* यापूर्वी ‘लोकसत्ता अर्थवृतांत’मध्ये (४ नोव्हेंबर २०१३) रोजी निफ्टी व सेन्सेक्स या दोन प्रमुख निर्देशांकांच्या वाटचालीवर भाष्य करणारे विवेचन प्रकाशित झाले होते. या विवेचनात २०१४च्या दिवाळीपर्यंत निफ्टी ६,८०० दरम्यान असेल असा विचार मांडला होता. हा लेख जिज्ञासू वाचकांनी इंटरनेट आवृत्तीतून पुन्हा एकदा डोळ्याखालून घालावा. या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे निफ्टी काही काळ ६,०००च्या पातळीवर रेंगाळला. वर जाण्यापूर्वी पाया मजबूत केला व टप्प्याटप्प्याने नवीन शिखरे पादाक्रांत केली. लक्ष्य गाठले गेल्यावर इथून पुढे काय असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो.
मागील आठवडय़ात २३ एप्रिल रोजी, एप्रिल महिन्यातील मालिकेची सौदा समाप्ती होत असताना निफ्टी ६,८४०.८० वर तर सेन्सेक्स २२,८७७ या पातळीवर बंद झाले. याआधी सेन्सेक्सने २२,९१३ तर निफ्टीने ६८५३.०५ या सार्वकालिक उच्चांकास स्पर्श केला. इथून पुढे या निर्देशांकाची वाटचाल नवीन शिखराच्या दिशेने होणे कठीण वाटते. या प्रमुख निर्देशांकांनी एक – दीड टक्के उंचीवरील नवीन शिखराला जरी स्पर्श केला तरी या पातळीवर बाजार टिकणे कठीण वाटते. मध्यमकालीन म्हणजे सहा ते आठ महिन्यांच्या काळात निर्देशांक टप्प्याटप्प्याने खाली जाऊन सहा हजारांच्या पातळीवर स्थिरावण्याचीच शक्यता अधिक वाटते. मे महिन्याची निफ्टीची सौदापूर्ती ६,५०० च्या खाली झाली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. प्रमुख दिशादर्शकांनी निर्देशांकाची वाटचाल खालच्या दिशेने असल्याचे संकेत दिले आहेत. अशा परिस्थितीत नवीन काही खरेदी करणे म्हणजे आपल्या हाताने स्वत:चा गळा घोटण्यासारखे आहे.
तांत्रिक विश्लेषणात बिगर आलेख तंत्र (नॉन चार्टिग टेक्निक्स) हे महत्वाचे अंग आहे. या तंत्रातील रोजच्या वापरातील सर्वाच्या परिचयाची एक पद्धत म्हणजे ‘अॅडव्हान्स डिक्लाइन रेशो’! हे तंत्र या तंत्रातील कुठले समभाग वर जातात व कुठले खाली येतात याचा अभ्यास करते. सद्यस्थितीचा अभ्यास करता ‘मायक्रो कॅप’ अर्थात सूक्ष्म भांडवली मूल्य असलेल्या कंपन्यांचे भाव जेव्हा वर जातात तेव्हा तेजीचा अंत समीप आला, असे तांत्रिक विश्लेषकांचे मानणे असते. या विचाराला बळ देणाऱ्या हालचाली बाजारात दिसत आहेत. ज्या कंपन्यांचे भाव मागील १५ कामकाज सत्रात वाढले त्यांची यादी सोबतच्या कोष्टकात दिली आहे. ही यादी पाहता बाजारात कोण व कसे रस घेत आहे हे जाणून घेणे इष्ट ठरेल.
बाजाराविषयी शिक्षण देणाऱ्या वर्गात न चुकता सांगितला जाणारा किस्सा सांगण्याचा मोह होत आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे वडील वॉल स्ट्रीटवरील एक नामांकित शेअर दलाल होते. एके दिवशी आपली पादत्राणे चमकून घेत असताना त्या कारागिराने या महाशयांना सल्ला देण्यास सुरुवात केली. हे ऐकून महाशयांनी आपल्या कार्यालयात पोहोचल्यावर पहिले काम केले म्हणजे आपले सर्व शेअर विकून टाकले. पुढे नंतर १९२९ च्या ‘गेट फॉल’ला सुरुवात झाली. १९९२, २००० मध्ये हेच दिसून आले. मायक्रोकॅप जेव्हा भरारी घेतात तेव्हा तेजीचे शेवटचे आवर्तन असते. हे विसरून चालणार नाही.
 हा लेख प्रसिद्ध होईल त्या वेळी मतदानाच्या दोन फेऱ्या अजून शिल्लक राहतील. या दोन फेऱ्यांत गुजरात व उत्तर प्रदेश हे ‘एनडीए’च्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या राज्यात मतदान शिल्लक आहे. या ठिकाणी मतदानाची टक्केवारी किती वाढते हे पाहणे महत्त्वाचे आहे. तूर्तास निर्देशांक कधी घसरतील याचा अंदाज बांधण्यापेक्षा मोहात पाडणाऱ्या नवीन खरेदीपासून दूर राहणे यातच गुंतवणूकदारांचे हित आहे. म्हणूनच धोक्याचा इशारा निर्देशांक देत आहेत हे नक्की.
 व्यापार प्रतिनिधी