नवगुंतवणूकदारांनी व्यक्तिगत कंपन्यांचे शेअर्स घेण्यापेक्षा सेन्सेक्समधीलच खरेदी करावी. सद्यस्थितीत किमान १९० रुपयांमध्ये ३० विख्यात कंपन्यांच्या आर्थिक वाटचालीचा फायदा पदरात पडू शकतो.
सध्याची राजकीय परिस्थीती, गेल्या पाच वर्षांमधील ढासळलेली अर्थव्यवस्था, राजकारण्यांशी संबंधित आर्थिक घोटाळे, युरो झोनमधील आíथक अस्थिरता, औद्योगिक क्षेत्रामधील उत्पादन आणि कामगार समस्या अशा अनेक कारणांमुळे शेअर बाजारामधील अस्थिरता वाढलेली आहे. अनेक जण शेअर बाजारामधील गुंतवणुकीबाबत साशंक झालेले आहेत. बाजारात पुन्हा सुगीचे दिवस येतील अशी चिन्हेही दिसेनाशी झालेली आहेत. त्यातच पाच वर्षांच्या कालावधीत मुदत ठेवी, बांधकाम, सोने-चांदी यामधील गुंतवणुकीने बाजी मारलेली आहे.
या पाश्र्वभूमीवर २०२५ मध्ये सेन्सेक्स १,००,०००ची सीमा पार करणार हे विधान सकृतदर्शनी पूर्णपणे काल्पनीक आणि अतिशयोक्तीपूर्ण वाटेल. किंबहुना अशक्य कोटीतलेही वाटते. ही झाली वरवरची विचारप्रणाली. जरा खोलात जाऊन विचार केला तर या विधानामधील तथ्य लक्षात येईल.
१९९२ च्या तेजीनंतर सेन्सेक्स ४,५४६च्या उच्चांकापासून १,९००पर्यंत घसरला होता (निव्वळ घट ५८%) गुंतवणुकदार हवालदील झाले होते. कारण तत्पूर्वी अशी महाभयंकर मंदी त्यांनी कधी अनुभवली नव्हती. त्यानंतर ४,५४६ ची सीमा पार करण्यासाठी सेन्सेक्सला ७ वष्रे वाट पहावी लागली. (१९९९मध्ये सेन्सेक्स ५,१५१ होता.) या सात वर्षांच्या काळात सेन्सेक्सने दोन वेळा १९९२  ची पातळी गाठायचा प्रयत्न केला; परंतु सर्वसाधारणपणे तो ३,००० ते ४,००० या कक्षेमधेच सिमीत राहिला. १९९९ च्या सुरुवातीला ३,०६४ च्या पातळीवर असलेला सेन्सेक्स २००० मध्ये ६,१५०पर्यंत पोहोचला (वाढ १००% पेक्षा जास्त.) त्यानंतरच्या १० महिन्यांमधे सेन्सेक्स ५६% पेक्षा अधिक घसरला आणि त्याने २,६०० ची पातळी गाठली. पुन्हा ६,१५० ची सीमा पार करायला २००४  उजाडले. त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही. आणि पुढील ४ वर्षांमध्ये (२००८) सेन्सेक्सने २१,१०८ हा नवा उच्चांक प्रस्थापित केला. (चार वर्षांमधील सरासरी वाढ द.सा.द.शे. ३३.८०%) त्यानंतरच्या दहाच महिन्यांमध्ये सेन्सेक्स ५६% हून अधिक खाली आला आणि त्याने ७,६९७ ची पातळी गाठली. त्यानंतरच्या दोन वर्षांमध्ये २०१० च्या दिवाळीच्या सुमारास सेन्सेक्सने पुन्हा एकदा उसळी मारली आणि २१,००० ची सीमा पार केली. त्यानंतर गेली ३ वष्रे सेन्सेक्स १५,३०० आणि २०,००० या मर्यादेमधेच फिरतो आहे.
गेल्या २० वर्षांच्या इतिहासावर नजर टाकली तर आजची परिस्थिती फारशी वेगळी नाही. १९८७ पासून या बाजाराशी वैयक्तिक संबंध आल्याने ही दैनंदिन वाढ आणि घट प्रत्यक्षात अनुभवली आहे. तेजी – मंदीच्या फेऱ्याला कंटाळून कित्येक गुंतवणुकदारांनी स्थिर मुदत ठेवी किंवा जीवनविमा या पर्यायाकडे मोर्चा वळविल्याची अनेक उदाहरणे पाहिली आहे. १९९१ ते २००८ या दरम्यान कोणत्याही सालापासून पुढील १० वर्षांचा काळ हिशेबात घेतला तर त्यामध्ये एकदा तरी सेन्सेक्सने द.सा.द.शे. कमीत कमी १८% आणि जास्तीत जास्त १००% टक्क्यांची वाढ नमूद केली आहे. ज्या गुंतवणूदांरानी ‘भर तेजीमध्ये वाहत्या गंगेत हात धुवून घेऊ या’ अशा उद्देशाने सोम्या-गोम्याच्या सांगण्यावरुन या बाजारात प्रवेश केला आहे ते मात्र पार होरपळून निघालेले आहेत. त्या बाजारामधे दीर्घ पल्ल्यांच्या गुंतवणुकीच्या उद्देशाने प्रवेश केला तरच भाववाढीपेक्षा जास्त परताव्याची अपेक्षा ठेवता येते.
