||  अजय वाळिंबे

सध्याच्या शेअर बाजाराच्या माहोलमध्ये खरे तर ‘वेट अँड वॉच’ असाच गुंतवणूकदारांचा पवित्रा असायला हवा. मात्र ज्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक करायचीच आहे त्यांनी कुठल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी? पडेल बाजारात सोने तसेच काही ब्लू चीप कंपन्यांचे शेअर्स तुमच्या पोर्टफोलियोचे तारणहार ठरू शकतात. त्यामुळे गुंतवणूक करायची असल्यास काही उत्तम बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये करणे फायद्याचे ठरू शकेल. अर्थात इथे देखील गुंतवणूक टप्प्याटप्प्यानेच करायला हवी हे वेगळे सांगायला नको.

आज सुचविलेला जिलेट हा याच पठडीतील एक शेअर. पूर्वी इंडियन शेव्हिंग प्रॉडक्ट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिलेट इंडिया लिमिटेडची स्थापना १९८४ मध्ये झाली. ही आज एक नावाजलेली एफएमसीजी कंपनी आहे. कंपनीचा मुख्य व्यवसाय पर्सनल ग्रुमिंग आणि ओरल केअर अशा दोन भागात मुख्यत: आहे. पर्सनल ग्रुमिंग विभागामध्ये ब्लेड रेझर्स आणि टॉयलेटरीजचा समावेश आहे, तर ओरल केअर विभागात टुथब्रश आणि तोंडाच्या काळजीची अन्य उत्पादने समाविष्ट आहेत. कंपनीचे जिलेट या प्रमुख ब्रॅण्डखेरीज फ्युजन, मॅक ३, विनस, सॅटीन केअर जेल तसेच ओरल बी हे इतर मुख्य ब्रॅण्ड्स आहेत. या खेरीज कंपनी डय़ुरासेल या प्रीमियम बॅटरीचे वितरणही करते. कंपनीचे भारतात दोन मुख्य उत्पादन प्रकल्प असून ते राजस्थानमधील भिवडी आणि हिमाचल प्रदेशातील बद्दी येथे आहेत.

चिरपरिचित ब्रॅण्ड आणि गुणवत्तेच्या जोरावर कंपनीने  आपल्या कामगिरीचा आलेख कायम चढता ठेवला आहे. डिसेंबर २०१९ अखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीने ४५९.३१ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ७१.०७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. याच कालावधीतील गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ३२ टक्क्य़ांनी अधिक आहे. जिलेटसारख्या कंपन्यांकडून आगामी कालावधीत अशीच उत्तम कामगिरी अपेक्षित आहे. नवीन पिढीचा ब्रॅण्ड म्हणून जिलेट आता ग्रामीण भागात देखील पोहोचला आहे. उत्तम प्रवर्तक, उत्तम गुणवत्ता आणि अर्थात उत्तम विपणन यामुळे जिलेटसारखी कंपनी कुठल्याही वेळी आकर्षक गुंतवणूक वाटते.

काही कंपन्यांचे शेअर्स खूप महाग वाटतात, पण त्यातील गुंतवणूक कधीच नुकसानीत जात नाही झाला तर फायदाच होतो. आज सुचविलेली जिलेट ही त्यातलीच एक कंपनी. याच स्तंभातून पूर्वी सुचवलेले एमआरएफ किंवा ३एम सारख्या कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांचा फायदाच करून दिला आहे. जिलेट ही प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल या बहुराष्ट्रीय कंपनीची उपकंपनी असल्याने अनेक देशात तिचे वेगळे लिस्टिंग झालेले नाही. मात्र भारतामध्ये जिलेट आणि प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स बाजारात सूचिबद्ध झाले आहेत.

 

 

जिलेट इंडिया लिमिटेड

(बीएसई कोड – ५०७८१५)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ५,७७२

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.