जून महिन्याच्या अतिथी विश्लेषक ज्योती भावे या भांडवली वस्तू आणि पायाभूत सुविधा विश्लेषक असून, त्या टाटा टीडी, डॉनिडे सिक्युरिटीज्, एम्के ग्लोबल या दलाल पेढय़ात कार्यरत राहिल्या आहेत. मागील तीन वर्षांपासून त्या एमबी इक्विटीज् या दलाल पेढीत सह-उपाध्यक्ष समभाग संशोधन म्हणून कार्यरत आहेत.
वैयक्तिक गुंतवणूकदारांना अनेकदा एखादी कंपनी आपल्या रोजच्या जीवनाची किती अविभाज्य घटक आहे याची कल्पना नसते. एखाद्या महत्त्वाच्या आस्थापनात, उदाहरणार्थ मंत्रालय, महानगरपालिका इमारत वगैरेत प्रवेश करण्याआधी अभ्यंगताच्या सामानाची तपासणी करणारी क्ष-किरण यंत्रणा, चर्चगेट, सीएसटी आदी स्टेशनावर लावलेल्या धातूशोधक चौकटी, आणिबाणीच्या प्रसंगी इशारा देण्यासाठी बँकेच्या शाखेच्या बाहेरचा भोंगा इत्यादी उत्पादने रोजच आपण पाहत असतो किंवा त्यांचा उपयोग करत असतो.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुका सुनियोजित पार पाडण्याचे श्रेय निवडणूक आयोगाला जसे आहे तसे ते भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड या केंद्र सरकारच्या मालकीच्या नवरत्न कंपनीलादेखील आहे. या निवडणुकीत वापरलेली मतदान यंत्रे हे या कंपनीचे एक प्रमुख उत्पादन आहे. केंद्र सरकारच्या संरक्षण, आकाशवाणी, दूरदर्शन अशा अनेक खात्यांना लागणारे तंत्रज्ञान आपल्या उत्पादनांच्या माध्यमातून ही कंपनी पुरवते.
मागील सरकारच्या धोरण दुष्काळाचा परिणाम झालेली जी काही खाती आहेत त्यापकी एक संरक्षण खाते होय. संरक्षण दलांचे आधुनिकीकरण हे एक विद्यमान सरकारसमोरील प्रमुख आव्हान आहे. या रखडलेल्या आधुनिकीकरणाला येत्या पाच वर्षांत गती मिळणे अपेक्षित आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स ही या बदलत्या धोरणाची एक प्रमुख लाभार्थी ठरेल. या कंपनीची गेल्या पाच वर्षांतील विक्री ही एकूण विक्रीच्या सरासरी ७६.८ टक्के संरक्षण, पोलीस, सीमा सुरक्षा दल या प्रकारच्या ग्राहकांसाठी झाली आहे. तर २०१० ते २०१३ या कालावधीत एकूण संरक्षण दलाच्या वार्षिक खरेदीपकी सरासरी ३.९ टक्के खरेदी या कंपनीकडून झाली आहे. कंपनीचे व्यवसायाचे स्वरूप पाहता आर्थिक आवर्तनांनी बाधित न होणारा व ग्राहकांनी नोंदविलेल्या मागणीसमोर आगाऊ रक्कम घेऊन पुरवठा करणारा व्यवसाय या प्रकारात मोडतो.  
भारत इलेक्ट्रॉनिक्सची प्रमुख उत्पादने :
धातूशोधक चौकटी, सामानाची तपासणी करणारी क्ष-किरण यंत्रणा मतदान यंत्रे, डॉल्पर रडार, सोनार यंत्रणा ट्रान्सपॉडर (ध्वनीचित्र दळणवळण यंत्रणा) भूसुरुंग शोधन यंत्रणा, क्षेपणास्त्र (आकाश, पृथ्वी, नाग, ब्राम्होस).
कंपनीचे मुख्यालय व पहिली उत्पादन सुविधा बंगळरु येथे असून देशात चेन्नई, पुणे, नवी मुंबई, पंचकुला, कोटद्वार, गाझियाबाद, हैदराबाद व मछलीपट्टणम येथे कारखाने आहेत. अर्थसंकल्पात सर्वात मोठा वाटा हा संरक्षण खात्याच्या खर्चाचा असतो. या तरतुदीपकी मोठी रक्कम शस्त्रास्त्र खरेदीवर खर्च होते. मागील १० वर्षांत ही रक्कम सरासरी दरवर्षी १० टक्याने वाढत आहे. भारताचा संरक्षण खरेदीत जगात १५ वा क्रमांक लागतो व कोणत्याही भारतीय कंपनीकडून होणाऱ्या संरक्षण खरेदीत भारत इलेक्ट्रोनिक्सचा पहिला क्रमांक लागतो. भारत इलेक्ट्रोनिक्स हा संरक्षण सामुग्रीचा सर्वात मोठा पुरवठादार आहे.  
मागील आर्थिक वर्षांच्या चौथ्या तिमाहीचे व संपूर्ण वर्षांचे निकाल पाहिले असता कंपनीकडे पुढील ४५ महिने पुरतील इतक्या विविध उत्पादनांच्या मागण्या ग्राहकांकडून नोंदल्या आहेत. या वर्षांत राष्ट्रीय जन नोंदणी व निवडणूक आयोग यांच्यासहित आकाश, पृथ्वी ही क्षेपणास्त्रे यांच्यामुळे मागील तीन वर्षांतील सर्वोच्च करपूर्व नफा क्षमता २४ टक्के या तिमाहीत नोंदली गेली. तर व्याज, घसारा व करपूर्व नफ्याचे प्रमाण ५२ टक्के होते. मागील आíथक वर्षांत हेच प्रमाण ४८ टक्के होते. आकाश या क्षेपणास्त्राचा व्यावसायिक तत्वावर उत्पादनास प्रारंभ झाला आहे. चालू आíथक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत कंपनीला संरक्षण खात्याशी संबंधित प्रत्येकी ४०० ते ५०० कोटी रुपयांची व पुढील तीन ते चार वर्षांत पूर्ण करावयाची तीन कंत्राटे होणे अपेक्षित आहे. यात प्रामुख्याने क्लिनिकल कम्युनिकेशन सिस्टिम व टोटल फिल्ड मॅनेजमेंट सिस्टीम या दोन महत्त्वाकांक्षी कंत्राटाचा समावेश आहे.
‘अर्थ वृत्तान्त’मध्ये प्रसिद्ध लेखांमध्ये चर्चिलेल्या, शिफारस केलेल्या योजना/समभागांमध्ये लेखकांची व्यक्तिगत गुंतवणूक अथवा अन्य स्वारस्य नाही. परंतु सदर लेखकांचा सल्ला घेणारे ग्राहक, निकटवर्तीयांची त्यात गुंतवणूक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.