25 April 2019

News Flash

ज्येष्ठ म्हणजे निवृत्त नव्हे!

आधीच्या लेखावर अनेक प्रतिसादादाखल अनेक प्रश्न पुढे आले.

|| जयंत विद्वांस

आधीच्या लेखावर अनेक प्रतिसादादाखल अनेक प्रश्न पुढे आले. बहुतेक सर्व प्रश्नकर्त्यांचा रोख असा की, ‘आयुष्यभर कष्ट करून शांत, सुखी निवृत्त जीवन जगण्याच्या क्षणी तुम्ही आम्हाला भीतिदायक सिनेमा दाखवत आहात.’ ‘आम्हाला सहली/ हौसमौज करण्याच्या योजनांना फुली मारावी लागणार, असे दिसते..’ वगैरे.

तुमच्या एकंदर खर्चामधील हौसमौज, सहल यासाठी वर्षभरात होणाऱ्या खर्चाचे प्रमाण किती टक्के आहे याचा अंदाज घ्या. हे प्रमाण एकूण खर्चाच्या दहा टक्के असेल तर कुठेही काटछाट करायची गरज नाही. निवृत्तीनंतरही आयकर वजा जाता होणाऱ्या उत्पन्नापैकी तीस टक्के रक्कम पुन्हा गुंतवली जाते आहे. हे काटेकोरपणे सांभाळा. निवृत्त होईपर्यंत दरमहा शिस्तीत बचत केली जाते. परंतु बहुतेक वेळा निवृत्तीनंतर उत्पन्नातील तीस टक्के वाटा बचत/ गुंतवणूक केली जात नाही.

अमरावतीवरून एका सरकारी अधिकाऱ्याचा प्रश्न आला. त्यांचे आजचे उत्पन्न आणि खर्च जवळपास समान आहे. पुढील काळात व्याजात कसे भागेल ही चिंता त्यांनी व्यक्त केली. त्यांना एकुलती एक मुलगी आहे. तिचे मासिक उत्पन्न पंचवीस ते तीस हजार आहे. परंतु त्यांना मुलीकडून पैसे घेणे कमीपणाचे वाटते. एकविसाव्या शतकातसुद्धा त्यांना सामाजिक रूढी-परंपरा यातून बाहेर पडणे कठीण जाते आहे.

युरोप, अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियासारख्या पुढारलेल्या देशात स्थायिक झालेल्या मराठी बांधवांनी आमच्या देशातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेबद्दल माहिती विचारली आहे. प्रत्येक देशातील माहिती सांगणे शक्य नाही. या सुविधांमध्ये फक्त पाचशे डॉलर्स भत्ता मिळणे हे अभिप्रेत नाही तर वैद्यकीय, आरोग्य किंवा सामाजिक सुरक्षा सुविधा या सर्वाचा अंतर्भाव होतो. तुमच्या देशातील महाराष्ट्र मंडळात चौकशी केल्यास ही माहिती मिळू शकेल.

पुष्कळ जणांनी १२० वर्षे आयुर्मान असण्याबद्दल शंका उपस्थित केली आहे. मला असे वाटते, त्या सर्वाना १२० वर्षे जगण्यापेक्षा १२०व्या वयापर्यंत पैसा कसा पुरणार ही भीती जास्ती आहे. आज जपानमधील एका खेडय़ात शंभरी पार केलेले पुष्कळ लोक आढळून येतात. मागील आठवडय़ात २६ जानेवारीच्या संचलनात नव्वदी पार केलेले सेनादलातील निवृत्त सदस्य सामील झाले होते. बॉलीवूडमधील दिलीपकुमार आज नव्वदीच्या पुढे आहेत. नाना पाटेकरांच्या मातोश्री नव्याण्णव वर्षांपर्यंत जगल्या. तर सत्त्याहत्तर वर्षांचे अमिताभ बच्चन अजूनही कार्यरत आहेत. असे म्हणतात की महाभारतकालीन युद्धात भीष्माचार्याचे वय जवळपास दीडशे वर्षे होते तर कर्ण नव्वद ते पंचाण्णव वर्षे वयाचा असावा व या सर्वानी त्या वयात युद्धात भाग घेतला होता, म्हणजे त्यांची प्रकृत्ती किती ठणठणीत होती! नवीन संशोधनांमुळे ही परिस्थिती नक्की पुन्हा येऊ शकते.

