आहे. म्हणजे गुंतवणूक बाजारातील समीकरणे पाहता ऐतिहासिक विक्रमी पातळीवरून घसरण नाही तरी निदान मोठी ‘करेक्शन’ येऊ शकते. ती १९४४ डॉलरवरून येईल की १९९४ डॉलरवरून एवढाच काय तो फरक आहे. परंतु एप्रिल २०११ मध्ये चांदीची किंमत ४७ डॉलर होती तर आज ती त्याच्या निम्मी म्हणजे २३ डॉलर एवढीच आहे. यावरून असेही म्हणता येईल की सोने-चांदीमधील कमीतकमी गुणोत्तर राखायचे असेल आणि सोने अधिक वाढले तर चांदी नजीकच्या काळात निदान १,००,००० लाख रुपये प्रति किलो एवढी होणेदेखील सहज शक्य आहे. थोडक्यात, तेजीवर भरवसा असणाऱ्या गुंतवणूकदारांनी हे लक्षात घ्यायचे की चांदीच्या तेजीला अधिक जागा आहे.

आता मंदीची शक्यता पाहू. आजची करोना परिस्थिती अशी आहे की, एका बाजूला मोठय़ा संख्येने लोकांना आपल्या अस्तित्वाची शंका वाटायला लागली असून बरोबरीने सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे दुबईसारख्या जगातील मोठय़ा बाजारातदेखील सोन्याला मागणी शून्य आहे. जगातील कित्येक अर्थव्यवस्था डबघाईला येऊन तेथील लोकांची रोजीरोटीची, जगण्यासाठीची लढाई तीव्र झाली आहे. बऱ्याच अर्थतज्ज्ञांनी असेही सांगितले आहे की, आपण अशा परिस्थितीकडे चाललो आहोत की, मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी माणसांना आपली मालमत्ता एक एक करून विकावी लागणार आहे. मात्र इतर मालमत्तांचा ग्राहकच उरला नसताना फक्त सोने ही एकच मालमत्ता अशी असेल की ज्याची विक्री शक्य आहे. आणि जेव्हा अशा प्रकारच्या विक्रीचा दबाव येईल तेव्हा सोन्याच्या किमती देखील वेगाने पडतील. अर्थतज्ज्ञांचे प्रत्येक अंदाज खरे ठरतातच असे नाही. परंतु लक्षात असू द्या की, अशा शक्यतांना जगातील अनेक मोठय़ा सराफा व्यावसायिकांनीच अलीकडील काही वेबसंवादी परिषदांमध्ये बोलताना दुजोरा दिला आहे.

तसे पाहता सोने-चांदी याबाबत लिहिण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. या या लेखामध्ये तेजी किंवा मंदीचा सल्ला दिला नसून यापुढील काळात सावध राहण्याची गरज आहे एवढेच सांगण्याचा प्रयत्न आहे. इतिहासाची पुनरावृत्ती टाळायची असेल तर गुंतवणूकदारांनी सजग होऊन सोने- चांदीमधील व्यवहारासाठी केवळ सोनाराच्या दुकानांव्यतिरिक्त मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असलेली अनेक माहितीची दालने धुंडाळण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, आज वायदे बाजारात सोन्या चांदीच्या व्यवहारांसाठी सहा ते सात वेगवेगळ्या प्रकारची साधने उपलब्ध आहेत. त्याद्वारे जोखीम व्यवस्थापन करणे अत्यंत सोपे होऊन जाते. अगदी अलीकडेच ‘ऑप्शन व गुड्स’ या विभागामध्ये आपण अत्यंत थोडय़ा पैशात १०० ग्रॅम सोन्यामध्ये तेजी किंवा मंदी करू शकता. एकंदरीतच, शेअर बाजार आणि हाजीर बाजारात सोन्यात व्यवहार करणाऱ्या प्रत्येकालाच कमॉडिटी वायदे बाजारात आपले खाते उघडणे अत्यंत गरजेचे आहे. कारण रात्री जागतिक बाजारात मोठी घसरण आली तर आपले सोने चांदी विकायला दुकाने मिळणार नाहीत तेव्हा वायदे बाजारामध्येच ते विकून पुढे होऊ शकणारे मोठे नुकसान टाळणे शक्य होईल.

लेखक वस्तू बाजार विश्लेषक.

ksrikant10@gmail.com