06 August 2020

News Flash

अर्थ चक्र : विक्रमी बाजार निर्देशांक – अर्थचक्रातील पालवीचा अग्रदूत?

आर्थिक आकडेवारी असे नीचांक नोंदवत असतानाच भारतीय शेअर बाजारांनी मात्र चालू नोव्हेंबर महिन्यात नवा विक्रमी उच्चांक नोंदविला आहे!

(संग्रहित छायाचित्र)

मंगेश सोमण

अलीकडच्या दिवसांमधली आर्थिक आकडेवारी ही भारतीय अर्थव्यवस्था जवळपास ‘आयसीयू’मध्ये असल्याचं सांगणारी आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत जीडीपीच्या वाढीचा वेग सहा वर्षांच्या नीचांकावर होता. तो पुढल्या तिमाहीत त्याहूनही खाली घसरेल, असे बहुतेकांचे अंदाज आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक विश्लेषण विभागानुसार सप्टेंबरमध्ये संपणाऱ्या तिमाहीत जीडीपीतली वाढ ४.२ टक्के असेल. म्हणजे सरकारचे माजी प्रमुख आर्थिक सल्लागार अरिवद सुब्रमणियन यांनी गेल्या काही वर्षांमधल्या आर्थिक आकडेवारीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उठवताना ज्या खऱ्या विकासदराचा संशय व्यक्त केला होता, त्याच्याही खाली! औद्योगिक उत्पादनात सप्टेंबर महिन्यात झालेली घसरण ही गेल्या आठ वर्षांतली सर्वात खराब कामगिरी होती. विजेच्या मागणीत ऑक्टोबर महिन्यात गेल्या बारा वर्षांमधली सर्वात मोठी घसरण नोंदली गेली. आर्थिक आकडेवारी असे नीचांक नोंदवत असतानाच भारतीय शेअर बाजारांनी मात्र चालू नोव्हेंबर महिन्यात नवा विक्रमी उच्चांक नोंदविला आहे!

असं का व्हावं? रिझव्‍‌र्ह बँकेचे अहवाल असं दाखवताहेत की उद्योगजगताचा आत्मविश्वास कमजोर पडला आहे आणि ग्राहकांचा मूड बिनसलेला आहे. बहुतेक व्यावसायिकांच्या चर्चा सध्या ‘‘हालत बिलकूल खराब है’’ अशा वाक्याने सुरू होत आहेत. सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँक आपापल्या परीने ढासळत्या अर्थव्यवस्थेला टेकू देण्याचे प्रयत्न करत आहेत. आणि त्याच वेळी शेअर बाजारात मात्र नवे उच्चांक मोडले जात आहेत! शेअर बाजारातली तेजी ही आर्थिक आकडेवारीत दिसणारा व्यापक आर्थिक ताप  लवकरच उतरण्याची खूण आहे की अर्थव्यवस्थेतली नरमाई लवकरच शेअर बाजाराचं आकाशात उडणारं विमान जमिनीवर उतरवेल?

तसं पाहायला गेलं तर अर्थचक्राची आकडेवारी आणि शेअर बाजार यांच्यात नेहमीच ताळमेळ असतो, असं बिलकूल नाही. खरी अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार यांच्यातील परस्परसंबंधांचा शोध घेण्यासाठी जगातल्या वेगवेगळ्या विश्लेषकांनी, वेगवेगळ्या देशांसाठी, वेगवेगळ्या कालखंडांची आकडेवारी तपासली आहे, पण त्यात कुठेही या दोन्हींमध्ये घट्ट संबंध आढळून आलेला नाही. यासाठी बरीच कारणं आहेत. एक म्हणजे निर्देशांकात ज्या कंपन्या आणि जी क्षेत्रं असतात, आणि त्यांचा निर्देशांकात जो तुलनात्मक हिस्सा असतो, तो प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेतल्या चित्रापेक्षा खूप निराळा असतो. उदाहरणार्थ, वित्तीय क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान, औषध उद्योग यांचा भारतीय बाजार निर्देशांकांमधला टक्का हा त्यांच्या जीडीपीतल्या टक्क्यापेक्षा किती तरी जास्त आहे. दुसरं म्हणजे, निर्देशांकात अशा काही कंपन्या असतात, की ज्यांचा बराचसा नफा त्यांच्या भारताबाहेरच्या कारभारातून किंवा उपकंपन्यांमधून येत असतो. तिसरं कारण म्हणजे, शेअर बाजारांवर जागतिक वित्तीय बाजारांमधल्या लाटांचा मोठा परिणाम पडतो. सांख्यिकी दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या सेन्सेक्सचं नातं भारतातल्या जीडीपीपेक्षा अमेरिकेतल्या डाऊ जोन्स निर्देशांकाशी जास्त जवळचं असल्याचं दिसून येतं.

