निफ्टी निर्देशांकाचा ५९२० ते ६००० पातळीपर्यंतचा प्रवास बाजारासाठी अग्निपरीक्षेचा असेल असा निष्कर्ष गेल्या आठवडय़ात या स्तंभात मांडण्यात आला होता. या स्वरूपाचा ५९४४ चा समांतर उच्चांकस्तर एप्रिल २०११ मध्ये स्थापला गेला होता त्यावेळी जे काही घडले त्यावरून, बाजारात तेजीचा प्रवाह अव्याहत सुरू राहील की नाही हे निश्चित करणारी ‘लक्ष्मण रेषा’ ही पातळीच असेल, असे या निष्कर्षांमागील तात्पर्य सांगता येईल. सरलेल्या आठवडय़ात निफ्टी निर्देशांकाने या तांत्रिक आलेखाने घालून दिलेल्या पाऊलवाटेवरून नेमका प्रवास केला. तथापि किराणा व्यापारात थेट विदेशी गुंतवणुकीला वाव देणाऱ्या निर्णयावर संसदेच्या दोन्ही सभागृहातील महत्त्वपूर्ण शिक्कामोर्तबानंतरही, निफ्टीला वर उल्लेख आलेली ‘लक्ष्मण रेषा’ पातळी ओलांडता आली नाही. बाजारात निर्देशांकाने ५९४९ची मजल गाठली आणि निफ्टी डिसेंबर फ्युचर्सनेही ५९७७ चा उच्चांक भाव गाठला. पण त्यापल्याड जाण्याची रग मात्र दिसली नाही.
किराणा व्यापारात थेट विदेशी गुंतवणुकीवर माजलेल्या रणकंदनात यूपीए सरकारचा विजय हा अनेकांगाने महत्त्वपूर्ण आहे. कारण  अर्थव्यवस्थेच्या उभारीच्या दृष्टीने आवश्यक असलेली अन्य पावले टाकण्याबाबत सरकारला पुरेसा आत्मविश्वास आणि बळ या विजयाने मिळवून दिले आहे. पण सरकारच्या विजयाचे आडाखे बाजाराने खूप आधीच बांधले होते असे दिसते. कारण संसदेत मतआजमावणीची कसोटी होण्यापूर्वीच बाजाराचा वरच्या दिशेने प्रवास सुरू होता आणि प्रत्यक्षात निकाल आल्यानंतर मात्र नफा कमावला जाऊन बाजारात घसरण दिसून आली. पण त्यामुळे निर्देशांकाला तांत्रिकदृष्टय़ा महत्त्वाची असलेली मजल गाठता आली नाही आणि सप्ताहाची अखेर त्यांने ५९०० पातळीपाशीच केली. गेल्या आठवडय़ात म्हटले त्याप्रमाणे,  जेव्हा सर्व बाजूने तेजीच्या वार्ताना ऊत येतो तेव्हाच नेमका तो चकवा असल्याचे बाजाराकडून दर्शविले जाते. अगदी निर्देशांक कलाटणी घेणार वाटत असताना बाजाराने नेमका दगा दिला.
हे असे असले तरी बाजार तेजीची मनोदशा अजूनही बलवत्तर आहे हे नि:संशय. पुन्हा ५९२० ते ६००० हे निर्देशांकाच्या आगामी प्रवासातील कडवे प्रतिकार क्षेत्र राहील. डेरिव्हेटिव्हज् उलाढालीही स्पष्ट करतात की, डिसेंबर एफ अॅण्ड ओ  मालिकेच्या सौदापूर्तीपर्यंत निफ्टीचा उच्चांक स्तर ६०००च्या पल्याड निश्चितच नाही. शिवाय नजीकच्या काळात बाजाराला उत्साही उधाण देईल अशा काही घडामोडीही दृष्टिक्षेपात नाहीत. तांत्रिक परिभाषेत बोलायचे तर, सरलेल्या गुरुवारी निफ्टी निर्देशांकाने ‘ड्रॅगनफ्लाय डोजी’ मेणबत्ती रचना बनविली. तर पाठोपाठ शुक्रवारी निर्देशांकाची ‘मंदीग्रहण’ता दिसून आली. याचा अर्थ निर्देशांकाने जसा वर दिलेल्या प्रतिकार क्षेत्रात प्रवेश केला, तसा बाजारात विक्रीचा दबावही वाढला आहे. हा चालू सप्ताहासाठी मंदीचा संकेत आहे. मात्र निर्देशांकाची घसरणही मर्यादीत आहे. ५७५० हा त्याचा मजबूत आधार स्तर तूर्तास कायम आहे.       
सप्ताहासाठी शिफारस
टीसीएस : (सद्य दर १२६४ रु.) विक्री : रु.१२५४ खाली; लक्ष्य: रु. १२१४
सेसा गोवा :  (सद्य दर १८७.८० रु.) विक्री : रु. १८६ खाली; लक्ष्य: रु. १७९
युना. फॉस्फरस : (सद्य दर१२७.२५ रु.) खरेदी: रु. १२८.६० वर;  लक्ष्य: रु. १३५
गेल्या आठवडय़ातील खरेदी शिफारशीप्रमाणे भेल आणि देना बँकेने दिलेले इष्टांक गाठून अनुक्रमे २४७.७५ आणि ११८.८० असे उच्चांक दाखविले, तर एबीबीने खरेदीसाठी दिलेला इष्टांक गाठला पण ७३१ या भावापर्यंतच तो मजल मारू शकला.