कौस्तुभ जोशी

अर्थतज्ज्ञ जॉन से यांनी अर्थव्यवस्था कशी चालते? अर्थव्यवस्थेत गती कशी निर्माण होते? त्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरतात याचे विवेचन करताना जे विचार मांडले ते ‘सेचा नियम’ या नावाने प्रसिद्ध झाले.

अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करते त्यामागे वाढती मागणी हे खरे कारण नसून वाढता पुरवठा किंवा वाढते उत्पादन हे आहे असे प्राध्यापक से यांचे म्हणणे होते. अर्थव्यवस्थेची प्रगती होते, म्हणजेच देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते आणि देशाच्या उत्पन्नात वाढ होणे म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होणे.

मग कसे वाढते लोकांचे उत्पन्न? समजा एखाद्या उत्पादकाने वस्तू तयार केल्या तर त्या वस्तू विकल्या जातात आणि त्यामुळे वस्तू बनवणाऱ्याला पैसे मिळतात. याची दुसरी बाजू खूप महत्त्वाची आहे. जेव्हा वस्तू तयार केल्या जातात तेव्हा कामगारांना पगार दिले जातात. म्हणजेच, त्यांच्याकडे दुसऱ्या वस्तू खरेदी करण्याची शक्ती निर्माण होते. त्यांनी त्या वस्तू खरेदी केल्या की आपोआपच वस्तूची मागणी वाढू लागते. म्हणजेच लोकांच्या हातात पैसा खेळता राहिला की ते वस्तू खरेदी करतात व यामुळेच त्या वस्तूंना मागणी तयार होते व त्याचे उत्पादन करण्यासाठी चालना मिळते. यातून पुढे पुन्हा कुणाचे तरी उत्पन्न वाढते.

हे चक्र जितक्या वेगाने फिरेल तसे अर्थव्यवस्थेत पैशाचे चक्र जोराने फिरून अर्थव्यवस्था वाढीस लागेल. यात एक मुद्दा गृहीत धरला आहे की अर्थव्यवस्थेत ज्या वस्तू बनवल्या जातात त्या नक्की विकत घेतल्या जातील. म्हणजेच वस्तू बनल्या आणि त्या विकल्या गेल्या नाही असं होणारच नाही! हे प्राध्यापक से यांच्या विचारामागील गृहीतक आहे. यात सर्वात मोठा मुद्दा असा की जर उद्योगधंद्यांमध्ये मंदी आली, उद्योजकांना वस्तूच निर्माण करता आल्या नाहीत तर हे मॉडेल यशस्वी ठरत नाही. कारण यात सरकारचा हस्तक्षेप ही भूमिकाच मान्य नाही. सरकारचा हस्तक्षेप नसणे म्हणजेच लेसे फेअर (Laissez Faire) या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार विख्यात अर्थतज्ज्ञ अ‍ॅडम स्मिथ यांनी केला होता. लोकांची खरेदी करायची क्षमता ही कोणाच्या तरी वस्तू बनवायच्या क्षमतेवर आधारित असते असे सोप्या शब्दात म्हणता येईल. यात एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा की लोकांकडे असलेल्या उत्पन्नापैकी सगळे पैसे वस्तू खरेदी करण्यासाठीच वापरले जात असल्यामुळे बचत शून्य असते व हे वास्तवात शक्य नाही. एका वस्तूची मागणी दुसऱ्या वस्तूच्या पुरवठय़ावर अवलंबून असते म्हणजेच जर एखाद्या वस्तूचा पुरवठा थांबला तर अजून कोणत्या तरी वस्तूची मागणी कमी होईल हे वास्तववादी ठरत नाही.

पुढे विख्यात अर्थतज्ज्ञ लॉर्ड केन्स यांनी आपल्या ‘जनरल थिअरी’ या पुस्तकात से यांचा नियम सोप्या भाषेत एका वाक्यात सांगितला. Supply Creates its own demand  म्हणजेच पुरवठय़ामुळेच मागणी तयार होते. मात्र केन्स यांनी सरकारच्या अस्तित्वाची जोरदार भलामण केलेली दिसते. जेव्हा अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असेल, अर्थचक्र गाळात रुतलेले असेल त्या वेळी सरकारने स्वत:हून आर्थिक उपाययोजना करून सरकारी तिजोरी खुली करून बाजारपेठेमध्ये उत्पादन क्षमता निर्माण करावी हे तत्त्वज्ञान केन्स यांनी मांडले.

लेखक वित्तीय नियोजनकार व अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

joshikd28@gmail.com