सोबतच्या आलेखात देशाची अर्थव्यवस्था आणि भारतीय शेअरबाजार यांच्यातला परस्परसंबंध गेल्या सहा वर्षांमध्ये कसा होता, ते शोधण्याचा प्रयत्न केला आहे. या आलेखातली एक रेखा आहे राष्ट्रीय शेअरबाजाराच्या निफ्टी निर्देशांकाच्या किंमत-नफा गुणोत्तराची. ही रेखा शेअरबाजाराचा मूड आणि त्यामुळे मूल्यांकनावर होणारे परिणाम दाखवते. तर दुसरी रेखा आहे ती जीडीपीतले शेतीसह प्राथमिक क्षेत्रे आणि सरकारी आस्थापना सेवा वगळून दिसणाऱ्या वृद्धीदराची. ही दोन क्षेत्रं वगळण्याचं कारण असं की त्यांच्यातल्या वाढीच्या दराचा अर्थचक्राशी काही संबंध नसतो. ती वगळल्यामुळे दुसरी रेखा अर्थचक्राची दिशा जास्त स्पष्टपणे दाखवते.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकाच्या किंमत-नफा गुणोत्तरात गेल्या सहा वर्षांमध्ये सर्वसाधारणपणे वाढता कल राहिला आहे. पण त्या साधारणपणे चढत्या रस्त्यावर मध्ये दोन बऱ्यापैकी मोठे उतार आले. २०१५ चा उत्तरार्ध ते २०१६ चा पूर्वार्ध या काळात आणि २०१८ सालाच्या दुसऱ्या भागात असे ते दोन उतार होते. त्यातल्या पहिल्या उताराच्या काळात अर्थचक्र उलट जोमात होतं. म्हणजे त्या काळात सध्या दिसणाऱ्या चित्राच्या बरोबर उलटा प्रकार होता – शेअर बाजार नरम होता पण अर्थचक्र जोमात होतं.

शेअर बाजार मूल्यांकनात गेल्या वर्षीच्या उत्तरार्धात गैरबँकिंग क्षेत्रातल्या अडचणींमुळे घट दिसून आली होती त्यावेळीही जीडीपीवर ताबडतोब विशेष परिणाम दिसला नव्हता आणि आर्थिक वृद्धीदर सात टक्क्यांच्या जवळपास होता. गेल्या सहा वर्षांमधल्या या आकडेवारीकडे सांख्यिकी नजरेतून पाहिलं तर भारतीय संदर्भात हा परस्परसंबंध असलाच तर तो उफराटा असल्याचं दिसतं!

पण शेअर बाजार हा भविष्याचा वेध घेत असतो आणि त्यामुळे बाजारातला कल अर्थव्यवस्थेत ताबडतोब दिसत नसला तरी तीन ते सहा महिन्यांच्या अंतराने तरी तो अर्थव्यवस्थेच्या दिशेत परावर्तित होतो का? तसं असेल तर आज बाजारात दिसणारे उच्चांक काही महिन्यांनी इतर आर्थिक आकडेवारीत पालवी येण्याची सूचना देत आहेत काय? पण सांख्यिकी नजरेतून या प्रमेयालासुद्धा कौल मिळत नाही. तीन ते सहा महिन्यांचा अंतराळ मानूनसुद्धा शेअर बाजारातले उतारचढाव अर्थचक्रात परावर्तित होतील, असं आपल्याला जुन्या आकडेवारीच्या आधारावर म्हणता येत नाही.

सध्याच्या शेअर बाजारातल्या तेजीचे पडसाद काही महिन्यांनी अर्थचक्रात दिसण्याची शक्यता उणावणारा आणखी एक मुद्दा आहे तो त्या तेजीच्या प्रतवारीचा. चालू आर्थिक वर्षांत जवळपास साडेनऊ टक्क्यांची वाढ नोंदवून निफ्टी-५० निर्देशांक आतापर्यंतच्या सर्वोच्च शिखराजवळ असला तरी तेवढी तेजी व्यापक बाजारात दिसत नाही. याच कालावधीत मध्यम आकारमानाच्या कंपन्यांचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा मिडकॅप निर्देशांक सहा टक्क्यांनी खाली आला आहे, तर छोटय़ा कंपन्यांचा स्मॉल कॅप निर्देशांक सुमारे ११ टक्क्यांनी खालावलेला आहे.

काही धोरणात्मक बदलांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सुरू असलेला असंघटित ते संघटित असा दीर्घकालीन प्रवास आणि एकंदर अर्थचक्राचं मंदावणं या दोन्हींची परस्परपूरकता आणि त्याचे पडसाद सध्या काही आर्थिक आकडेवारीत दिसत आहेत. उदाहरणार्थ, छोटय़ा गाडय़ांचा खप मोठय़ा गाडय़ांपेक्षा जास्त घसरलेला आहे. छोटय़ा दुकानदारांची दिवाळी नरमलेली होती, तरी रिटेल क्षेत्रातल्या मोठय़ा कंपन्यांच्या विक्रीची आकडेवारी त्या मानाने ठीक आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री करणाऱ्या कंपन्या ग्रामीण भागात आणि छोटय़ा शहरांमध्ये मोठय़ा शहरांच्या तुलनेत जास्त अडचणींचा सामना करत आहेत.. वगैरे.

विक्रमी निर्देशांकाची नाही, तरी शेअर बाजारातली छोटय़ा आणि मोठय़ा कंपन्यांच्या कामगिरीतल्या फरकाची ही कहाणी मात्र खऱ्या अर्थव्यवस्थेत दिसणाऱ्या चित्राशी जास्त मिळतीजुळती आहे!

’  लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात आर्थिक विश्लेषक म्हणून कार्यरत. ईमेल : mangesh_soman@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2019 4:18 am

Web Title: sales market index forerunner of the global economy abn 97
Next Stories
1 बाजाराचातंत्र कल : निर्देशांकाची ‘किंतु-परंतु’ वाटचाल..
2 क.. कमॉडिटीचा : कडधान्य स्वयंपूर्णता धोक्यात
3 नावात काय? : औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी)
Just Now!
X