महागाईचे आकडे पाहून पुष्कळ जणांना या गोष्टीची भीती वाटते. परंतु याला सामोरे जाणे हा एकमेव पर्याय राहतो. महागाई साधारण २० वर्षांत दहा पट वाढते. प्रा. रविंदर सिंग चावला यांनी दिलेल्या पुढील तक्त्यामध्ये मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबाचा मासिक खर्च खालीलप्रमाणे होता.

मला कल्पना आहे. २०२० मध्ये हा एक लाख रुपये झाला नाही तरी दहा हजारांपेक्षा तीन-चार पट सहज असू शकेल.ही वाढ वार्षिक १२.२ टक्के होते. यामध्ये ८ टक्के महागाई दर आहे व ४.२ टक्के ही वाढ बदलत्या राहणीमानामुळे (लाइफस्टाइल एक्सपेन्सेस) आहेत. पूर्वीच्या काळी मोबाइल फोन अस्तित्वात नव्हते. आज फक्त मोबाइलच नव्हे तर स्मार्टफोन ही काळाची गरज झाली आहे. लॅपटॉप व एलईडी संच या जीवनावश्यक गरजा झाल्या आहेत. येणाऱ्या काळात अजून काही महागडय़ा गोष्टी गरजेच्या होतील. महागाई दर केवळ ७ टक्के आहे असे गृहीत धरल्यास मासिक खर्च दर दहा वर्षांत दुप्पट होईल. म्हणजे २००० साली निवृत्त झालेल्या माणसाचा मासिक खर्च दहा हजार धरल्यास पुढील काळात अपेक्षित खर्च खालीलप्रमाणे होईल.

 

एक ग्राहक पहिल्यांदाच निवृत्ती नियोजनासाठी २०१८ मध्ये माझ्याकडे आले होते. ते दर महिना आपला खर्च व्यवस्थित लिहून ठेवतात. तो जवळपास महिना ४५ हजार होता. गप्पांदरम्यान सहज त्यांना विचारले की, ४० वर्षांपूर्वी तुम्ही नोकरीला लागलात, त्या वेळेला मासिक पगार किती होता? तर ते म्हणाले फक्त एक हजार. त्यांना सहज म्हणालो, १९७८ साली तुम्हाला कोणी असे सांगितले असते की, अजून ४० वर्षांनी निवृत्तीच्या वेळेस तुमचा मासिक खर्च ४५ हजार रुपये असेल तर तुमचा विश्वास बसला असता का? उत्तर अर्थातच नाही होते.

वर्ष २००४ नंतर नोकरीस लागलेले सरकारी कर्मचारी एका अर्थाने सुखी आहेत. त्यांना माहीत आहे की, त्यांना पेन्शन मिळणार नाही. परंतु ज्यांना आज पेन्शन मिळणे शक्य आहे. असे सरकारी कर्मचारी फार मोठय़ा भ्रमात आहेत की, त्यांची पेन्शन महागाईनुसार वाढेल आणि ती तहहयात मिळत राहील; त्यांच्या पश्चात वैवाहिक जोडीदारास अर्धी पेन्शन मिळेल. येत्या १५ वर्षांत सरकार कोणतेही असो महागाईनुसार पेन्शन वाढण्याची शक्यता फार कमी आहे. त्यानंतर काही वर्षांत कदाचित पेन्शन पूर्ण बंद होईल. कारण सरकार कोणाचेही असो सर्व निवृत्तांना पेन्शन देणे परवडणार नाही. अमेरिकेमध्ये पूर्वीच्या काळी अपेक्षित आयुर्मान ६५ ते ७० वर्षे धरण्यात आले. म्हणजे निवृत्तीनंतर पाच ते दहा वर्षे फक्त पेन्शन द्यावी लागेल. परंतु आज १५ लाखांपेक्षा जास्त लोक शंभरी पार केलेले आहेत. जे गेली चाळीस वर्षे विविध कंपन्यांतून पेन्शन घेत आहेत. यासाठी कंपन्यांनी निवृत्तीच्या वेळेस आर्थिक तरतूद केली नव्हती. त्यामुळे पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना सध्याच्या नफ्यातून पेन्शन दिली जाते. त्यामुळे नफा कमी होऊ लागला. त्यावर उपाय म्हणून कामगार कल्याण निधीतून (वर्कर्स वेल्फेअर फंड) मधून पेन्शन देणे सुरू झाले. या गोष्टीला सध्याच्या कर्मचाऱ्यांनी ‘आमच्या हक्काचे पैसे निवृत्त कर्मचाऱ्यांवर खर्च करण्याला’ हरकत घेतली. याचा अर्थ आपल्या निवृत्ती नियोजनाची सोय आपली आपणच करावी लागेल.