आता मूळ मुद्याकडे वळूया. २००९च्या एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा सेन्सेक्स १०,००० च्या आसपास होता तेव्हा एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अमेरिकन वित्त कंपनीच्या एशिया पॅसिफिक विभागामधील मुख्य तज्ञाने आपला विश्लेषक अहवाल प्रकाशित केला होता. त्याच्या निष्कर्षांनुसार, एप्रिल २००९ पासून पुढील १६ वर्षांमध्ये, म्हणजे २०२५ पर्यंत सेन्सेक्स १,००,००० ची पातळी गाठू शकेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्याची ही संकल्पना तांत्रित विश्लेषणाच्या निकषांवर आधारित होती. सर्वसाधारणपणे २०२५ पर्यंत एशिया पॅसिफिक विभागातील शेअर बाजारांमध्ये तेजीचे वातावरण राहिल, असा अंदाज त्याने व्यक्त केला होता.
आíथक क्षेत्रामधील अंदाज बांधण्याचे शास्त्र हे ‘सॉफ्ट सायन्स’ म्हणून समजले जाते. गणिती किंवा विज्ञानशास्त्रामधील समस्यांचे एकमेव पक्के उत्तर असते. म्हणून त्याला ‘हार्ड सायन्स’ म्हणतात. त्यामुळे आíथक क्षेत्रांमधील अंदाजांबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पनांची जोड देणे (सेकंड ओपिनियन) आवश्यक असते. म्हणून मी ‘टाईम व्हॅल्यू ऑफ मनी’ या शास्त्राचा वापर करुन सेन्सेक्सबाबतच्या वरील अंदाजाचा पडताळा करुन पाहिला.
सेन्सेक्समध्ये देशातील ३० प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे. १९८६ मध्ये त्याची रचना करण्यात आली. त्यावेळी १९७८-७९ हे मूळ वर्ष धरण्यात आले होते आणि सुरुवात १०० या अंकापासून करण्यात आली होती. आजचा सेन्सेक्स आहे जवळपास १९,०००. ‘टाईम व्हॅल्यू ऑफ मनी’च्या शास्त्रानुसार १९७८ची ‘प्रेझेंट व्हॅल्यू १००’ आणि आज ३२ वर्षांनी ‘प्युचर व्हॅल्यू १९,०००’ १९,००० हे गणित मांडले तर सेन्सेक्समधील द.सा.द.शे. सरासरी वाढ होते १७.८१%. या सरासरीचा आधार घेऊन २०२५ पर्यंतच्या १२ वर्षांचा हिशोब मांडला तर २०२५ मध्ये सेन्सेक्स १,३५,९२० च्या घरात पोहोचतो. या आकडय़ासमोर १,००,००० ही पातळी बरीच संरक्षित (conservative) वाटते.
वास्तविकतेच्या दृष्टीकोनातून सेन्सेक्सच्या ऐतिहासिक वाटचालीचा आढावा घेतला तर असे दिसून येते की १९७८ पासून दर १० वर्षांमधे सेन्सेक्समध्ये ६ पट वाढ झालेली आहे. १९७८-१००, १९८८-६००, १९९८-३,६००, २००८-२१,००३ आणि त्यानुसार २०१८मध्ये सेन्सेक्स १,२०,६०० ची पातळी गाठण्याची शक्यता आहे. या ऐतिहासिक वाटचालीचा विचार केला तर २०२५ मध्ये (२०१८ नंतरच्या ७ वर्षांनी) सेन्सेक्स १,००,००० होणार हे भाष्य बऱ्यापकी संरक्षित वाटते.
थोडक्यात – इतक्या मोठय़ा प्रमाणातील पडझडीनंतरही सेन्सेक्सने वारंवार उसळी मारुन भाववाढीपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात परतावा नोंदविला आहे. गेल्या ३२ वर्षांमधील वाढ आहे १९० पट. अर्थातच ज्यांनी शेअर बाजारावर विश्वास दाखवला आणि तज्ञांचा सल्ला घेऊन दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली तेच फक्त फायद्यात राहिले.
नवशिक्यांसाठी एक सूचना करावीशी वाटते. त्यांनी शेअरबाजारामधील गुंतवणुकीचा ‘श्री गणेश:’ करताना व्यक्तिगत कंपन्यांचे शेअर्स घेण्यापेक्षा सेन्सेक्समधीलच खरेदी करावी. आजच्या घडीला कमीत कमी १९० रुपयांमध्ये भारतातील ३० विख्यात कंपन्यांच्या आíथक वाटचालीचा फायदा पदरात पडू शकतो, यापेक्षा स्वस्त आणखी काही असू शकेल, असे वाटत नाही.
शेअरबाजाराबाबत कोणतेही भाष्य करताना ‘वॉरन बफे’ या महान गुंतवणूकदाराचा संदर्भ येणे हे स्वाभाविक आहे. त्याने या बाजारातील गुंतवणुकी बाबत एक अतिशय मोलाचा सल्ला दिला आहे ‘ज्या गुंतवणुकदारांची ५०% कागदी तोटा पचवायची िहमत नाही त्यानी शेअर बाजाराच्या वाटेला न जाणेच उत्तम.’
कारण शेअरबाजारातील गुंतवणुकीमुळे होणारा मनस्ताप हा त्यापासून होणाऱ्या फायद्याच्या आनंदापेक्षा कितीतरी जास्त असतो.
विशेष टीप : येणाऱ्या दिवसात निर्देशांकाची संभाव्य वाटचाल कशी असेल त्याचा हा  आढावा असला तरी हे असेच घडेल याची हमी लेखक अथवा ‘लोकसत्ता – अर्थ वृत्तान्त’ घेत नाही. त्यामुळे कुठल्याही आíथक नुकसानीसाठी लेखक/लोकसत्ता-अर्थ वृत्तान्त जबाबदार राहणार नाहीत. वाचकांनी आपल्या गुंतवणूक सल्लागाराला विचारून योग्य तो निर्णय घ्यावा.