|| वसंत कुलकर्णी

बटाटय़ाच्या चाळीला वासरी लेखनाचा समृद्ध वारसा आहे. वासरी लेखनाची ही परंपरा बटाटा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या चौथ्या पिढीतसुद्धा आजही टिकून आहे. ध्रुव पावशे (मूळ चाळीतील तेरा नंबरवाले ग्रहगौरव अण्णा पावशेंचा हा वंशज) अण्णा पावश्यांची भविष्यकथनाची कला याला चांगलीच अवगत आहे. अण्णा पालिकेच्या जल खात्यात नोकरीला लागल्याने महाराष्ट्र एका ज्योतिषाला मुकल्याची खंत पुलंनी व्यक्त केली आहे; परंतु अण्णांच्या या पुढील पिढीतील वंशजाने आपल्या व्यवसायाला आपल्या या वंशपरंपरेने चालत आलेल्या कलेची जोड दिली आहे. जातकाचे भविष्य अण्णा त्यांच्या कुंडलीतील ग्रहताऱ्यांच्या स्थानावरून वर्तवीत असत. आता हा शेअर्स आणि म्युच्युअल फंड वितरणाच्या व्यवसायात असल्याने याची भविष्यकथनाची वेगळी साधने आहेत. त्याच्या वासरीतील ही निवडक पाने.

३१ डिसेंबर : सर्व फंड हाऊसेसने ‘टीईआर’ कमी झाल्याच्या नावाखाली आमची मान पिरगळायची तेवढी शिल्लक ठेवली आहे. एकानेसुद्धा पुढील वर्षांची वासरी पाठवली नाही.

१ जानेवारी: स्वत:चे पैसे खर्च करून वासरी विकत घेण्याचा विरळा प्रसंग या वर्षांच्या पहिल्या दिवशी माझ्या वाटय़ाला आला. कधी काळी बटाटा अपार्टमेंटमधील किमान १० घरांत मी पाठवलेल्या दहा वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांच्या वासऱ्या वापरल्या जात असत. हे म्हणजे मागच्या वर्षांसारखे झाले. गेल्या वर्षांचा परतावा बघून गुंतवणूक केली त्यांच्या वाटय़ाला या वर्षी नुकसानच आले.

३ जानेवारी २०१८ : म्युच्युअल फंडांच्या सप्टेंबर ते डिसेंबर कालावधीची मालमत्तेनुसार क्रमवारी आज जाहीर झाली. ‘तरक्की करें’ म्हणणाऱ्यांनी म्युच्युअल फंडांच्या क्रमवारीतील आपला पहिला क्रमांक गमावला. हे भविष्य मी कधीच वर्तविले होते. ‘तरक्की करें’वाल्यांना गुंतवणूकदारांच्या हिताशी प्रतारणा केल्याबद्दल ‘सेबी’ने दंड केला तेव्हाच मी हे ओळखले होते. पुढे आयएल अँड एफएस प्रकरणानंतर यांना कोणी पैसे देत नव्हते. त्यामुळे हे घडणार याची खात्री होती. यांची पापे चव्हाटय़ावर आणून ‘सेबी’ने सामान्य गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण केले आहे. एप्रिल-मे महिन्यांत ‘तरक्की’वाल्यांनी केलेला आयसीआयसीआय सिक्युरिटीजमधील गुंतवणुकीचा वाममार्ग उघडकीस आला तेव्हा आम्ही कुठलाच नियमभंग केलेला नाही असे निर्ढावलेपणाने सांगत असलेल्यांनी या आदेशाला लवादासमोर आव्हान देत आपले निर्दोषत्व सिद्ध करणे गरजेचे होते; परंतु गुन्हेगार असल्यागत ‘तरक्की’वाल्यांनी हा दंड निमूट भरला. दर महिन्याला नवीन फंड आणून भोळ्या गुंतवणूकदारांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारून यांनी स्वत:च्या वेतनमानात मात्र चांगलीच ‘तरक्की’ केली असल्याचे पगाराचे आकडेच सांगत आहेत. मागील एका वर्षांत सर्वाधिक ‘एनएफओ’ आणलेल्या या ‘तरक्की करें’वाल्यांचे दोन फंड वगळता यांच्या इतर ‘एनएफओ’मधील गुंतवणुकीतून चार ते १२ टक्के तोटाच झाला आहे.

१० जानेवारी २०१९:  २०१८ हे वर्ष बाजारातील परताव्याच्या दृष्टीने अतिसामान्य वर्ष असले तरी २०१९ बाबत मी आशावादी आहे; परंतु हा आशावाद ट्रेड वॉर, ब्रेग्झिटबाबतची अनिश्चितता किती लवकर संपते यावर आणि ‘कॉर्पोरेट अर्निग रिकव्हरी’वर अवलंबून असेल. २०१८ मध्ये जग दीर्घकाळ एका संक्रमणाच्या अवस्थेतून जात होते. दहा वर्षांच्या या संक्रमणाच्या कालखंडातून ते बाहेर पडेल असे संकेत मिळत आहेत. येत्या वर्षांत जगभरात रोकडसुलभता आटण्याची अपेक्षा असून भारतीय बाजाराच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट तितकीशी चांगली नाही. आजच्या घडीला विकसित अर्थव्यवस्थांपेक्षा उभरत्या अर्थव्यवस्था परकीय गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी अधिक आकर्षक वाटत असल्याने मागील तीन वर्षे विकसित अर्थव्यवस्थांतून गुंतवणूक करणारे परकीय गुंतवणूकदार उभरत्या अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणूक करतील. याचा फायदा भारतीय बाजाराला नक्कीच होईल.

नुकत्याच संपलेल्या संसदेच्या अधिवेशनांत दिलेल्या माहितीनुसार बहुतेक राज्यांनी विद्युतीकरणाचे १०० टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे. साहजिकच जिथे फ्रिज, एअरकंडिशनर किंवा वॉशिंग मशीनसारखी घरगुती वापराची उपकरणे विकली जात नव्हती त्या ठिकाणाहून या वस्तूंची मागणी वाढत आहे. आजपर्यंत बँकिंग परिघाच्या बाहेर असलेला वर्ग बँकिंग सेवांच्या परिघात आल्याने कर्ज उपलब्ध होऊ  लागल्याने या वस्तूंच्या मागणीत वाढ दिसून येत आहे. केंद्र सरकारने निवडक कृषी उत्पादनांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नांत वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामीण रोकडसुलभता वाढल्याने उपभोग्य वस्तूंचे उत्पादक, वाहने, बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या पोलाद, सिमेंट यांसारख्या वस्तू, प्लायवूड, रंग आदी गृहसजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू याची ग्रामीण भारतातून मागणी वाढत आहे. बांधकाम क्षेत्रातील काही कंपन्यांचे विशेषत: रस्ते आणि महामार्ग बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांच्या उत्सर्जनात वाढ दिसून आली आहे. औषध कंपन्यांचे मूल्यांकन आकर्षक पातळीवर आहे. टाटा इंडिया कन्झ्युमर फंड, एसबीआय कंझम्प्शन अपॉच्र्युनिटीज, मिरॅ इंडिया हेल्थकेअर फंड, रिलायन्स फार्मा या फंडांची गुंतवणूकदारांना शिफारस करायला हवी.

shreeyachebaba@gmail.com