आशीष ठाकूर

गेल्या आठवडय़ात निर्देशांकांना ‘महत्त्वाचा मार्गदर्शक स्तर’, जो सेन्सेक्सवर ३७,४०० आणि निफ्टीवर ११,१०० आहे तो पार करण्यास अपयश तर आलेच, त्यात गेल्या मंगळवारी व बुधवारी एकापाठोपाठ एक धक्के देत निर्देशांकांनी आपला भरभक्कम आधारही गमावला. सेन्सेक्सने ३६,४०० आणि निफ्टीने १०,८०० हा आधार स्तर त्या वेळी तोडला. आता जोपर्यंत निर्देशांक सेन्सेक्सवर ३७,४०० आणि निफ्टीवर ११,१००च्या स्तरावर सातत्याने टिकत नाही तोपर्यंत बाजार कोसळण्याचे ‘भय इथले संपत नाही’ एवढे मात्र निश्चित. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ३६,९८१.७७

निफ्टी : १०,९४६.२०

निर्देशांकावर आता जी सुधारणा चालू आहे ती ‘मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक’ या स्वरूपाची आहे. जिचे प्रथम वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३७,००० आणि निफ्टीवर ११,००० असेल आणि त्या नंतर सेन्सेक्सवर ३७,४०० आणि निफ्टीवर ११,१०० असे असेल. जोपर्यंत निर्देशांक सातत्याने पाच दिवस सेन्सेक्सवर ३७,४०० आणि निफ्टीवर ११,१००च्या वर टिकत नाही तोपर्यंत ही क्षणिक सुधारणा आहे, शाश्वत तेजी नाही, असे समजावे. त्यामुळे ही क्षणिक सुधारणा असल्यास निर्देशांकाचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३५,२०० ते ३४,३०० आणि निफ्टीवर १०,५०० ते १०,३०० असे असेल.

तिमाही निकालांचे विश्लेषण

बाजार कोसळत असतानाही ज्या कंपन्याचे तिमाही निकाल उत्कृष्ट होते त्यांनी आपली वरची उद्दिष्टे मंदीतदेखील साध्य केली, हे गेल्या दोन लेखांत आपण पाहिले. आज आपण ज्या कंपन्यांचे तिमाही निकाल निराशाजनक आहेत, त्यांचा वेध घेऊ. मंदीचा रेटा, त्यामुळे समभागाचे भाव कोसळण्याला अटकाव तरी कोण करणार? पण अशाही वेळेस, तिमाही निकाल जाहीर होण्याअगोदर सूचित केलेले, मंदीतील खालचे लक्ष्य साध्य करून, मंदीच्या रेटय़ातील पडझड सावरली का? याचा आज आपण आढावा घेऊ या.

 एचडीएफसी बँक :

या स्तंभातील १५ जुलैच्या लेखातील हा समभाग होता. समभागाचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर हा २,४०० रुपये होता. निकालाअगोदर १२ जुलैचा बंद भाव हा २,३९३ रुपये होता. निकाल निराशादायक असल्यास २,४०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत समभाग प्रथम २,२०० रुपयांपर्यंत घसरेल, असे निकालाअगोदरचे विश्लेषण होते. प्रत्यक्ष निकाल निराशादायक असल्याने, २३ ऑगस्टला समभागाने २,१३९ रुपयांचा नीचांक नोंदवला. आज दीड महिन्यानंतरही, एचडीएफसी बँकेच्या समभागाचा बाजारभाव हा महत्त्वाच्या केंद्रिबदू स्तराखालीच आहे. पण या मंदीच्या रेटय़ात २,२०० रुपयांचा स्तर राखत शुक्रवारचा बंद भाव २,२४५ रुपये आहे.

 येस बँक :

या स्तंभातील १५ जुलैच्या लेखातील हा दुसरा समभाग होता. समभागाचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर हा ८५ रुपये होता. निकालाअगोदर १२ जुलैचा बंद भाव हा ९४ रुपये होता. जर निकाल निराशादायक असल्यास ९४ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत प्रथम ७० व त्यानंतर ५० रुपयांपर्यंत घसरण होईल. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरचे विश्लेषण होते. प्रत्यक्ष निकाल निराशादायक असल्याने २२ ऑगस्टला त्याने ५३ रुपयांचा नीचांक नोंदवला. आज दीड महिन्यानंतरही, येस बँकेच्या समभागाचा बाजारभाव हा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तराखालीच आहे. पण या मंदीच्या रेटय़ात ५० रुपयांचा स्तर राखत, शुक्रवारचा बंद भाव ६० रुपये आहे.     (क्रमश:)

*  ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.