News Flash

बाजाराचा तंत्र-कल : वळणबिंदूवर!

कंपन्यांच्या उत्कृष्ट वा निराशाजनक वित्तीय कामगिरी त्या समभागाच्या बाजारभावात तर परावर्तित होतीलच पण मुख्य निर्देशांकातही त्याचे प्रतिबिंब उमटेल.

(संग्रहित छायाचित्र)

|| आशीष ठाकूर

या स्तंभातील २२ एप्रिलच्या ‘परिघातील परिक्रमा’ या लेखातील वाक्य होते – येणाऱ्या दिवसात सेन्सेक्सवर ४८,५८६ आणि निफ्टीवर १४,३५० चा स्तर सातत्याने राखला गेल्यास निर्देशांकांचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ५०,००० ते ५०,५०० आणि निफ्टीवर १४,८०० ते १४,९५० असेल. वरचे लक्ष्य साध्य झाल्यावर नफारूपी विक्री होऊन जी घसरण संभवते त्यात सेन्सेक्सने ४९,९६० आणि निफ्टीने १४,७५० चा स्तर राखणे नितांत गरजेचे आहे.’ अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे सरलेल्या सप्ताहातील निर्देशांकाचा साप्ताहिक बंद नेमका या स्तरावरच आहे. या पाश्र्वाभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळूया.

गुरुवारचा बंद भाव :

 सेन्सेक्स : ५०,०२९.८३

निफ्टी : १४,८६७.३५

सेन्सेक्सवर ४९,९६० आणि निफ्टीवर १४,७५० चा स्तर सातत्याने राखल्यास निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ५१,००० आणि निफ्टीवर १५,००० असेल. भविष्यात हा स्तर निर्देशांकाचा ‘महत्त्वाचा वळणबिंदू’ असेल. हा स्तर निर्देशांकाने सातत्याने राखल्यास निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ५२,५१६ आणि निफ्टीवर १५,४३१ असेल आणि द्वितीय लक्ष्य सेन्सेक्सवर ५३,५०० आणि निफ्टीवर १५,७५० असेल.

भविष्यात सेन्सेक्सवर ५१,००० आणि निफ्टीवर १५,००० स्तराला ‘अनन्यसाधारण महत्त्व’ आहे. या महिन्यापासून कंपन्यांचे वार्षिक / तिमाही वित्तीय निकाल येण्यास सुरुवात होईल. वार्षिक वित्तीय निकालातून कंपन्या या करोना, लॉकडाऊनच्या दुष्टचक्रावर मात करत आर्थिक घोडदौड कायम राखतात की ढेपाळतात हे मे महिन्याच्या अखेरपर्यंत स्पष्ट होईल हे आर्थिक आघाडीवरील झाले. तर राजकीय पटलावर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकालदेखील या दरम्यान येऊन जातील या दृष्टीने आता आपण आर्थिक आणि राजकीय आघाडीवर महत्त्वाच्या वळणबिंदूवर उभे आहोत. या संपूर्ण दोन महिन्यांच्या कालावधीत सेन्सेक्सवर ५१,००० आणि निफ्टीवर १५,००० हा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर असेल. कंपन्यांच्या उत्कृष्ट वा निराशाजनक वित्तीय कामगिरी त्या समभागाच्या बाजारभावात तर परावर्तित होतीलच पण मुख्य निर्देशांकातही त्याचे प्रतिबिंब उमटेल.

म्हणूनच मे महिन्याच्या अखेरपर्यंत सेन्सेक्सवर ५१,००० आणि निफ्टीवर १५,००० चा स्तर राखला गेल्यास करोना, लॉकडाउनचा चक्रव्यूह भेदत, निराशाजनक, उदासीन वातावरणामधून भारतातील उद्योगधंदे ‘कात टाकत’ आहेत असा आशावादी संदेश जगाला जाईल. दोन महिने हा दीर्घ कालावधी असल्याने आज नाण्याची आशावादी बाजू समजून घेतली पुढील लेखात नाण्याची दुसरी बाजू समजून घेऊ.

जाहीर झालेले कंपन्यांचे वित्तीय निकाल व त्यांचे विश्लेषण…

अभियांत्रिकी क्षेत्रात आपल्या कार्यपद्धतीने गुणवत्तेचे मापदंड निर्माण करणारी, मूलभूत, प्रचंड आकाराचे, अवजड अभियांत्रिकी प्रकल्प पूर्णत्वाला न्यावयाचा असेल तर ग्राहकच या कंपनीचा आग्रह धरतात; ‘सिर्फ नाम ही काफी है’ ती कंपनी म्हणजे लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो. प्रत्येक गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचा ‘श्रीगणेशा’ केलेल्या, व विशेषत: आर्थिक क्षेत्राशी संबधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोबद्दल तर विशेष ममत्त्व. कारण १९९३ च्या मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटात मुंबई शेअर बाजाराच्या प्रत्यक्ष वास्तूत बॉम्बस्फोट होऊनही ही वास्तू शाबूत राहिली. कारण या वास्तूचे बांधकाम हे लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोच होते… नाम ही काफी है! गुंतवणूकदारांच्या लाडक्या या कंपनीचे निकालपूर्व विश्लेषण करताना मानसिक दडपण हे येतेच.

लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोच्या तिमाही वित्तीय निकालाची नियोजित तारीख २५ जानेवारी होती. १५ जानेवारीचा बंद भाव १,३५४ रुपये होता. निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर १,३४० रुपये होता. तिमाही वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतर, समभागाचा बाजारभाव महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तरावर टिकला, तर तिमाही निकाल चांगला अन्यथा वाईट. लेखात म्हटल्याप्रमाणे जर निकाल उत्कृष्ट असेल तर १,३४० रुपयांचा स्तर राखत १,५२५ रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते. २५ जानेवारीला प्रत्यक्ष तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर २ फेब्रुवारीला १,५९३ चा उच्चांक मारत आपले १,५२५ चे वरचे लक्ष्य समभागाने साध्य केले. ज्या वाचकांकडे लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक धारणेअंतर्गत आहेत त्यांनी ते राखून ठेवले, व अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी अल्पावधीत १२ टक्क्यांचा परतावा मिळविला. आजही लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो १,३४० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखून आहे आणि १ एप्रिलचा बंद भाव हा १,४४४ रुपये आहे.

 लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 12:04 am

Web Title: sensex nifty share market akp 94
Next Stories
1 रपेट बाजाराची : दुसऱ्या लाटेतही उत्साह अबाधित
2 विमा… विनासायास : विम्याची कवचकुंडले!
3 फंडाचा  ‘फंडा’… : गुंतवणुकीचा वार्षिक आढावा महत्त्वाचाच!
Just Now!
X