याला उपाय काय?

१) ज्येष्ठ नागरिक म्हणजे निवृत्त नागरिक नव्हे. निवृत्तीनंतर सुद्धा प्रकृती ठणठणीत असेपर्यंत कामात राहा. वेगळ्या पद्धतीत नोकरी अथवा व्यवसाय काय करता येऊ शकेल असा विचार करा. आज पुष्कळ कंपन्यांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसाचे शिबीर घेतले जाते. त्यामध्ये तुमचे शिक्षण, अनुभव, स्वभाव यानुसार निवृत्तिपश्चात तुम्ही कोणत्या स्वरूपात नोकरी अथवा व्यवसाय करू शकता याचे मार्गदर्शन केले जाते. आज डॉक्टर, वकील यांच्यासारखे प्रोफेशनल आपले निवृत्तीचे वय कितीही पुढे नेऊ शकतात.

२) सर्व आजी-आजोबा आपल्या नातवंडांसाठी शिक्षणाची तरतूद म्हणून गुंतवणूक करतात. जसे काही तुमची मुले नातवंडांच्या शिक्षणाचा भार पेलू शकणार नाहीत किंवा नातवंडांच्या लग्नाची सोय म्हणून सोने खरेदी करतात. अजून पंधरा-वीस वर्षांनी सामाजिक व आर्थिक परिस्थिती इतकी बदललेली असेल की, तुम्ही केलेली नातवंडांची सोय अप्रासंगिक किंवा तुटपुंजी असेल. सर्व ज्येष्ठ नागरिकांचे एकच सांगणे असते की, आम्ही कष्टात दिवस काढले तसे आमच्या मुलांना नकोत. खरे तर तुमच्या मुलांना सुद्धा थोडेफार कष्ट त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी काढण्याची संधी द्या.

३) निवृत्तीसाठी व निवृत्तीनंतरही बचत नव्हे तर चांगली गुंतवणूक करा. येत्या काळात सोने-चांदी, जमीन-जुमला, पोस्ट ऑफिस, बँक ठेवी याऐवजी पर्यायी गुंतवणूक योजना (अल्टरनेट अ‍ॅसेट/ इन्व्हेस्टमेंट स्किम) यांचा विचार करा. निवृत्तीनंतरही एकूण उत्पन्नाच्या ३० टक्के रक्कम वाचवून चांगल्या पद्धतीत गुंतवणूक केली जाईल. हे कटाक्षाने सांभाळा.

४) तुमचा पैसा म्हणजे म्हातारपणी काळजी घेणारी तुमची मुलगी/ मुलगा आहे असे समजून त्याचे संगोपन करा. ‘नटसम्राट’ नाटक व ‘बागबान’ सिनेमा पुन:पुन्हा बघा. निवृत्ती नियोजनाचे चर्चासत्र काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठेही असले तरी ‘बागबान’ सिनेमाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही.

आता प्रश्न – ‘जर आम्ही एकशेवीस वर्षे किंवा त्याहून जास्त जगलो नाही तर?’ मग तुमची पुढची पिढी श्रीमंत होईल असे म्हणून रनआऊट झाल्याबद्दल देवाचे आभार माना. पुढील खेपेस निवृत्तीनंतर गुंतवणूक कशी करावी हे विचारात घेऊ.

sebiregisteredadvisor@gmail.com

(लेखक सेबीद्वारे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सीएफपी पात्रताधारक आहेत.)

First Published on February 4, 2019 12:05 am

Web Title: senior citizens is not retired persons